
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी स्पेशल पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने त्यांच्या चौकशीसाठी कस्टडीची मागणी केली होती.
अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर काही बाबी समोर आल्या होत्या. त्यानंतर ईडीने तपास हाती घेतला. ईडीने देशमुख यांना आतापर्यंत चार वेळा चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स केले होते. तेव्हा देशमुख यांनी चौकशीला हजर न राहता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणीदेखील देशमुख यांनी ईडीला केली होती. ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणांनी देशमुख यांच्या घरात छापे टाकून मालमत्तांवर टाच आणली होती.
सोमवारी साडेअकराच्या देशमुख हे त्याचे वकील इंद्रपाल सिंह यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास दिल्लीहून ईडीच्या अधिकाऱ्यांची टीम मुंबईत आली. या टीमने देशमुखांची चौकशी केली. 12 तास चौकशी केल्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ईडीने देशमुखांना अटक केली होती.





























































