सिनेमा – अमरसिंह चमकीला

>> प्रा. अनिल कवठेकर

‘अमरसिंह चमकीला’ 80 च्या दशकातील पंजाब म्युझिक इंडस्ट्रीमधील सर्वाधिक प्रसिद्ध गायक. मृत्यूच्या 36 वर्षांनंतर त्यांच्यावरील चरित्रपटामुळे त्यांचे जीवन आणि तो काळ पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांच्याविषयीचे गूढ वलय पुन्हा एकदा रसिक अनुभवत आहेत.

ज्या ‘अमरसिंह चमकीला’ हा एक उत्तम बायोपिक. संपूर्ण चित्रपटाची मांडणी एखाद्या आत्मचरित्रासारखीच आहे. आत्मचरित्र ही चित्रपटाची कथा असल्यामुळे एकाच वेळा पडद्यावर तीन व्यक्तिरेखा चमकीलाची कहाणी सांगताना आपल्याला दिसतात आणि या तीनही व्यक्तिरेखा कहाणी सांगत असताना त्याची कुठेही गुंतागुंत होत नाही.

हा चित्रपट पंजाबी भाषेत असल्यामुळे त्याचे संवाद बऱयापैकी लक्षात येतात, पण त्याची गाणी मात्र लक्षात येत नाहीत. हा संपूर्ण चित्रपट एका अमरसिंह चमकीला नावाच्या गायकाच्या जीवनाचा मागोवा घेणारा आहे. त्याची गाण्याची शैली, ज्याला अश्लील गाणी किंवा द्वय़र्थी गाणी म्हणून लोकांनी हिणवलं, पण प्रत्यक्षात मात्र संपूर्ण पंजाब त्याच्या प्रेमात पडला होता. पंजाबच काय, पण कॅनडा, दुबई अशा ठिकाणी जाऊन त्यांनी शो केलेले आहेत. त्याच्या गाण्यातून येणारे स्त्राrच्या सौंदर्याचे वर्णन हे प्रत्येक तरुण, वृद्ध, मध्यम वयाच्या माणसाच्या मनातलं वर्णन होतं. बऱयाचदा माणसाला तसं बोलणं सुचत नाही किंवा अवघड वाटतं, पण चमकीलाने मात्र माणसाच्या मनाची थैली भाजी बाजारात जशी उघडून ठेवतात तशी उघडून ठेवली आणि त्यामुळे लोक चमकीलाच्या गाण्याच्या प्रेमात पडले. चमकीलाच्या कॅसेट आणि रेकॉर्ड इतक्या खपल्या की, त्याच्या समकालीन असणारी सगळी गायक मंडळी यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आणि अतिशय सामान्य पद्धतीने राहणाऱया, जगणाऱया चमकीलाला आता वेगवेगळ्या क्षेत्रांतून शत्रू निर्माण झाले.

पडद्यावर 1988 साल दिसते आणि चित्रपट सुरू होतो. पंजाबमधल्या कुठल्या तरी एका गावामध्ये लोक चमकीलाची वाट पाहत आहेत. निवेदक तो कुठपर्यंत आला, पोहोचला, येत आहे वगैरे सगळं रसभरीत वर्णन करत आहे. जमाव खूपच मोठा आहे. चमकीलाची गाडी मंडपाच्या जवळ उभी राहते. चमकीला गाडीतून बाहेर पडतो. त्याची बायकोही बाहेर पडते आणि त्याच्या बायकोच्या डोक्यात गोळी घुसते आणि दुसरी गोळी चमकीलाला ठार करते. दोघेही गाण्याच्या मंडपाच्या बाहेर मृत्युमुखी पडतात. इथून अमरसिंह चमकीलाची कथा सुरू होते. त्याच्या मृत शरीरासोबत आहेत अगदीच तीन-चार डोकी, त्याचे मित्र. पोलिस याबाबत कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत. अशा वेळी त्याच्या मित्रांना भीती असते ती म्हणजे काय घडेल की काय? कुठून गोळ्या येतील आणि मरण येईल. मृत्यूच्या ताणामध्ये मरण पावलेल्यांना सोबतीला घेऊन ते थांबलेले आहेत. इथूनच चमकीलाची गोष्ट सांगायला प्रारंभ होतो. चमकीलाचा एक मित्र त्या पोलिसाला चमकीलाची सगळी कथा सांगतो.

