बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीचा बोलबाला, 6 पैकी 5 बाजार समित्यांवर विजयी झेंडा फडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून बीड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला दिसून येत आहे. येथील 6 पैकी 5 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने वर्चस्व राखले आहे.

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने 18 पैकी 15 जागा जिंकल्या आहेत. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अद्याप मतमोजणी सुरू असून, 18 पैकी 11 जागा महाविकास आघाडीच्या पॅनेलने जिंकल्या आहेत, तर उर्वरित सातही जागी उमेदवार आघाडीवर आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

 

गेवराईमध्ये आणि वडवणई बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 पैकी सर्व 18 जागा जिंकून काही जागी विरोधकांचे अक्षरश: डिपॉझिट जप्त केले आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 पैकी 15 जागा निवडून आणल्या आहेत. या विजयाने जयदत्त क्षीरसागर यांची 35 वर्षांपासूनची सत्ता पालटली असून निकालानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

आष्टी बाजार समिती निवडणुकीत झालेल्या तहामुळे ही निवडणूक याआधीच बिनविरोध झालेली असून, इथे सुरेश धस गटाचे 11, राष्ट्रवादीचे 3, भीमराव धोंडे गटाचे 3, तर शिंदे गटाचा 1 उमेदवार विजयी ठरले होते. केज बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र भाजपला 14 जागा मिळाल्या असून, जिल्ह्यातील केवळ एक बाजार समितीवर विजय मिळाला आहे.

सांगली-ईश्वरपूरमध्ये मविआकडून भाजप-शिंदे गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’, सत्ताधाऱ्यांना भोपळाही फोडता आला नाही

बीड जिल्हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला – धनंजय मुंडे

या निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असल्याचे आजच्या या निकालातून सिद्ध झाले असल्याचे म्हटले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत जरी ठराविक लोकांना मतदानाचा अधिकार असला तरी तरी ते लोक ग्रामपंचायत, सोसायटी, व्यापारी, हमाल-मापाडी अशा विविध समूहाचे नेतृत्व करत असतात. त्यांचे मत हे त्यांच्या समूहाचे मत मानले जाते. त्यामुळे हा निकाल सर्वांच्याच डोक्यात प्रकाश पाडणारा असून, महाविकास आघाडी साठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे सिद्ध करणारा आहे, असेही ते म्हणाले.