लेख – हिंसा-दुर्घटनांचे ‘रंजक’ प्रदर्शन आणि समाज परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अजित कवटकर

समाज आज इतक्या ‘बॉयलिंग पॉइंट’वर येऊन पोहोचण्याच्या अनेक कारणांपैकी हे हिंसा-दुर्घटनांचे ‘रंजक’ प्रदर्शन विशेष कारणीभूत आहे. प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा होत. समाजाचे प्रतिबिंबच त्यावर उमटत असते. त्याअनुषंगाने त्यांना घडलेली प्रत्येक चांगली-वाईट बातमी दाखवणे क्रमप्राप्त ठरते, परंतु हे करत असताना आपल्या बातमीचा समाजमनावर वाईट परिणाम होऊन त्या वाईटाचे अनुकरण, पुनरावृत्ती होणार नाही. किंबहुना, त्यातून लोकांना योग्य तो बोध प्राप्त होईल व समाजप्रबोधन घडेल अशा पद्धतीने तिचे सादरीकरण करण्याची जबाबदारी त्यांनी कटाक्षाने पाळली पाहिजे. इंटरनेटवरून व्हायरल होणाऱया अशा चित्रफितींना कात्री लावण्याची उपाययोजना शासन पातळीवरून होणे गरजेचे आहे. क्रांती घडवून आणण्याची क्षमता, सामर्थ्य हे प्रसारमाध्यमांमध्ये आहे. त्यांनी ती सकारात्मक घडवावी हे अपेक्षित आहे.

सनसनाटी, वादग्रस्त, धक्कादायक बातम्या टीआरपी वाढवत असल्यामुळे सर्वच अशा प्रकारच्या ‘नरेटिव्ह’वर भर देताना दिसत आहेत. आपण काय दाखवत आहोत, प्रेक्षकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, यामुळे समाजात कसले संस्कार रुजतील याचे कसलेच भान न ठेवता फक्त आणि फक्त आपली ‘व्हय़ुअरशिप’ वाढविण्यासाठी अधिक भयावह पद्धतीने सादर करण्याची स्पर्धा सध्या दिसून येत आहे. ज्याचे दुष्परिणाम समाजविघातकच ठरणार आहेत. प्रसारमाध्यमे जनमत तयार करण्याची क्षमता बाळगतात आणि तेच जर मर्यादा सोडून वागू लागले तर मग अराजकता ही त्यांचीच उत्पत्ती असेल. भरस्त्यात कोयत्याने मुडदा पाडला जात असतानासारखे अनएडिटेड व्हिडीओ दाखविण्याचा आततायीपणा करणे हा असंयम, असंवेदनशीलतेचा कळस गाठण्याची चेष्टा करण्यासारखे होय. धडकी भरवणारे चित्र वा चित्रफिती या विचार,मनावर ताण निर्माण करतात, अशांत करतात, दहशतीचा अंमल चढवतात, लय व संतुलन बिघडवतात. सुदृढ मन हे या आघातांपासून दुसऱयाच क्षणाला स्वतःला विलग करू शकते, परंतु अशा बातम्यांचा जर सातत्याने भडिमार होतच राहिला तर मनावर ताबा ठेवणाऱयांचेदेखील स्वतःवरील नियंत्रण सुटून त्यांचे मन कलुषित, विकृत होण्यास वाव मिळतो. दृष्टिकोन बदललेल्या या अशा मनोविकृती मग समाजासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे धोकादायक ठरू शकतात.

हाणामारी, खून, जीवघेणे अपघात, आत्महत्या, विनयभंग, मृतावशेष वगैरेंचे व्हिडीओ प्रसारमाध्यमांवरून जेव्हा मीठ-मसाला लावून, भयावह आवाजांची पार्श्वभूमी निर्माण करून दाखवले जातात, तेव्हा ते बघणाऱयांमध्ये लहान मुलं, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, महिला, मनाने कमजोर असणारे असे अनेक असतात हे लक्षात घेतले पाहिजे. सातत्याने दाखवल्या जाणाऱया अशा विचित्र दृश्यांचा संवेदनशील मनावर प्रतिकूल परिणाम होऊन ते मनोविकारासदेखील कारणीभूत ठरू शकतात. त्यांच्या या अपायकारक परिणामकारकतेचा प्रादुर्भाव हा एखाद्या महामारीपेक्षाही अधिक घातक व तणावग्रस्त ठरू शकतो. तरुण पिढीतील लयाला जात असलेली सहिष्णुता, करुणा, कृतज्ञता यास हा दृकश्राव्य माध्यमांवरील प्रदर्शित होणारा बीभत्स मनोरंजनाचा दहशतपूर्ण अवतार विशेष कारणीभूत आहे. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या प्रकाशझोतात दाखवला जाणारा हा भेसूरपणा इतका ठासून, रंगवून समोर ठेवला जातो की, मानसिकदृष्टय़ा कमकुवत, अस्थिर असणारी व्यक्तिमत्त्व याचा निषेध करण्याऐवजी त्यांना ते त्यांच्या समस्यांच्या निवारणासाठीचा एक पर्यायच समजू लागतात आणि म्हणूनच मग एखाद्या पद्धतीने घडलेल्या, प्रसिद्ध झालेल्या गुह्याचे अनुकरण होण्यास वेळ लागत नाही. विकृतीचा ‘ट्रेंड’ पडणे याहून अधिक विकृत ते काय? या हिंसक अवगुणांचे होणारे ‘रील टू रीयल’ वहन आता ‘कट’ करण्याची वेळ आली आहे.

