पाठ्यपुस्तकातील चुकांची परंपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्र. ह. दलाल

शासन आपल्या पाठय़पुस्तकांमध्ये असंख्य चुका करून मराठीचीच अवहेलना करीत असते. दरवर्षी हा परिपाठ सुरू आहे. एकीकडे मराठीला ‘उच्च भाषा’ (हाय लँग्वेज) म्हणून संबोधायचे आणि दुसरीकडे पाठय़पुस्तकांमध्ये मराठीच्याच बाबतीत हलगर्जीपणा आणि चुका करायच्या. त्यात सुधारणा करायची नाही. याही वर्षी ही परंपरा कायम आहे. यंदाही दहावीच्या कुमारभारती या पाठय़पुस्तकात अगदी वरवर नजर मारली तरी असंख्य चुका दिसून येतात.

बालभारती’ने पाठय़पुस्तके अचूक आणि निर्दोष तयार न करण्याचा जणू वसाच घेतला आहे. नवीन जी पाठय़पुस्तके आता बालभारतीने छापली आहेत त्यातही ही चुकांची परंपरा कायम असल्याचे पाठय़पुस्तकांचे निरीक्षण आणि परीक्षण केल्यानंतर स्पष्टपणे जाणवते. वास्तविक 6 नोव्हेंबर 2009 रोजीचा शासनाचा अध्यादेश व परिपत्रक यानुसार मराठी शुद्धलेखनाबाबत पारंपरिक जोडाक्षर पद्धती व ‘श, ल’ ही पारंपरिक वळणेच पुन्हा सुरू करण्याचे निर्देश आहेत. पाठय़पुस्तकांतही याच पद्धतीने लेखन व्हावे, असे शासकीय आदेशात म्हटले आहे. मात्र बालभारतीने तो आदेश झुगारून तोंडाक्षर पद्धती व ‘ल’ हेच वळण यंदाही कायम ठेवले आहे.

वास्तविक सध्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ राज्य सरकारतर्फे पाळला जात आहे. महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचे जतन आणि संवर्धन करणे हा या पंधरवडय़ाचा उद्देश आहे. मात्र तेच शासन आपल्या पाठय़पुस्तकांमध्ये असंख्य चुका करून मराठीचीच अवहेलना करीत असते. दरवर्षी हा परिपाठ सुरू आहे. एकीकडे मराठीला ‘उच्च भाषा’ (हाय लँग्वेज) म्हणून संबोधायचे आणि दुसरीकडे पाठय़पुस्तकांमध्ये मराठीच्याच बाबतीत हलगर्जीपणा आणि चुका करायच्या. त्यात सुधारणा करायची नाही. याही वर्षी ही परंपरा कायम आहे. यंदाही दहावीच्या कुमारभारती या पाठय़पुस्तकात अगदी वरवर नजर मारली तरी असंख्य चुका दिसून येतात.

कुमारभारतीच्या पान नं. 113 वर ‘हे शब्द असेच लिहा’ असा अत्यंत चुकीचा व गोंधळ निर्माण करणारा आदेश विद्यार्थ्यांना दिला आहे. त्यात प्रसिद्ध, उद्धृत समृद्धी, मुद्दय़ांचा, सुट्टीत, सिद्धी असे शब्द आहेत. तसेच पाठय़पुस्तकात सर्वत्र ‘ल’ असा न लिहिता ‘ल’ असा चुकीचा लिहिला आहे. विद्यार्थी वर्तमानपत्रे वाचतात. त्यातील शब्द आणि पाठय़पुस्तकातील शब्द यातील विसंगती विद्यार्थ्यांच्या मनात वैचारिक गोंधळ निर्माण करते.

पान नं. 56 वर ‘देशार्पणाचा’ ऐवजी ‘ देशापर्णाचा’ असा चुकीचा शब्द आहे. बॅटरी, मोबाईल या इंग्रजी शब्दांना विजेरी, भ्रमणध्वनी असे मराठी प्रतिशब्द दिले आहेत, मात्र ‘इंटरनेटला’ ‘आंतरजाल’ हा मराठी शब्द का दिला नाही?

पान नं. 102 पत्रलेखन नमुना कृती-2 यात ‘कुमारासाठीचे प्रसिद्ध मासिक’ असे वाक्य आहे, पण मासिक हे फक्त एका कुमारासाठी नसते. अनेक कुमारांसाठी असते म्हणून एकवचनी शब्दाऐवजी अनेकवचनी शब्द हवा होता.
पान नं. 106, 107 बातमी लेखन यात ‘….. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बातम्यांपर्यंत’ सर्व बातम्या आपल्याला कळतात या वाक्यात ‘बातम्यांपर्यंत’ या शब्दाऐवजी ‘घटनांबाबत’ हा शब्द अधिक समर्पक ठरला असता. शिवाय ‘बातमी’ शब्दाची पुनरावृत्ती टाळून विद्यार्थ्यांना पर्यायी समानार्थी शब्दाची ओळख होऊन त्यांचा शब्दसंग्रह वाढला नसता का?

