घटनास्थळ दाखविण्यासाठी तत्कालीन उपअधीक्षकांसह शासकीय वाहनातून प्रवास केला, अनिकेत कोथळे खून खटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोथळे खून खटल्यात घटनास्थळ दाखविण्यासाठी तत्कालीन उपअधीक्षकांसह शासकीय वाहनातून प्रवास केला. त्याच्या नोंदी सत्य असल्याची साक्ष सहायक फौजदार सदाशिव कांबळे यांनी आज न्यायालयासमोर दिली. घटनेतील संशयित बडतर्फ हवालदार अनिल लाड यालाही त्यांनी न्यायालयासमोर ओळखले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास घेतल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी उलटतपास घेतला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आज पुन्हा सुरू आहे. या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांना जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी मदत केली. यावेळी ‘सीआयडी’चे तत्कालीन उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, उपअधीक्षक आरिफा मुल्ला, निरीक्षक मनोज बाबर यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले. बचाव पक्षातर्फे ऍड. गिरीश तपकिरे, ऍड. प्रमोद सुतार, ऍड. विकास पाटील-शिरगावकर यांनी काम पाहिले.

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत 6 नोव्हेंबर 2017 रोजी संशयित अनिकेत कोथळे याचा खून करण्यात आला होता. या घटनेने राज्याच्या पोलीस दलाला हादरा बसला होता. या खटल्यात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, वाहनचालक राहुल शिंगटे आणि झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले आदी संशयित आहेत. एक संशयित हवालदार अरुण टोणे याचा आजाराने कारागृहातच मृत्यू झाला आहे.

या खटल्याच्या सुनावणीत आज सहायक फौजदार सदाशिव कांबळे यांची साक्ष झाली. कांबळे हे पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात कार्यरत आहेत. आंबोली येथील घटनास्थळी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्यासमवेत शासकीय वाहनातून गेलो होते. त्यावेळी लॉगबुकमध्ये घेतलेल्या नोंदी मीच घेतल्या असून, त्या बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. बचाव पक्षातर्फे उलटतपास घेण्यात आला. त्यावेळी लॉगबुकमधील नोंदीबाबत विचारणा केली. त्याचे खंडण करीत, त्या मीच घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घटनास्थळी पोहोचण्यासाठी वाहनातून किती वेळ लागतो, याबाबतही बचाव पक्षाने विचारणा केल्यानंतर त्यांनी त्याची उत्तरे दिली.