चालत्या ट्रेनच्या दरवाजात लटकून केले जाणारे जीवघेणे स्टंट्स व्हायरल झाल्यानंतर अशी सर्कस अनेक जणांकडून केली जाऊ लागली. यात अनेकांनी जीव गमावल्यानंतर व पोलिसांनी आपला दंडुका फिरवल्यानंतर हे माकडचाळे शांत झाले. परीक्षेत अपयश आल्याच्या निराशेतून केल्या गेलेल्या आत्महत्येला लगेच इतर अनेक ठिकाणांहून दुजोरा मिळतो. एका गँगवॉरने दुसऱया गँगवॉरला उत्तेजित केलेच पाहिजे इतके त्याचे उदात्तीकरण केले जात आहे. भरधाव वेगात एका गाडीने दुसऱया वाहनाला, विशेषतः बाइकस्वाराला धडक देऊन चिरडण्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. धावत्या ट्रेनखाली सापडले जाण्याचे व्हिडीओ तर हल्ली ‘गुड मॉर्निंग’ मेसेजप्रमाणे नित्यनेमाने असतात. घरातील, गल्लीतील, शिवारातील भांडणांमध्ये फोडली जाणारी डोकी दाखवणे हे तर काही चॅनल्सची ‘यूएसपी’ आहे. संवेदना बोथट करणारे क्रूरकर्म बघण्यास अधिक पसंती असणाऱयांचा वर्ग मोठा आहे, वाढतो आहे आणि त्याच दृष्टीने मागणीला पर्याप्त पुरवठा करण्याचे अर्थकारण सध्या प्रक्षेपित होताना दिसत आहे, पण याचे काय व किती दूरगामी दुष्परिणाम होताहेत याचे भान मात्र कोणालाच नाही का?

दिवसाढवळय़ा भररस्त्यात होणाऱया मारामाऱया आणि त्यात सपासप वार करून घेतला जाणारा एखाद्याचा जीव हा आजच्या पिढीसाठी मनोरंजनाचा विषय व ‘न्यू-नॉर्मल’ झाले आहे आणि म्हणूनच घटनास्थळी उभे राहून त्याचे व्हिडीओ काढून वायरल करणे ‘हॅपनिंग’ ठरत आहे. यातून मनाची अशी काही प्रवृत्ती निर्माण होते की, पुढे स्वतःच्या बाबतीत असा काही विवादास्पद प्रसंग, परिस्थिती उभी राहिली की, मग कारण वा मुद्दा कितीही क्षुल्लक जरी असला तरी त्यास त्याच हिंसक पद्धतीनेच प्रतिक्रिया देण्याची ऊर्मी जागृत होते. त्यातूनच आयुष्याला नरकात लोटणाऱया अनपेक्षित घटना घडताना दिसतात. हिंसक नकारात्मकतेच्या सततच्या भडिमारामुळे अशी खुनशी विचारसरणी तयार होते की, त्यास सामोपचाराच्या, समजूतदारपणाच्या पठडीतील कोणता पर्याय सुचतच नाही. समाज आज इतक्या ‘बॉयलिंग पॉइंट’वर येऊन पोहोचण्याच्या अनेक कारणांपैकी हे हिंसा-दुर्घटनांचे ‘रंजक’ प्रदर्शन विशेष कारणीभूत आहे. आदर्श, अभिमानास्पद, सुसंगत वर्तवणुकीचा आजच्या तरुण पिढीने केलेला त्याग हा जाणीवपूर्वक नसून तर त्यांच्या सुप्त मनाने या नकारात्मकतेने निर्माण केलेल्या आभासी हिंसक विश्वाला वास्तविकता समजून प्रतिकाराची भूमिका अंगीकारली आहे. याचा संसर्ग जेव्हा प्रत्येकाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे शिवणार, तेव्हा प्रत्येक मनुष्य जीवन हे अमानुषतेचे प्रसरण करणार.

प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा होत. समाजाचे प्रतिबिंबच त्यावर उमटत असते. त्याअनुषंगाने त्यांना घडलेली प्रत्येक चांगली-वाईट बातमी दाखवणे क्रमप्राप्त ठरते, परंतु हे करत असताना आपल्या बातमीचा समाजमनावर वाईट परिणाम होऊन त्या वाईटाचे अनुकरण, पुनरावृत्ती होणार नाही. किंबहुना, त्यातून लोकांना योग्य तो बोध प्राप्त होईल व समाजप्रबोधन घडेल अशा पद्धतीने तिचे सादरीकरण करण्याची जबाबदारी त्यांनी कटाक्षाने पाळली पाहिजे. यातून समाज घडविणे, सुसंस्कार करणे ओघानेच होते. एखादी किंवा एखाद्यावर कोसळलेल्या आपत्ती, दुर्घटनेतून इतरांना योग्य समज मिळावी, त्यांच्यावर तो प्रसंग ओढवला जाऊ नये असे बातमी देण्यामागील उद्दिष्ट बाळगल्यास बरंच काही मोठय़ा प्रमाणात शांत, सौम्य, सात्त्विक होईल. इंटरनेटवरून व्हायरल होणाऱया अशा चित्रफितींना कात्री लावण्याची उपाययोजना शासन पातळीवरून होणे गरजेचे आहे. क्रांती घडवून आणण्याची क्षमता, सामर्थ्य हे प्रसारमाध्यमांमध्ये आहे. त्यांनी ती सकारात्मक घडवावी हे अपेक्षित आहे, पण तसे होण्यासाठी प्रत्येक नागरिक हादेखील तितकाच किंवा त्याहून अधिक जबाबदार असणार आहे.

– [email protected]