भाजपविरोधी बॅनर पोलिसांनी हटवले, दडपशाहीविरुद्ध राष्ट्रवादीचे पोलीस आयुक्तांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp

दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून शुभेच्छापत्र लिहिले होते. ‘शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्र आधार या भारताचा’ अशा आशयाच्या शुभेच्छापत्राचे बॅनर मुंबई शहरात ठिकठिकाणी लावले होते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी हे बॅनर हटवत संबंधित कार्यकर्त्यांना नोटीस धाडली आहे. पोलिसांच्या या दडपशाहीचा मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसने निषेध केला आहे.

शिवसेनेमुळे भाजपने महाराष्ट्रात हातपाय पसरले. परंतु, गेली 56 वर्षे मराठी मातीशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेलाच नेस्तनाबुत करण्याचे डावपेच भाजप आखतेय, अशी वस्तुस्थिती या शुभेच्छापत्रातून राष्ट्रवादी मुंबई विभागीय सचिव राजू घुगे यांनी मांडली होती. कलानगर जंक्शन, बलार्ड पिअर, शिवसेना भवन परिसर, भाजप प्रदेश कार्यालय परिसर आणि घाटकोपर येथे या शुभेच्छापत्राचे बॅनर लावले होते. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी तत्परतेने हे बॅनर हटवले आणि संबंधितांना नोटिसा धाडल्या, असा आरोप राष्ट्रवादीचे मुंबईचे सचिव दिनेशचंद्र हुलवळे यांनी केला आहे. याप्रकरणी हुलवळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले असून पोलिसांची ही वागणूक पक्षपातीपणाची आणि लोकशाही मार्गाने जनभावना व्यक्त करण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे, असे म्हटले आहे.