एक प्रसन्न व्यक्तिभाव…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. दीनानाथ फुलवाडकर

प्रा. मधुकर गोपाळ देशपांडे हे नाव गंगाखेड-परभणी मराठवाडाभर चांगलेच प्रसिद्ध आहे. एक कथालेखक, समर्थ वक्ता, नभोनाटय़ लेखक, मराठी भाषेचे अभ्यासक आणि विशेष म्हणजे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक! हे सर्व सद्गुण आठवण्याचं कारण म्हणजे, त्यांचं नुकतंच निधन झालं. एक हसरं व्यक्तिमत्त्व काळाशी झुंज देत पुढच्या प्रवासाला निघून गेलं.

काही माणसांच्या सहवासातील सुगंधी क्षण नेहमीच हवेसे वाटतात, परंतु नियतीची कठोरता काही विलक्षण असते. तिच्या कार्याचा थांगपत्ता लागत नाही. अखेर माणूस हा तिच्या शक्तीपुढे हतबल होतो, हे मात्र नक्की.

प्रा. मधुकर गोपाळ देशपांडे हे नाव गंगाखेड-परभणी मराठवाडाभर चांगलेच प्रसिद्ध आहे. एक कथालेखक, समर्थ वक्ता, नभोनाटय़ लेखक, मराठी भाषेचे अभ्यासक आणि विशेष म्हणजे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक! हे सर्व सद्गुण आठवण्याचं कारण म्हणजे, या प्रसिद्ध व्यक्तीचं नुकतंच निधन झालं. हसरं व्यक्तिमत्त्व, परंतु गेल्या चार-पाच महिन्यांपासून असाध्य रोगाशी ते झुंज देत होते. नेहमीच सर्व आघाडय़ांवर विजय संपादन करणारे ‘मगो’ येथे मात्र पराजित झाले आणि निमुटपणे अनंताच्या यात्रेस निघून गेले.

गंगाखेड येथील संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी जे 1973 ते निवृत्तीपर्यंत अद्यापन कार्य केले ते सारे अविस्मरणीय असेच होते. पुण्याचा माणूस गंगाखेडसारख्या मागास खेडय़ात रमेल का, हा सर्वांनाच प्रश्न होता, परंतु आपल्या विनोदी अन् खेळकर वृत्तीमुळे ‘मगो’ खेडय़ात रमले. तीन-साडेतीन दशके पाहता पाहता निघून गेली. गंगाखेड कॉलेजच नव्हे तर पंचक्रोशीत ते लोकप्रिय झाले. प्राध्यापक हा केवळ महाविद्यालयाच्या भिंतीआड दडलेला असतो असे नव्हे, तर त्यांच्या ज्ञानकक्षा सर्वत्र व्यापलेल्या असावयास हव्यात अशा मताचे ते होते. ग्रामीण विद्यार्थी मुळात गुणवान असतो. त्यास संधी प्राप्त करून देणे, त्यावर अधिक परिश्रम घेऊन संस्कार करणे प्राध्यापकांचे लिखित नव्हे नैतिक कर्तव्य आहे. हा विचार त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिला होता.

अध्यापनासमवेत परिसरातील समाजजीवनही आपल्या प्रबोधनाने बदलावयास हवे. म्हणून त्यांनी नाटय़ चळवळ उभारली. नवतरुणांना हाताशी घेऊन सहयोग नाटय़ मंडळ, तमलास्वर दरबार यासाठी मार्गदर्शन करून तरुणांमधील कलागुणांना प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी बाहेरील इच्छुक शिक्षक-कर्मचारी यांनी लेखनाचा छंद जोपासावा म्हणून वि. श. गौतम, बा. बा. भोटेबे, शिवाजी मरगीळ आदींना हाताशी धरून ‘कथानाद’ मंडळाची स्थापना करून, सातत्याने तो लेखनयज्ञ तीन-चार वर्षे सुरू ठेवला. यातून अनेक नवोदितांना प्रोत्साहन मिळून ते लिहिते राहिले. त्यांचे साहित्य महाराष्ट्र व बृन्ममहाराष्ट्रभर प्रसिद्धीस पावले. हे नवलाचे म्हणावे लागले.

कथालेखन-कथाकथन यांचे प्रयोग करीतच त्यांनी वाचनालय चळवळीस या परिसरात गतिमान करण्याचा प्रयत्न केला. म. गांधी वाचनालयाचे सचिव पद गेले कित्येक वर्षे त्यांनी भूषविले. त्या माध्यमातून व्याख्यानमाला आयोजित केली. अनेक मान्यवर लेखक-वक्ते गंगाखेडी येऊन अनेक विषयांवर उद्बोधन-चर्चा घडवून आणली, विचारमंथन झाले.

