
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधील कामे तिथल्या प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रक्टर्सनी (पीएमसी) केली आहेत. याचा मुख्य उद्देश होता की, युद्धभूमीवर अमेरिकन सैन्याची उपस्थिती कमी करावी, ज्यामुळे ते मारले जाणार नाही किंवा जखमी होणार नाही. त्यांच्या जागी असलेले ‘पीएमसी’ युद्धभूमीच्या धोक्यांना सामोरे जातील. देशाच्या सैनिकांना असलेला धोका हा पीएमसीने भरती केलेले रिटायर्ड सैनिक घेत असतात. पीएमसी संस्था रिटायर्ड सैनिकी अधिकारीच चालवत आहेत आणि यामध्ये काम करणारे बहुतेक निवृत्त सैनिक आपापल्या क्षेत्रांमधले तज्ञ मानले जातात.
अमेरिका आणि अनेक विकसित राष्ट्रांना युद्धामध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा धोकेदायक परिस्थितीमध्ये त्यांच्या सैनिकांचे झालेले मृत्यू आवडत नाही. त्या त्या देशातील जनता, सरकारवर दबाव टाकते की असे मृत्यू व्हायला नकोत. असे असेल तर ही राष्ट्रे आपले राष्ट्रीय हित कसे सांभाळतील? अमेरिकेने अफगाणिस्तानच्या युद्धातून माघार घेतली. कारण तिथे गेल्या वीस वर्षांमध्ये त्यांचे 2500 हून जास्त सैनिक मारले गेले होते आणि त्याच्या चौपट सैनिक जखमी झाले होते, परंतु अनेकांना हे माहिती नाही की, त्यात प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रक्टर (Private Military Contrctors) म्हणजेच मृत्युमुखी पडलेल्या रिटायर्ड सैनिकांची संख्या 4500 हून जास्त आहे.
खासगी सुरक्षा एजन्सीज (Private Security Companies)/ प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रक्टर (Private Military Contractors) / पीएमसीची गरज का आहे, ते नेमके काय काम करतात, अफगाणिस्तान युद्धामध्ये यांचे योगदान काय होते, याविषयीचे विवेचन पुढीलप्रमाणे.
पीएमसी पैशाकरता युद्धभूमीवर अनेक अशी कामे करतात की, जी हिंदुस्थानमध्ये हिंदुस्थानी सैन्याच्या किंवा पोलीस आणि अर्धसैनिक दल यांच्या वेगवेगळ्या शाखा करत असतात. उदाहरणार्थ हिंदुस्थानी सैन्यामध्ये अन्नधान्य आणि तेल पुरवण्याकरिता आर्मी सप्लाय कोरचा वापर केला जातो. दारूगोळा आणि इतर युद्धाचे सामान पोहोचण्याकरिता आर्मी ऑर्डनन्स कोर असते. वेगवेगळी शस्त्रs आणि वाहने यांचे मेंटेनन्स आणि दुरुस्तीकरिता इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनीअर नियुक्त आहे. जखमी सैनिकांची देखभाल ही आर्मी मेडिकल कोरकडून केली जाते. रस्ते बांधणे किंवा नवीन पुलांची निर्मिती ही इंजिनीअर्सकडून केली जाते. दळणवळण किंवा कम्युनिकेशन्सकरिता सिग्नल कोर कार्यरत आहे.
पीएमसी ही एक खासगी कंपनी आहे, जी आर्थिक फायद्यासाठी सशस्त्र लढाई किंवा सुरक्षा सेवा प्रदान करते. पीएमसी त्यांच्या ऑपरेशनल तैनात जवानांना ‘सुरक्षा कंत्राटदार’ किंवा ‘खासगी लष्करी कंत्राटदार’ म्हणून संबोधतात. अमेरिकेत खासगी सुरक्षा व्यवसाय हा एक मोठा उद्योग आहे, जो हजारो निवृत्त सैनिकांना रोजगार देतो. या कंपन्या शॉपिंग मॉलमधील सुरक्षेपासून ते स्पेशल फ़ोर्सेसची कामे, व्हीआयपीचे रक्षण करतात. 2023 पर्यंत पीएमसी व्यवसाय 150 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे आणि ते फक्त अमेरिकेत. पीएमसीद्वारे दिल्या जाणाऱया सेवा आणि कौशल्य बहुतेक वेळा सुरक्षा, लष्करी किंवा पोलीस दलांप्रमाणे असतात. पीएमसी अधिकृत सशस्त्र दलांना पूरक सेवा पुरवतात. त्यांना शत्रुतापूर्ण प्रदेशांमध्ये खासगी कंपनीच्या परिसराच्या संरक्षणासाठी, कर्मचाऱयांसाठी अंगरक्षक नियुक्त केले जाऊ शकते. पीएमसी इंडस्ट्री 50 पेक्षा जास्त देशांमध्ये चालते. 1990 च्या दशकात प्रत्येक एक ठेकेदाराच्या तुलनेत 50 लष्करी कर्मचारी असायचे आणि आता विकसित देशांमध्ये हे प्रमाण 10 ते 1 आहे. या ठेकेदारांना अनेक कर्तव्ये आहेत. विकसनशील देशांमध्ये जसे इराकमधील तेल शुद्धीकरण कारखाने रक्षण करण्यासाठी नियुक्त केले जाते. जनरल इलेक्ट्रिकसारख्या पुनर्रचना प्रयत्नांचे करार करणाऱया आपल्या कर्मचाऱयांचे रक्षण करण्यासाठी त्यांना नियुक्त करतात, अधिकारी आणि सरकारी संलग्नांना सुरक्षित करतात. पिमसी अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांना जवळचे संरक्षण, त्यांचे टोही विमान आणि हेलिकॉप्टरचे पायलटिंग यामध्ये सामील होते. एका अभ्यासानुसार पीएमसी उद्योगाची किंमत 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. युनायटेड स्टेट्स इंटेलिजन्स कम्युनिटीमध्ये 29 टक्के पीएमसी कर्मचारी आहेत आणि कर्मचाऱयांचे बजेट 49 टक्के इतके पीएमसी करतात.