अमरसिंह शीख असल्यामुळे त्याने केस वाढवणे आवश्यक आहे, पण आपण गायक आहोत म्हणून केस कापल्यानंतर त्याचा बाप जेव्हा त्याला मारायला निघतो, तेव्हा बापाच्या समोर तो पैशांचे बंडल ठेवतो. अंधार पडलेल्या त्याच्या घरामध्ये झरोक्यातून येणाऱया प्रकाशात ते नोटांचे बंडल तो आपल्या बापाला देतो. तेव्हा या घरात प्रकाश येण्यासाठी गाणे हा एकमेव पर्याय आहे, असेही तो बापाला सुचवतो आणि बाप त्याला काही बोलत नाही. तसा चमकीला स्वभावाने अतिशय सामान्य माणूस आहे. छोटय़ा छोटय़ा गोष्टींना घाबरणारा आहे. बऱयाच ठिकाणी तो स्वत बोलत नाही तर त्याचा मित्र टीकाच बोलत असतो. त्यामुळे चमकीलाने सातत्याने घाबरून हा गायनाचा व्यवसाय निवडलेला आहे. त्याला जेव्हा धमकीची दोन पत्रं येतात तेव्हा तो खूप घाबरून जातो आपण आता गाणी म्हणावी की नाहीत? असा मोठा प्रश्न त्याच्या समोर पडतो, पण त्याचं मन त्याला सांगतं, एवढय़ाशा कारणासाठी आपल्याला कोण ठार करणार आहे आणि आपण जशी गाणी गातो तशीच गाणी सगळे जण गात असतात. आपण काय वेगळं करत नाही हे त्याला माहीत असतं, पण त्याची होणारी प्रगती ही नक्कीच कुणाला तरी छळत असते.

त्याच्या स्वतच्या काही श्रद्धा आहेत. उदाहरणार्थ, जिंदा. त्याला तो गुरू मानतो. त्यामुळे जिंदाचे कार्पाम आपण करू नयेत असे त्याला वाटत असते. एका गावामध्ये ज्याला चमकीला गुरू म्हणतो त्या जिंदाचा कार्पाम होणार असतो. कार्पामाला उशीर होतो. आलेले प्रेक्षक आरडाओरडा करायला लागतात तेव्हा मॅनेजर अमरसिंहला गाणे गायला सांगतो. अमरसिंहला ते पटत नाही. कारण तो जिंदाला आपला गुरू मानत असतो, पण जर कार्पाम लवकर सुरू केला नाही तर प्रेक्षक हुल्लडबाजी करून सगळेच संपवून टाकतील म्हणून तो मोठय़ा नाराजीने तयार होतो, पण जिंदाबरोबर गाणारी गायिका मात्र या अमरसिंहसारख्या सामान्य नोकराबरोबर गायला तयार नसते. म्हणून पुरुषांचे आणि स्त्राrचे दोन्ही गाणे अमरनेच गावे असे ठरते, पण अमर जेव्हा गायला सुरुवात करतो तेव्हा त्याला प्रेक्षकांचा जो काही रिस्पॉन्स मिळतो ते पाहून ती गायिका स्टेजवर येते आणि अमर अर्थात चमकीला आणि ती दोघे गाण्यामध्ये धमाल उडवून देतात. त्यांचा हा कार्पाम होत असतानाच जिंदाचे त्या ठिकाणी आगमन होते. जिंदा गायला सुरुवात करणार, पण लोक सांगतात आम्हाला चमकीलाची गाणी ऐकायची आहेत. अनाऊन्समेंट करणाऱयाने अमरसिंहचे टोपणनाव सांगताना ‘चमकीला’ असे चुकीचे नाव सांगितलेले असते आणि ते चुकीचेच नाव पुढे त्याला कायमस्वरूपी चिकटते. पुढे बबीच्या रूपात त्याला एक गायिका मिळते आणि परिस्थितीवश दोघे लग्न करतात. याचदरम्यान चमकीलाला धमकीची पत्रं येणे सुरू होते. चार-पाच जण त्याच्या घरी येऊन आपण तुझे फॅन आहोत असे सांगता सांगता असली गाणी गाऊ नकोस, असेही त्याला ठणकावतात व त्याच्याकडून खंडणी घेऊन जातात.

तरुण मुलं-मुली, मध्यमवयीन, वृद्ध…सर्वच चमकीलाच्या गाण्याचे फॅन असतात. त्यामुळे तो जेव्हा द्वय़र्थी गाणी गाण्याचे बंद करून केवळ परमेश्वराची गाणी गायला लागतो तेव्हा त्याला परत जुनी गाणी गाण्याची फर्माईश येत राहते.

1984 च्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मुळे पंजाबमध्ये पेटलेली दंगल, त्या दंगलीमुळे चमकीलाच्या कार्पामावर झालेला परिणाम तसेच अशा परिस्थितीत तो पंजाबच्या बाहेर जाऊन गायला सुरुवात करतो आणि लोकांना त्या परिस्थितीतून, त्या मानसिकतेतून बाहेर काढण्याचा सकारात्मक प्रयत्न करतो. तरी त्याला लोक गुन्हेगार ठरवतात. चमकीला चारी बाजूने आता या संकटात अडकतो. कॅनडामध्ये ज्या ठिकाणी अमिताभच्या कार्पामाला दीडशे खुर्च्या हॉलमध्ये एक्स्ट्रा लावाव्या लागल्या होत्या त्याच ठिकाणी चमकीलाच्या कार्पामाला हजार खुर्च्या एक्स्ट्रा लावाव्या लागल्या हे मॅनेजरने सांगितल्यावरही तो नाराज होतो. आपण उगीच कोणाचेही रेकॉर्ड मोडावे असे त्याला मनापासून वाटत नाही. कॅनडा येथे गेल्यानंतरही तेथील काही धर्मगुरू त्याला ठणकावून सांगतात, तुला दारू पिता येणार नाही. तुला अश्लील गाणी गाता येणार नाहीत, परंतु आतापर्यंत घाबरून जगणारा चमकीला आता मृत्यू स्वीकारायला तयार झालेला असतो. तो ठरवतो की, आपण असेही मरणार आहोत, तसेही मरणार आहोत. तेव्हा आता आपल्या इच्छेप्रमाणे जगायचे आणि जे होईल त्याला सामोरे जायचे. त्या चार धर्मगुरूंशी बोलणी करून बाहेर आल्याबरोबर तो कारमध्ये बसल्यावर लगेच बीडीचे बंडल बाहेर काढतो. त्याचा मित्र त्याला खूप समजावून सांगतो, पण आता त्याचे नक्की ठरलेले आहे. घाबरून जगायचे नाही. यातून त्याने आता मरण स्वीकारले आहे हे स्पष्ट होते.

अमरसिंह अर्थात चमकीलाच्या मृत्यूची कथा मित्र पोलीस इन्स्पेक्टरला सांगत असताना पोलीस इन्स्पेक्टरला चमकीलाबाबत जणू काहीच माहीत नाही असे वाटते, पण जेव्हा चित्रपटाचा शेवट येतो तेव्हा त्या इन्स्पेक्टरच्या जीपमध्ये चमकीलाच्या कॅसेट असल्याचे दिसते. तो इन्स्पेक्टर जेव्हा आपल्या घरी जातो तेव्हा त्याला टेपरेकॉर्डरवर गाण्याचा आवाज येतो. चमकीलाचे गाणे चालू असते. तेव्हा तो इन्स्पेक्टर सांगतो, तुला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा तू चमकीलाची गाणी ऐकू शकतोस आणि इथे चित्रपट संपतो.

मुळातच परिणीती चोप्रा आणि दिलजीत या दोघांवर अवलंबून असलेला चित्रपट दोघांच्या अत्यंत साध्यासरळ अशा अभिनयाने नटलेला आहे. कुठलेही बेगडी सौंदर्य दोघांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. दिलजीत जितका ‘चमकीला’ वाटतो तितकीच परिणीती त्याची बायको वाटते. ती हिंदी चित्रपटातील नायिका आहे असे तिच्या दिसण्यात जाणवतच नाही. जणू काही एखाद्या पंजाबी लग्नाच्या अल्बममध्ये आपण दोघांचे फोटो पाहावेत तसे ते संपूर्ण चित्रपटात वावरत असतात. दिलजीतने घाबरणारा अमर ऊर्फ चमकीला आणि मृत्यूला सामोरा जाणारा चमकीला, त्याचे भोळेपण, त्याचे साधेपण, त्याचे नाटकीपण हे सगळे गुण अतिशय छान रंगवलेले आहेत. चित्रपटाचा पहिला अर्धा तास सोडला तर चित्रपट त्यानंतर आपल्या मनाची जी पकड घेतो तो शेवटपर्यंत सोडत नाही. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आहे. एक आत्मचरित्र वाचल्याचा सकस अनुभव हा चित्रपट आपल्याला देऊन जातो.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)