आत्मक्लेष की समंजसपणा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> डॉ. अमरनाथ उपाध्ये

आमच्या वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने पुष्कळ गोष्टी शिकायलाही मिळतात आणि करमणूकही होते. त्याचं सर्वात मोठं कारण आहे ते आपल्या रुग्णांचे समज, गैरसमज अणि त्यांचं बेताल वर्तन!

‘‘डॉक्टर, मी माझ्या प्रकृतीची खूप काळजी घेणारा माणूस आहे. पथ्यपाणी अगदी नित्यनेमाने आणि काटेकोरपणे सांभाळतो. आता बघा, कोरोनाच्या साथीत मी खूप काळजी घेतली. लवंग, दालचिनी, काळी मिरी यांचा काढा दिवसातून 5-6 वेळा घेतला, अगदी व्यवस्थितपणे, पण काही दिवसांपासून माझ्या गुदद्वाराची जळजळ, दुखणं सुरू झालं, बद्धकोष्ठही वाढलं. एवढी काळजी घेऊनसुद्धा हे!’’
एव्हाना मला हसावं की रडावं हे कळेनासं झालं. त्यांना तपासलं.
‘‘अहो काका, तुम्हाला भगेंद्र किंवा Anal Fissures झालेलं आहे. तुमच्या गुदद्वाराची चामडी फाटून त्या भागाला सूज आली आहे, हे भयंकर काढे पिऊन!’’

चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह घेऊन काका माझी मलमं कशी लावायची या विचारात निघून गेले.
कोरोना काळात पोटाच्या विकारांचा तज्ञ व सर्जन म्हणून आमच्याकडे उपचारांसाठी आलेल्या रुग्णांमध्ये Anal Fissures (भगेंद्र) व Restless Anal Syndrome या प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढ लागली. रुग्णांच्या जीवनशैलीचा अभ्यास करताना असं आढळून आलं की, सर्दी, पडसं, ताप, घसा दुखणे, फुप्फुसाच्या विकारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जे काढे लोक पित होते, त्याचा अतिरेक ज्या लोकांनी केला त्यांमध्ये हे गुदद्वाराचे प्रश्न जास्त आढळून आले. लवंग, दालचिनी, काळी मिरी, सुंठ हे पदार्थ औषध म्हणून गुणकारी असले तरी अतिसेवनाने आपल्या जठरावर, आतडय़ांवर व गुदद्वारावर विपरीत परिणाम घडू शकतात. या पदार्थांच्या अतिसेवनाने पोटात दुखणं, पोटातील व छातीतील जळजळ, आम्लपित्त, भूक कमी होणे आणि गुदद्वाराचे त्रास उद्भवतातच.
त्यामुळे या पदार्थांचं सेवन कधी आणि किती मात्रेत घेतले पाहिजे हे त्या विषयातील तज्ञांशी विचारविनिमय करूनच करावं, स्वतःचा उत्साह मध्ये आणू नये.

कोरोनाच्या बाबतीत बोलायचं तर, अंतरसोवळं, मुखपट्टी नीट (नाकाच्या वर) व सतत लावणं, हात स्वच्छ धुणं, नाकाला हात न लावणं एवढय़ा साध्या उपायांनी पुष्कळ अंशी हा रोग आपण काबूत ठेवू शकतो.
अतिरेक, सारासार विचार न करता केवळ हौस म्हणून किंवा आपल्याला वाटतं म्हणून केलेल्या अनियंत्रित गोष्टी वाईटच. मग ते औषधोपचार, आहार, निद्रा, धर्म या गोष्टींना लागू आहे. एकविसाव्या शतकात जगणाऱ्या माणसाला हे परत परत सांगायला लागणं चांगलं नाही.

भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाली तेव्हा ते असं म्हणाले की, ‘‘स्वैराचार किंवा प्रमाणाबाहेरचे आत्मक्लेष हे तुम्हाला त्रासच देतात. हे मार्ग सोडून मध्यममार्ग निवडण्यातच शहाणपणा व कल्याण आहे.’’
कमीत कमी गौतम बुद्धाचा आणि शंकराचार्यांचा वारसा अभिमानाने सांगणाऱ्या हिंदुस्थानी लोकांनी शास्त्र जे सांगतं त्यावर विश्वास ठेवून पुढे चाललं पाहिजे. नाहीतर असे ‘जळजळीत’ अनुभव येणारच.
आपल्या रुग्णांना त्रास होऊ नये या कळकळीमुळे हा सर्व लेखनप्रपंच!

(लेखक बेले व्ह्यू हॉस्पिटल आणि क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये पोटाच्या विकाराचे तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत.)