पाचवी-आठवीच्या वर्गांसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याच्या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीत सुधारणा केली आहे. त्यानुसार पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना श्रेणीऐवजी गुण मिळणार असून नापास होणाऱया विद्यार्थ्यांना पुढील दोन महिन्यांतच फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे. जर विद्यार्थी या फेरपरीक्षेतही नापास झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात बसावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी सध्या सुरू असलेल्या दुसऱया सत्रापासूनच होणार असून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे एप्रिलमध्ये होणाऱया वार्षिक परीक्षेपासून गुणांनुसार मूल्यमापन होणार आहे.

आठवीपर्यंत विद्यार्थी नापास होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नाही असा बऱयाच पालकांचा समज आहे. पूर्वीप्रमाणे परीक्षा घेण्यात यावी, अशी भावना पालकांमधून व्यक्त होत नाही. तसेच नापास होण्याची भीती नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेही अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी ही मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली आहे. पाचवी-आठवीचा विद्यार्थी वार्षिक आणि फेरपरीक्षेतही नापास झाला तरीही त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला शाळेतून काढून टाकण्यात येणार नाही, अशी तरतूदही करण्यात आली आहे. याविषयीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा मिळून पाचवीसाठी एकूण 50 तर आठवीसाठी एकूण 60 गुणांची वार्षिक परीक्षा आणि फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.

वार्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना गरजेनुसार सवलतीचे गुण, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन.
1.सवलतीचे कमाल 10 गुण. एका विषयासाठी कमाल 5 गुण.
2.पाचवी आणि आठवीसाठी तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा 10 गुण, लेखी परीक्षा अनुक्रमे 50 आणि 60 गुणांची.
3.पाचवीसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय भाषा, गणित, परीसर अभ्यास 1-2 यावर आधारित परीक्षा.
4.आठवीसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र यावर आधारित परीक्षा.
5.पाचवीत पास होण्यासाठी प्रतिविषय किमान 18 गुणे (35 टक्के) आवश्यक.
6.आठवीत पास होण्यासाठी प्रतिविषय किमान 21 गुण (35 टक्के) आवश्यक.
7.परीक्षेला गैरहजर राहिल्यासही विद्यार्थी नापासच, मात्र फेरपरीक्षेची संधी मिळणार.
8.फेरपरीक्षा जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार.