किल्ले तुंग

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

अमृतसरिता पवना नदीचे उगमस्थान पवनमावळात आहे. पवना नदी इथल्या डोंगररांगातून अवखळपणे वाट काढत कैक वर्षे वाहते आहे. या पवनेच्या पात्रालगत एक डोंगरशृंग आकाशात झेपावलेले दिसते. या गगनभेदी शिखराची भुरळ जशी आजही आपल्याला पडते तशी शेकडो वर्षांपूर्वी दुर्गस्थापत्यकारांना पडली नसती तर नवलच. दुर्गस्थापत्यकारांनी मुळातच दुर्गम असलेल्या या शिखराला तटबुरूजांचा साज चढवून गडपण बहाल केले. हा गड ताब्यात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे कौतुक करून त्याचे ‘कठीणगड’ असे नामकरण केले. महाराजांच्या कौतुकास पात्र ठरलेला, पाहताक्षणीच कठीण वाटणारा पवनमावळातील हा गड म्हणजेच किल्ले तुंग होय.

तुंग किल्ल्याला भेट देण्यासाठी आपणास लोणावळय़ामार्गे गडपायथ्याचे तुंग गाव असा प्रवास करावा लागतो. गडपायथ्याला हनुमानाचे व भैरवनाथाचे प्रशस्त मंदिर आहे. भैरवनाथाच्या मंदिरातील भैरवाची मूर्ती अतिशय देखणी असून  अनेक विरगळ, पुरातन मूर्ती, विविध नक्षीदार समाधी शिल्पं पाहावयास मिळतात. हनुमान मंदिरातसुद्धा हनुमानाची सुंदर मूर्ती असून समोर एक तोफगोळा व भग्नावस्थेतील शिल्प दृष्टीस पडते.

गड चढण चालू केल्यानंतर काही वेळातच आपण पहारेकऱयांच्या देवडीपर्यंत येऊन पोहोचतो.  पुढे गडाच्या कातळकोरीव पायऱयांच्या मार्गाने वर गेलो असता कातळात खोदलेले पाण्याचे एक टाक लागते. नंतर गडाचा कातळ उजवीकडे ठेवत आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. त्याआधी उजव्या हाताला खडकात कोरलेली अजून एक देवडी दृष्टीस पडते. प्रवेशद्वाराच्या आत पोहोचल्यावर समोर लगेच पहारेकऱयांसाठी देवडी असलेला गडाचा दुसरा हनुमान दरवाजा लागतो.

गड प्रवेश करताच उजव्या हाताला पाण्याचे एक छानसे टाक लागते. त्यात उतरण्यासाठी पायऱया आहेत. बाजूलाच गणपतीचे एक छोटेखानी मंदिर आहे. गडाच्या या सपाटीवर वाडय़ांचे अनेक अवशेष आढळून येतात. आपण आता या गणपतीच्या मंदिराच्या मागून जाणाऱया वाटेने बालेकिल्ल्याकडे कूच करायचे. बालेकिल्ल्याच्या जवळ जाताच उजव्या हाताला जाणाऱया वाटेवर पाण्याचे एक खांबटाक आहे. ते आधी पाहून आपण बालेकिल्ला गाठायचा.

तुंग किल्ल्याचा बालेकिल्ला जेमतेम आकाराचा आहे. त्यावर  एक भग्नावस्थेतीतील छोटेखानी मंदिर आहे. कडय़ाच्या टोकावर असलेल्या या मंदिराच्या आत तुंगाई देवीची तांदळास्वरूपातील मूर्ती आहे. गडमाथ्यावरून पवना जलाशयाचे, तिकोणा, लोहगड-विसापूर, मोरगिरी या किल्ल्यांचे सुखद दर्शन होते. अशी गड फेरी पूर्ण होते.

पवनमावळात सारीपाटावर जशा सोंगटय़ा मांडाव्यात तसेच चोहोबाजूंनी लोहगड, विसापूर, मोरगिरी, तिकोणा, तुंग असे बलदंड तालेवार दुर्ग ठाण मांडून आहेत. यातील तुंग त्याच्या आकाशात घुसलेल्या शिखरामुळे उठून दिसतो. पाहताक्षणीच धडकी भरावी असं त्याचं रूप आहे म्हणूनच  तुंग आपले ‘कठीणगड’ हे नाव सार्थकी करतो.

तुंग हा शिवपूर्वकालीन किल्ला आहे. इ. स. 1482-83 मध्ये अहमद निजामशाह याने तुंग जिंकून घेतला. पुढे निजामशाहीच्या अस्तापर्यंत 1630 पर्यंत हा गड निजामशाहांच्या ताब्यात होता. निजामशाहीच्या अस्तानंतर गडावर आदिलशाही राजवट सुरू झाली. शिवाजी महाराजांनी 1656-57 मध्ये गड ताब्यात आल्यानंतर तुंगचे नामकरण ‘कठीणगड’ असे केले. इ. स. 1818 मध्ये कर्नल प्राथरने तुंग किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात होता.