पान नं. 104 जाहिरात लेखन यात क्र. 1 ते 8 महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. त्यात क्र. 7 च्या मुद्दय़ात ‘सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक नाही’ असे म्हटले आहे. पण व्यवहारात मात्र ‘तीन साडय़ांवर एक साडी मोफत’ ‘दिवाळीनिमित्त 10 क सूट’ अशा झळकणाऱया अनेक जाहिराती विद्यार्थी बघतात, वाचतात. त्यामुळे हा मुद्दा निरर्थक व गोंधळ वाढविणारा वाटतो.
पान नं. 106, बातमी लेखन यात बातमी तयार करण्याचे निकष दिले आहेत. त्यातील क्र. 3 ‘बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी’ असे चुकीचे विधान केले आहे. तर पान नं. 107 वरील बातमी लेखन नमुना कृतीत मात्र खालील विषयावर बातमी तयार करा असे सांगून विषय दिला आहे. ‘सर्व नागरिकांसाठी आधार कार्डाचा नंबर आपल्या बँक खात्याला लिंक करणे अनिवार्य’ मग आता ही बातमी वरील निकषानुसार भूतकाळात कशी लिहावी?

पान नं. 106 बातमीचे क्षेत्र चौकटीतही, ‘सांस्कृतिक, क्रीडा…. घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात’ अशी स्पष्ट सूचना केली आहे. तर नमुनाकृती बातमी तयार करा. यातील विषय यात मोठी विसंगती आढळते. घडलेल्या घटनांच्याच नव्हे तर भविष्यात घडणाऱया व वर्तमानात घडत असलेल्या घटनांच्याही बातम्या तयार होऊ शकतात. उदा. ‘यंदा 10 वीचा निकाल लवकर लागणार’ पंतप्रधान पुढील आठवडय़ात अमेरिकेला जाणार. दिल्लीच्या राम मैदानावर आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन सुरू अशा तऱहेच्या अनेक बातम्या प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना दिसत नाही का? तेव्हा बातमी भूतकाळातच असावी असा वैचारिक गोंधळ का केला?

पान नं. 104 जाहिरात लेखन चौकटीतला मजकूर यात ‘लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो’ असे वाक्य आहे. यात ‘उत्पादनाबाबत’ हा संदिग्ध शब्द वाटतो. त्याऐवजी ‘विशिष्ट उत्पादनाबाबत’ हा शब्द वापरला असता तर विधान अधिक अर्थपूर्ण व स्पष्ट झाले असते. तसेच लोकांचे लक्ष वेधणे यापुढे ‘त्या’ मालाची विक्री वाढविण्यासाठी वातावरण निर्मिती करणे असे वाक्य लिहून जाहिरातीचा उद्देश अधिक समर्पक शब्दात सांगता आला असता.

सारांश लेखन पान नं. 103 यात सारांश लेखनाच्या पायऱया क्र. 1 ते 4 दिलेल्या आहेत. क्र. 1 मध्ये दिलेल्या परिच्छेदाचे वाचन असे क्रियापदविरहित वाक्य आहे. मात्र क्र. 2 ते 4 मध्ये क्रियापद (होणे, घेणे, मोडणे) असे लिहून वाक्य पूर्ण केले आहे. मग क्र. 1 मधील वाक्यही ‘वाचन करणे’ असे क्रियापदासह वाक्य हवे होते. पान नं. 110 ‘पत्राचे प्रारूप नमुना’ असे चुकीचे वाक्य आहे. त्याऐवजी पत्राचा किंवा नमुने असा शब्द पाहिजे. पान नं. 3 ‘बोलतो मराठी’ यात मराठी भाषा ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे, असे वाक्यही आहे. ही कोणती मराठी आहे? आईच्या ठिकाणी ऐवजी आईसमान आहे हे अधिक योग्य झाले नसते का?

अशा काही ‘बेसुमार’ चुका या पाठय़पुस्तकात असल्या तरी पूर्वीच्या पुस्तकांच्या तुलनेत हे पुस्तक मजकुराच्या दृष्टीने जरा बरे म्हणावे लागेल. त्यामुळे हेही नसे थोडके असे म्हणून पुढील आवृत्तीत चुकांबाबत दक्षता घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे.

(लेखक निवृत्त मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ञ आहेत)