
हिंदुस्थानी लष्कराने महाभयंकर कोरोना महामारीवर लसीकरणाच्या सर्जिकल स्ट्राइकने पूर्ण विजय मिळवला आहे. जवानांचे 81 टक्के लसीकरण पूर्ण करीत हिंदुस्थानी सेनेने कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यात यश मिळवले आहे. देशात प्रतिदिनी लाखो कोरोना संक्रमित रुग्ण मिळत असताना हिंदुस्थानी लष्करी जवानांमध्ये मात्र हे प्रमाण नगण्य आहे. जे बोटावर मोजण्याइतके जवान कोरोनाबाधित मिळत आहेत ते एकतर सुट्टीवर गेलेले अथवा आपल्या कुटुंबीयांसोबत राहून परतलेले जवान आहेत. पण ते पुन्हा छावणीत परतल्यावर त्यांच्यावर प्रभावी उपाय करून त्यांना कोरोनामुक्त केले जात असल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे.




























































