
राज्याचे परिवहनमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांना आज ईडीने नोटीस बजावली. मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ‘ईडी’ कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे, असे या नोटिसीत म्हटले आहे. नोटिसीत कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. केवळ मंगळवारी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे यावर कायदेशीर सल्ला घेऊनच ‘ईडी’ला उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरीत पोहोचली असता पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मुख्यमंत्र्यांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य राणेंच्या अंगलट आले होते. मात्र या अटकेनंतर ‘सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करू’ अशी धमकीच भाजप नेत्यांनी दिली होती. आज राणे यांच्या यात्रेचा समारोप होत असतानाच अनिल परब यांना ‘ईडी’ची नोटीस मिळाल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
वरचे सरकार कामाला लागले – संजय राऊत
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना ‘शाब्बास!’ अशा शब्दांत मोदी सरकारला सणसणीत टोला हाणला आहे. जनआशीर्वाद यात्रेची सांगता होताच अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परिवहनमंत्री अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे कृपया क्रोनोलॉजी समजून घ्या. रत्नागिरीत नारायण राणे यांना अटक केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मात्र त्याच वेळी कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.






























































