
गेल्या आठवडय़ात आपण कोजागरीच्या निमित्ताने पूर्ण चंद्र आणि त्याची पृथ्वीपासूनची जवळीक तसंच दुरी याचा विचार केला. त्यातला आणखी एक मुद्दा म्हणजे आपला चंद्र आपल्यापासून दर वर्षी 2 सेंटीमीटर दूर जातोय. परिणाम? तसा विशेष नाही आणि आपल्या जीवनात तर नाहीच नाही, पण शेकडो वर्षांनी पृथ्वीवरून एखाद्या अमावास्येला जेव्हा सूर्यग्रहण दिसेल तेव्हा ते ‘खग्रास’ न दिसता नेहमी पंकणापृतीच दिसेल आणि सूर्याचं प्रभामंडल, सौरज्वाला, बेलीचे मणी वगैरे सुंदर गोष्टी दिसणार नाहीत. सूर्य केवळ सोन्याच्या कडय़ासारखा चमकताना दिसेल असं कधी आणि का घडेल त्याचा विचार नंतरच्या एखाद्या लेखात करू. पण या आठवडय़ातली (पुन्हा एकदा) आलेली मोठी चंद्रवार्ता म्हणजे चंद्रावर बऱयापैकी पाणी असल्याचा पुरावा अमेरिकेच्या ‘सोफिया’ यानावरील यंत्रणेला मिळाला आहे.
यामुळे वैज्ञानिकांना तर आनंद झालाच, पण सर्वाधिक उत्साह वाटला असेल तो इलॉन मस्कसारख्या चंद्रावरच्या पर्यटनाचं आणि वस्तीचं स्वप्न पाहणाऱया महत्त्वाकांक्षी व्यावसायिकांना. आपण मात्र चंद्रावरच्या पाण्याच्या वैज्ञानिक अभ्यासाचा मागोवा घेऊया. सोफिया यानाने 26 ऑक्टोबर 2020 रोजी चांद्रजलाची पुन्हा पुष्टी केली. त्याआधी असे किती प्रयत्न झाले होते? बरेच!
अगदी 1961 मध्येच पॅलटेक्सच्या, केनेथ वॉटसन, ब्रूस मूरी आणि हॅरिस ब्राऊन या संशोधकानी चंद्र कोरडाठाक नसल्याचं भाकीत पहिल्यांदा केलं. तोपर्यंत चंद्रावर मानव पिंवा मानवी यानही गेलेलं नव्हतं. ‘स्पेस’च्या आकर्षणाला प्रवासाचं मूर्त स्वरूप येण्याची ती पहाट होती. युरी गागारिनच्या यशावर, रशियासह सारं जग खूश होतं.
18 ऑगस्ट 1976 रोजी रशियाचंच ल्युना-24 या यानाने चंद्रावरच्या मेअर क्रिसियम विवराचा वेध घेतला आणि तिथे 184 सें.मी. खोल खणून जे माती-दगडांचे नमुने घेतले त्यात त्यांना पाण्याचा अंश प्रथम आढळला. 1978 मध्ये ते पृथ्वीवर आले. त्यात 10 लाख कणात 0.1 टक्के जलांश सापडला आणि चंद्र कोरडा नसल्याचं सिद्ध झालं.
त्यानंतर सतत संशोधन सुरूच होतं. 1960 मध्येच अमेरिकन चांद्रवीर चंद्रावर जाऊन चंद्रावरची दगड-माती घेऊन आले होते. परंतु ‘सरफेस’ म्हणजे चांद्रपृष्ठावरच्या मातीत पाण्याचा अंश असणं शक्य नव्हतं. कारण चंद्रावरचं वातावरण अगदीच नगण्य आहे. तिथे पृथ्वीच्या तुलनेत एक-षष्ठांश गुरुत्वाकर्षण असल्याने वातावरण ‘पकडून’ ठेवणं चंद्राला जमणं कठीण. तेव्हा माणसाला उद्या तिथे वस्ती करायची, तर पाण्याचं काय, या प्रश्नाची चर्चा होतच राहिली.
1998 मध्ये ल्युनार प्रॉस्पेक्टरने चंद्राच्या ध्रुव प्रदेशातील शीतविवरांमध्ये असलेल्या हायड्रोजनचं मोजमाप केलं आणि 10 लाख कणात 50 जलकण आढळले. पाण्याचं विघटन होऊन हायड्रोन आणि ऑक्सिजन (प्राणवायू) मिळू शकतो. कारण पाणी म्हणजे हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अणु. (H2O). त्यानंतर पॅसिनी हय़ुजेन्स यानानेसुद्धा 1999 मध्ये चांद्रजलाच्या अस्तित्वाला दुजोरा दिला. 2006 मध्ये ‘डीप इम्पॅक्ट’ प्रकल्पांतर्गत, चंद्रावरच्या पाण्याचा पुनर्शोध घेतला. तीच गोष्ट जपानच्या ‘काशुया’ ‘प्रोब’ची. नंतर चीनच्या चॅन्गी-1 यानाने चंद्रावरच्या ध्रुव प्रदेशातील संभाव्य जलसाठय़ांचे पह्टो घेतले.
पण ज्याला मोठा ‘ब्रेक थ्रू’ किंवा यश म्हणता येईल ते काम, हिंदुस्थानच्या चांद्रयान-1 मोहिमेतील ‘नासा’च्या मून मिनटॉलॉजी स्पेक्ट्रोमीटर’ने केलं. त्याने चंद्रावरच्या पाण्याची निश्चिती केली. चांद्रयान-1 वरच्याच ‘मून इम्पॅक्ट प्रोब’ने चंद्रावरच्या ‘शॅक्लेटन’ विवरात धडक देऊन चांद्रपृष्ठाखाली भरपूर बर्फ असल्याची नोंद केली. 2018 मध्ये ‘नासा’च्या यानांनीसुद्धा चंद्राच्या ध्रुवीय भागात असलेल्या बर्फाची आणि पर्यायाने संभाव्य पाण्याची शक्यता पुन्हा वर्तवली. आता ‘सोफिया’ संशोधन तेच सांगतंय.
चंद्राच्या एका बाजूला सतत पृथ्वी येत असल्याने दुसरा भाग (सिन्क्रोनस गतीमुळे) आपल्याला दिसत नाही. मात्र चंद्रावर सूर्यप्रकाशाचा प्रखर परिणाम होतो. त्यामानाने त्याच्या ध्रुव प्रदेशातील विवरं शीतल आहेत. या विवरात लाखो वर्षं कोसळलेले बर्फाळ धूमकेतू अशनी आणि उल्का यानी ‘आणलेलं’ पाणी साठवलं आहे. हा साठा प्रचंड आहे.
आता त्याचा वापर करता आला तर पाणी तर मिळेलच, पण पाण्याच्या विघटनातून माणसाला उपयुक्त ऑक्सिजन आणि इंधनासाठी हायड्रोजनचा वापर करता येईल. त्यातून तिथे वीजनिर्मिती करता आली तर चांद्रसफरींचा बराच खर्च वाचेल. युनोच्या करारानुसार चंद्र जगातील सर्व देशांची मालमत्ता आहे. पण अमेरिका आणि लक्झम्बर्गसारखे देश हे मानायला तयार नाहीत. त्यानी त्यांच्या नागरिकांना चंद्रावरचे स्रोत वापरण्याची मुभा दिली आहे म्हणे. असं असलं तर आपल्याला शीतल चांदणं देणाऱया काव्यातील चंद्रावर उद्या पाण्याचा प्रश्न पेटल्याचं दिसून येईल!



























