महाविद्यालयामधील सांस्कृतिक विभाग त्यांच्या मार्गदर्शनाने समृद्ध झालेला होता. तथापि परिसरातही त्यांनी सांस्कृतिक चळवळीस नेहमीच यथोचित सहाय्य करून प्रोत्साहित केले.

माणसाने सतत प्रयोगशील असावे. दिसामाजी काहीतरी लिहावे. तद्वतच दिसामाजी काही नवे कार्य करावे. त्यामधून समाजास-देशास प्रगतिपथावर न्यावे, ही विचारधारा ते सतत बोलून दाखवीत. त्यांच्या सहवासात वेळ कसा निघून जाई ते कळत नसे. त्यांना लेखनात आवड होती. उत्स्फूर्तपणे ते कथा लिहीत. रफ करणे वगैरे हा प्रकार त्यांच्या ठायी नव्हता. कथाकथनही असेच एका दमात करीत. कथाबीजास फक्त फुलविणे त्यांना ज्ञात होते. व्यासपीठावर अतिशय कुशलतेनं कथाकथन करीत. सूत्रसंचालनही सहजपणे करीत अन् रसिकांची मने अलगद जिंकून घेत असत. तसे पाहता त्यांचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू होते. कुटुंबात लहान-लहान-मोठय़ात मोठे समाजातही जशी व्यक्ती तशी वृत्ती निर्माण करून सुसंवाद साधीत.

माणसाच्या जीवनाचा खरा तेजःपुंज पूर्णविराम म्हणजे अखंड प्रवास हाच होय. प्रवासात माणूस पार बदलतो. त्याला त्यात देवत्वाचा शोध लागतो. अवगुणांचे विसर्जन होऊन सद्गुणांचे नव्याने बीजारोपण होतो, ही त्यांची विचारधारा बोलता बोलता परिपक्व होत असे. त्यांच्या या अनुभवविश्वामुळे शेवटची पैलास मानस याचा त्यांच्यासोबतच करण्याचा महायोग आला. प्रवासातील त्यांच्याशी केलेला संवाददेखील काहीतरी नवीन देऊन विचारप्रवृत्त करीत असे किंवा विलक्षणता-गंभीरतेवर आपल्या विनोदाने विषयाला सकारात्मक कलाटणी देऊन हसविणे, त्यांना लिलया अंगभूत ज्ञात होते.

कोणत्याही माणसास जन्मभूमीविषयी आदरभाव असतो, त्याप्रमाणे कर्मभूमीविषयी क्वचित प्रसंगी उल्लेख होतो, परंतु ‘मगो’च्या बाबतीत जन्मभूमी-कर्मभूमी दोन्हीबद्दल अपार श्रद्धाभाव त्यांच्या अंतःकरणी ओतप्रोत भरलेला सदैव जाणवे. ही भावनिक आणि कर्तव्यनिष्ठा निश्चितच आजच्या धकाधकीच्या जीवनी लक्षणीय म्हणावयास हवी. ‘मगो’मध्ये शिक्षणाविषयी खूप महत्त्वाकांक्षी ओढ होती. उभेरीच्या काळात आकाशवाणीमधील प्रतिष्ठत उच्च नोकरीवर लाथ मारून सामान्यपणे खेडय़ातील महाविद्यालयात राहून अध्यापनाचा पेशा त्यांनी पत्करला तो केवळ त्यांच्यामधील ज्ञाननिष्ठ वृत्तीमुळेच!

ज्ञानाच्या उपासनेमुळेच ग्रामीण भागाची सर्वांगीण उन्नती होते. म्हणून ग्रामीण तरुण शिकला पाहिजे, त्याने आपला गाव सुधारला पाहिजे. ग्रामोन्नती म्हणजे देशोन्नती हे विचारसूत्र त्यांना चांगले ज्ञात होते. म्हणून ते खेडय़ात रमले आणि निवृत्तीनंतरही फोनद्वारे आठ-पंधरा दिवसांनी काय घडतंय… याबद्दलची आस्थेवाईक चौकशी करीत असत!

‘मगो’ आज दृश्यरूपात आपणात नसले तरी त्यांची पुस्तके त्यातील विचार… ही फार मोठी प्रेरक साठवण आहे.

तसेच वृत्तपत्र हे जनजागरणाचे फार मोठे प्रभावी बिगूल आहे. तालुक्याच्या ठिकाणी हे प्रकाशित होऊन टिकतो ही काळाची नितांत गरज आहे. म्हणून त्यांनी ‘देशीकार सेवा’ ‘काहूर’ या साप्ताहिकांना आपल्या विचाराने- शब्द सामर्थ्यांने बलदंड करण्याचा प्रयत्न केला. ‘मगो’विषयीच्या आठवणी म्हणजे समुद्राच्या लाटेप्रमाणे आहेत. एकानंतर एक येणारे… त्याला ना अंत… म्हणूनच सर्वांसाठी त्या अनंत आहेत.