मुद्दा – कोलाम आदिवासी – विकासाचा सूर्य कधी उगवणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिषेक भटपल्लीवार

चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील घोडनकप्पी हे कोलाम आदिवासी समुदाय असलेले गाव. चारही बाजूने निसर्गरम्य डोगरांनी वेढलेल्या या कोलाम गुडय़ात विकासाची किरणे अजूनही पोहोचली नाही. ना रस्ता आहे, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. ना आरोग्य सुविधा आहे, ना दळणवळणाची साधने. डोंगरातील कोलाम आदिवासींच्या ’घोडनकप्पीत’ विकासाचा सूर्य उगवणार तरी कधी? हा प्रश्न आहे. जिवती तालुक्यातील भारी गट ग्रामपंचायतीअंतर्गत घोडनकप्पी हे दोन कोलाम व गोंड समुदायाचे गुडे आहेत. 17 सप्टेंबर 1948 पर्यंत निजामाच्या अधिपत्याखाली असलेल्या या गुडय़ांचा आजही विकास नाही.

बांधलेल्या घरांना आग लागली आणि भुकेपोटी गावाने घराची पत्रे विकली. घोडनकप्पी हे गाव दोन भागांत विभागले आहे. एक डोंगरावर व एक डोंगराच्या खाली. येथे राजगोंड व कोलाम समुदायाची सध्या 25 घरे आहेत. तिसेक वर्षापूर्वी या गावात तब्बल 200 घरे होती. 1991- 1992 साली हा भाग नक्षलग्रस्त असताना घोडणकप्पी गावाला आग लागून संपूर्ण गाव जळून खाक झाले. अत्र, वस्त्र, निवारा या तिन्ही गोष्टी निसर्गाने हिरावून घेतल्यानंतर पोटाची भूक भागविण्यासाठी संपूर्ण गाव अस्ताव्यस्त झाले. अनेकांनी गाव सोडले. कोण कुठे गेले याचे पुरावेही नाहीत. 1994-1995 ला कोलाम शोध मोहिमेअंतर्गत माजी आमदार वामनराव चटप यांनी गावापासून 1 कि.मी. अंतरावर टेकडीवर 16 घरे येथील कोलाम, आदिवासी बांधवांना बांधून दिली. परिस्थिती इथेच थांबली नाही. टेकडीवर पाण्याची व्यवस्था नसल्याने डोंगराच्या पायथ्याशी एक कि.मी. खाली उतरून तहान भागवावी लागत होती. दिवस लोटत गेले. भुकेपोटी टेकडीवरील घराचे पत्रे, सामान विकून येथील नागरिकांनी मूळ गावात आपले वास्तव्य सुरू केले. जळलेल्या घरांचे सांगाडे अजूनही गावात उभे आहेत.

मूलभूत सुविधा सोडाच, प्यायला पाणी, मुलांना शाळेत जायला रस्ताही नाही. घोडनकप्पी या डोंगरावरील गावात पोहोचायला साधा रस्ताही नव्हता. स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच गावात जायला कच्चा रस्ता शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बनवला. मात्र 150 फुटांपेक्षा जास्त डोंगराखाली वसलेल्या मुख्य गावात जायला अजूनही रस्ता नाही. डोंगर चढून उतरूनच गावात ये-जा करावी लागते. डोंगरावर इयत्ता 4 थीपर्यंत शाळा आहे. मात्र शाळेत जायला रस्ताच नसल्याने पावसाळ्यात मुले शाळेत डोंगर चढून जाऊ शकत नाहीत. येथे यंदाच सौर ऊर्जेवर पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बसवण्यात आली. मात्र या टाकीतील पाणी पोहोचत नसल्याचे गावकरी सांगतात. अजूनही गावकरी जुन्या पडक्या विहिरीतील व नाल्यातील पाणी आणूनच तहान भागवतात.

गावकरी म्हणतात की, आमच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. गावात रस्ता नाही, पिण्याचे पाणी नाही, राहायला पक्की घरे नाहीत, खाण्यासाठी पुरेसे अन्न नाही. गावातील कोणी आजारी पडले तर खाटेवर उचलून कोसो दूर डोंगरदऱयांतून न्यावे लागते. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गावातील नागरिक ग्रामसभेतून मिळणारी माहिती, मिळणारे हक्क या सर्व बाबींपासून वंचित राहिले आहेत. आमच्या सरकारी योजना कुठे गेल्या? आम्हाला रस्ता, मूलभूत सुविधा द्या असे मत गावपाटील रामलू जुमनाके व गावकरी व्यक्त करतात.