मुंबई धुरक्यात हरवली, खोकल्याची उबळ चाळवली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोव्हेंबर महिना निम्मा संपत आला तरी थंडी अजून मुंबईच्या कुशीत शिरलेली नाही. मात्र ही मायानगरी सध्या धुरक्यात हरवून गेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईने धुरक्याची शाल लपेटून घेतली आहे. एकीकडे हे वातावरण मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल देतेय, याचवेळी दुसरीकडे या वातावरणाने मुंबईकरांमध्ये खोकल्याची उबळ चाळवली आहे. पुढचे किमान दोन दिवस धुरक्यांचा प्रभाव कायम राहून मुंबईची दृश्यमानता कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याच्या अधिकाऱयांनी वर्तवला आहे.

सर्वसाधारणत: दिवाळीच्या दिवसांत थंडीचा कडाका वाढलेला असतो. यंदा मात्र मुंबईकरांना गुलाबी थंडीची अजून प्रतीक्षा करावी लागत आहे. शहराचा पारा उतरणीला लागलेला नाही, त्यात शहरावर पावसाळी ढग दाटून येत आहेत. पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा प्रभाव मुंबई परिसरात दिसून येत आहे. ढग तसेच हवेतील धूलिकणांचे प्रमाण यामुळे समुद्रकिनारच्या मुंबईत धुरके दिसून येत आहे. पुढील दोन दिवसांनंतर याचा प्रभाव कमी होत जाईल, असे हवामानशास्त्र विभागाचे अधिकारी डॉ. जयंत सरकार यांनी म्हटले आहे. वातावरणातील बदलाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून अनेकांना घशाची खवखव, खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हवेच्या गुणवत्तेवर फटाक्यांचा परिणाम नाही

राजधानी दिल्लीत फटाक्यांच्या आतषबाजीने तेथील वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर केला आहे. मुंबईकरांनी मात्र नियंत्रणात फटाके वाजवून शहराच्या हवेची गुणवत्ता राखण्यात मौलिक भूमिका बजावली आहे. हवेच्या गुणवत्तेची नोंद ठेवणाऱया ‘सफर’ संस्थेने मुंबईची हवा चांगली असल्याचा निष्कर्ष काढला आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱयांनीही शहराच्या वातावरणावर फटाक्यांचा परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे.

थंडीसाठी ‘वेटिंग’

मुंबई शहरात ऑक्टोबरच्या अखेरीपासून थंडीची चाहूल लागते. यंदा अद्याप शहर परिसरासह उपनगरांचा पारा सरासरीच्या खाली गेलेला नाही. हवामान खात्याच्या कुलाबा आणि सांताक्रुझ या दोन्ही ठिकाणच्या केंद्रांवर सकाळचे तापमान (किमान) 24 अंशांच्याच आसपास नोंद होत आहे. रविवारी कुलाब्यात 24, तर सांताक्रुझमध्ये 25 अंश किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईला थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

ऑण्टिपॉल्युशन मास्क वापरा!

हिवाळा सुरू होताना असे वातावरण निर्माण होते. या काळात हवेचा दर्जा अत्यंत खालावलेला असतो. त्यामुळे श्वसनविकार बळावतात. खोकला, सर्दीचा त्रास, घसा बसण्यासारखे आजार होतात. त्यामुळे अशा वातावरणात काळजी घ्यायलाच हवी.  सध्या आपण मास्क वापरतोच त्याबरोबरच मेडिकलमधून जर ऑण्टिपॉल्युशन मास्क घेऊन तो वापरला तर तो अधिक फायदेशीर ठरेल, असे मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयाच्या श्वसनविकारतज्ञ डॉ. सोनम सोलंकी यांनी सांगितले.