
आयआयटी मुंबईसारख्या देशातील नामांकित आणि अग्रगण्य शिक्षणसंस्थेत पुन्हा मांसाहार-शाकाहार वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. पवई येथील कॅम्पसमधील हॉस्टेलच्या मेस कौन्सिलच्या अंतर्गत कमिटीने कॅण्टीनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी सहा टेबल्स राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी अशी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्याच्या निर्णयाविरोधात इतर विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध होत आहे.
पवई परिसरात असणाऱ्या आयआयटी संस्थेत एकूण तीन विद्यार्थी वसतिगृह आहेत. गेल्या जुलैमध्ये आयआयटीतील मुख्य कॅण्टीनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना वेगळी आसन व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणी मासांहार करणारा विद्यार्थी गेला असता त्याला अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकरण समोर आले होते. यामुळे मोठा वाद झाला होता. आता शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी स्वतंत्र व्यवस्थाच आयआयटी मुंबईने केली आहे. त्यामुळे पुन्हा विरोध होण्याची शक्यता आहे.
शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी सहा टेबल्स राखीव ठेवले आहेत.तसेच सहा शाकाहारी टेबल्सवर विशेष खुणा असतील.
हा नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर शांतता बिघडवल्याचा ठपका ठेवून कारवाई करण्यात येईल.
आयआयटीतील 12, 13 आणि 14 या वसतिगृहांमधील सर्व विद्यार्थ्यांना याविषयीचे ई-मेल पाठवण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांकडून पुन्हा विरोधाची शक्यता
कॅण्टीनमध्ये जेवताना मांसाहारी भोजन पाहून किंवा त्याचा वास सहन न झाल्याने शाकाहारी विद्यार्थ्यांना प्रकृतीच्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे कॅण्टीनमध्ये शाकाहारी असणाऱयांसाठी सहा वेगळे टेबल्स असणे, ही गरजेची गोष्ट असल्याचेही ई-मेलमध्ये म्हटले आहे. विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या या ई-मेलमध्ये वॉर्डन, मेसचे सदस्य, मेस कौन्सिलर यांचा समावेश आहे. गतवेळी शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सोय केली असल्याने इतर विद्यार्थ्यांनी याला विरोध करत ट्विटरवरून ही कुचंबणा असल्याचे सांगत आवाज उठवला होता. त्यानंतर आयआयटी वसतिगृह सरचिटणीसांकडून विद्यार्थ्यांना ई-मेल पाठवून कॅण्टीनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशी कोणतीही विभागणी केली नसल्याचे स्पष्ट केले होते. आता थेट स्वतंत्र टेबल आणि नियमावली विद्यार्थ्यांना मेलवर पाठवल्याने पुन्हा विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



























































