
बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. हा आरोपी 16 वर्षांचा असून त्याच्यावर 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी हा शालेय विद्यार्थी असून तो अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळावा, अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती.
या प्रकरणातील प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार आरोपी दोषी आढळत नसल्याने त्याला जामीन मिळावा, अशी मागणी करत तो अल्पवयीन असल्याने ज्युवेलाईन कायद्यानुसार जामीन मिळण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, हे गंभीर प्रकरण असल्याने या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाची प्रक्रिया आणि पीडितेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाट बघा. त्यानंतर जामीनासाठी अर्ज करा, अशी सूचना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केली.
या प्रक्रियेसाठी बराच वेळ जाईल, तसेच कनिष्ठ न्यायालयातील जबाब नोंदवणे आणि इतर कामकाजातही बराच वेळ जाण्याची शक्यता आहे. आरोपी शालेय विद्यार्थी असून या काळात त्याचे शैक्षणिक नुकसान होईल, याकडे आरोपीचे वकील मनु यादव यांनी लक्ष वेधले.मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायलयाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला.
कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाला याबाबतचे कामकाज करण्यासाठी निश्चित कालमर्यादा आखून देण्यात येईल. त्या मर्यादेतच त्यांनी काम करावे, त्यामुळे या प्रक्रियेतील विलंब टळेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच आरोपीवर असलेले गंभीर आरोप आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, सध्याच्या न्यायालयीन प्रक्रियेत या टप्प्यात आरोपीला जामीन देणे योग्य होणार नसल्याने पीडितेचा जबाब नोंदवून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जामीनासाठी कालांतराने नव्याने अर्ज करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.
























