पीएमसीमुळे अनेकदा नुकसानसुद्धा होऊ शकते. उदाहरणार्थ जे काम सैनिक करतात तेच काम पीएमसीकडून करून घ्यायचे असेल तर त्याकरिता जास्त किंमत मोजावी लागते. यामुळे अनेक देशांतील स्पेशल फोर्सचे अधिकारी आणि सैनिक आपली सैनिकी सेवा सोडून पीएमसीमध्ये सामील झाले आहेत. ही परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, अनेक देशांना त्यांच्या सैन्यामध्ये प्रवेश करण्याकरिता देशाचे पुरेसे नागरिक मिळत नाहीत. आज अमेरिकेच्या सैन्यामधले तीस टक्के सैनिक हे अमेरिकेचे रहिवासी नाहीत आणि हाच प्रकार थोडय़ा जास्त प्रमाणामध्ये इतर युरोपियन देशांमध्ये आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे देश सैनिकांच्या ऐवजी पीएमसीचा वापर करतात.
आपल्या देशात मोठय़ा शहरांमध्ये सोसायटीजच्या सुरक्षेकरिता खासगी सुरक्षा रक्षक वापरले जातात. हिंदुस्थानी सैन्यामध्ये जी कंपनी शस्त्र बनवते त्यांनाच या शस्त्रांचे मेंटेनन्स कॉन्ट्रक्ट देण्यात येते. कारण त्यांची क्षमता अधिक असते. ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सकडून एखादे शस्त्र विकत घ्यायच्या ऐवजी त्याला काही काळ लिजवरती म्हणजे भाडय़ाने घेतले जाते. उदाहरणार्थ चक्र अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी अनेक वर्षे हिंदुस्थानी नौदलामध्ये भाडय़ावर काम करत होती. कारण हे स्वस्त पडते. समुद्रावरती/सीमेवरती स्वतःची ड्रोन्स वापरण्यापेक्षा काही ड्रोन्स हिंदुस्थानी भूदल आणि नौदलाने भाडय़ाने घेतली आहेत. येणाऱया काळामध्ये मिलिटरी बजेट कमी करण्याकरिता पीएमसी किंवा एखादे शस्त्र भाडय़ाने घेणे यांचे मोठे योगदान असू शकते, मात्र कुठलाही निर्णय पूर्ण विचार करूनच घेतला जावा.
तथापि, जिनेव्हा कन्व्हेन्शन्समध्ये नमूद केलेल्या संकल्पनेच्या संदर्भात, युद्ध क्षेत्रात सशस्त्र शक्ती वापरणारे कंत्राटदार बेकायदेशीर लढाऊ मानले जाऊ शकतात. लढाऊ क्षेत्रातील पीएमसींना भाडोत्री मानले जावे की नाही यावर वाद आहे. त्यामुळे सैनिकांना जिनेव्हा कन्व्हेन्शन्समध्ये मिळणारे संरक्षण पीएमसींना नाही. अमेरिकेत महत्त्वाची पीएमसी आहेत ब्लॅक वॉटर. रशियामध्ये वॅगनार या पीएमसीने अनेक देशांमध्ये रशियाकरिता विविध प्रकारची लष्करी कामे केली आहेत. काही चांगली आणि काही कायद्याचा गैरवापर करून. पीएमसीवर सैनिकी कमांड कंट्रोलसुद्धा जरुरी आहे. यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेचे वेळोवेळी विश्लेषण करून ते योग्यप्रमाणे काम करत आहेत हे यावर लक्ष ठेवले जावे, तरच पीएमसी एक फोर्स मल्टिप्लायर म्हणून देशाकरिता उपयोगी ठरू शकतात.






























































