लेख – मानवतेसाठी हवामान बदलाचा :‘कोड रेड’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अजित कवटकर

हवामान बदलाचे भयावह परिणाम हे सुस्पष्ट स्वरूपात जोपर्यंत मांडले जात नाहीत तोपर्यंत त्याकडे कुणीही लक्ष देणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा सततचा भडिमार होणे आवश्यक आहे. शाळा- महाविद्यालयांतून यातील अनेक विषयांवर प्रकल्प करणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केले गेले पाहिजे. निसर्ग संरक्षण, पर्यावरण संवर्धन यासाठी दिलेल्या परिणामकारक योगदानांचा विशेष सन्मान झाला पाहिजे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे यावर संयमाने, सातत्याने व सर्वसमावेशकतेने कार्य करत राहिल्यास बदल नक्की दिसून येईल आणि तोही अनुकूल.

कल्पनारम्यतेची परिसीमा गाठत हॉलीवूड चित्रपटांमध्ये जलप्रलयातून जगबुडी दाखविण्याचा अतिरंजित अतिशयोक्तीपणा हा काही दशकांपूर्वी केवळ कल्पकतेचे एक रोमांचकारी प्रदर्शन वाटायचे. अशक्य असणाऱया गोष्टी पडद्यावर दाखवून दिग्दर्शकाने आपली अद्भुत कल्पनाशक्ती जगासमोर सादर केल्याचे तेव्हा वाटायचे. परंतु प्रकाशवेगाहून अधिक गतिमान असणारी मानवाची विचारशक्ती भविष्यात घडू शकणाऱया अकल्पित गोष्टींचा फार अगोदरच बहुदा वेध घेऊ शकते. याचा प्रत्यय येण्याचे निमित्त ठरले ते संयुक्त राष्ट्राच्या ‘इंटर-गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ने सादर केलेल्या अहवालातून. मानवतेसाठी ‘कोड रेड’ असणाऱया यातील तथ्यांवर गांभीर्याने विचारमंथन होऊन पर्यावरणाच्या दृष्टीने अनवधानाने झालेल्या वा जाणीवपूर्वक होत असलेल्या चुका न सुधारल्यास अथवा त्यातून काही सकारात्मक बदल न घडविल्यास उष्णता (तापमान) पुढे जाऊन ती पातळी गाठेल, ज्यातून वणवा, महापूर, वादळं, हिमस्खलन, दुष्काळ, तीव्र उष्णतेच्या लाटा, बर्फाची वादळं वगैरे नित्याचेच व सहज घडतील.

सदर अहवालाने स्पष्टपणे मानवाला या हवामान बदलासाठी आणि त्यातून अनुभवास येत असलेल्या व भविष्यात भोगाव्या लागणाऱया आपत्तींसाठी जबाबदार धरले आहे. पृथ्वीचा विनाश करण्यात अग्रभागी असलेल्या कोळसा व जैविक इंधनांसाठी, मृत्युचा घंटानाद केला जावा, असे या अहवालातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱया काही वर्षांत जागतिक तापमान हे पूर्व औद्योगिक जगाच्या सरासरीपेक्षा 1.5 डिग्री सेल्सियसहूनदेखील अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास नैसर्गिक आपत्ती या नित्याचीच बाब होऊन बसणार. निसर्ग कधीच कशाही बाबतीत कुणाशीही भेदभाव करत नसल्यामुळे, त्याच्या विध्वंसकारी तडाख्यापुढे संपत्ती, सामर्थ्य, अधिकार वगैरे सर्व कमजोर पडणार, उद्ध्वस्त होणार. भविष्यातील या विनाशकारी धोक्यांचा अंदाज बांधत, 2015 मध्ये जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या उद्देशाने जागतिक पातळीवर केला गेलेला पॅरिस करार हा 197 देशांनी मान्य केला. परंतु सदर करारात नमूद उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी करावयाच्या कृतीचा खऱया अर्थाने अजून कुठेच श्री गणेशा झालेला नाही. प्रत्येकजण सध्या दुसऱयाची बेजबाबदारी दाखवत, स्वतःची न पार पाडलेली जबाबदारी लपविण्याचा प्रयत्न करत आहे. ही स्वार्थी व आत्मघाती मनोविकृती लक्षात घेऊन असा अनुमान करण्यात येत आहे की पुढे 1.5 डि.से. पासून 2.0 डि.से.पर्यंतच्या तापमानवाढ सरासरीचा पल्ला गाठायला जास्त अवधी लागणार नाही. त्यामुळे हवामान बदलाचे दिसू लागलेले परिणाम आता रोखणे अशक्य आहे.

संपूर्ण ग्रीनलॅण्डवर पसरलेली बर्फाची चादर ही निरंतर वितळतच जाणार, जी समुद्राची पाणी पातळी वाढण्यास कारणीभूत ठरणार. यामुळे पाण्याचा फुगवटा होऊन सागर रुंदीकरणाची सुरू असलेली प्रक्रिया ही यापुढे शतकानुशतके अशीच सुरू राहणार. ऋतुचक्रात आमूलाग्र बदल होणार. त्यावर आधारलेली शेती व जीवन यांस त्याप्रमाणे समायोजित करावे लागणार. हे न जमणाऱयास विलुप्ततेचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि असे करणाऱयांमध्ये या पृथ्वीवरील अगणित प्रजाती असणार आहेत. निसर्ग अधिकाधिक अनिश्चित व बेभरवशाचा होत जाणार. एकूणच काय तर, पृथ्वीवरील जीवन अस्ताव्यस्त होणार. सध्या दिसू लागलेले भौगोलिक बदल याचे संकेत देऊ लागले आहेत. निरंतर होत असलेल्या हरितगृह वायूंच्या अमर्याद उत्सर्जनामुळे महासागरांत मोठय़ा प्रमाणात आम्लीकरणाची प्रक्रिया होत आहे. पृथ्वीवरील बर्फाचे आच्छादन हळूहळू कमी होत आहे. आर्टिक प्रदेश बर्फविरहित होण्याची शक्यता दाट होत चालली आहे. हिमनद्यांचे आकुंचन होत आहे. पुढे दवमुक्त हंगाम अनुभवायला मिळतील. हवेतील आर्द्रता वाढत जाणार. महासागर? अगोदरहून अधिक उबदार होणार आणि त्यामुळे निर्माण होणाऱया चक्रीवादळांचे सातत्य व तीव्रता प्रलयकारी पातळी गाठणार. जैवविविधता इतकी नष्ट होणार की आज दिसणारे पशु, पक्षी, वनस्पती यांतील काही पुढे असतीलच, दिसतीलच असे नाही.

आपण आजपासून जरी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास प्रामाणिकपणे व परिणामकारकपणे प्रारंभ केला तरी 1.5 डि.से.ची वाढ ही आपल्याला 2040 पर्यंत गाठणार यात शंकाच नाही. परंतु आपण सकारात्मक बदल रुजविल्यास होत असलेल्या हवामान बदलाची आणि त्याच्या घातक परिणामांची नकारात्मकता मात्र आपल्याला काही प्रमाणात कमी अथवा शिथिल करता येईल. जागतिक तापमानवाढ व हवामान बदल सर्व नैसर्गिक व आर्थिक प्रणालींवर प्रतिकूल व दूरगामी परिणाम करणार एवढे निश्चित. वाढणारी लोकसंख्या अधिकाधिक उत्पादनाला प्रोत्साहित करते, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन हे तेवढेच अधिक होत राहणार. मग, 2.0 डि.से. पर्यंतची झेपदेखील याच जन्मी बघण्याचे दुर्दैव या पिढीला अनुभवायला मिळणार. परंतु त्या टप्प्यावर, आपण या सुंदर, समृद्ध, जीवनदायी निसर्गाला क्रूर, संहारक, जिवघेणा बनवलेले असणार. इतके की, विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये साधलेली प्रगतीदेखील मनुष्याला तेव्हा निसर्गाच्या त्या प्रकोपापासून सुरक्षित ठेवण्यास कमजोर पडणार.
पर्यावरणस्नेही इंधन, तंत्रज्ञान व निसर्गप्रेमी वर्तणुकीवरच आपल्याला प्रदूषणापासून सावरता येईल. केवळ एक व्यक्ती, संस्था वा राष्ट्राने त्याचा अंगीकार करून ते साध्य होणार नाही. प्रत्येक राष्ट्राची व या पृथ्वीवर वास्तव्य करणाऱया प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी असणार आहे आणि खासकरून विकसित राष्ट्रांची तर सर्वाधिक. अन्यथा शाश्वती कशाचीच उरणार नाही. मनुष्य ज्या प्रगतीसाठी, विकासासाठी एवढा अट्टहास करतो आहे ते सारं काही शुद्ध निसर्गाशिवाय व्यर्थ असणार, उपभोगता येणार नाही. आपल्या अविचारी स्वार्थातून, उद्ध्वस्त होत असलेला निसर्ग व त्या जखमेचा प्रत्येक व्रण याचे आता प्रत्येकासमोर प्रत्येकवेळस प्रदर्शन हे झालेच पाहिजे. हे कशामुळे झाले? हे झाल्यामुळे पुढे याचे काय परिणाम असणार आहेत? असे पुन्हा होऊ नये यासाठी काय अपेक्षित आहे? यावर प्रसारमाध्यमांतून चर्चा होणे अत्यावश्यक आहे. हवामान बदलाचे भयावह परिणाम हे सुस्पष्ट स्वरूपात जोपर्यंत मांडले जात नाहीत तोपर्यंत त्याकडे कुणीही लक्ष देणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा सततचा भडिमार होणे आवश्यक आहे. शाळा- महाविद्यालयांतून यातील अनेक विषयांवर प्रकल्प करणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केले गेले पाहिजे. निसर्ग संरक्षण, पर्यावरण संवर्धन यासाठी दिलेल्या परिणामकारक योगदानांचा विशेष सन्मान झाला पाहिजे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे यावर संयमाने, सातत्याने व सर्वसमावेशकतेने कार्य करत राहिल्यास बदल नक्की दिसून येईल आणि तोही अनुकूल.