
>> लता गुठे
मनाच्या गाभाऱ्यात जपावी वाटणारी माणसं माझ्या आयुष्यात बरीच आली, त्यापैकी एक नाव म्हणजे आदरणीय गिरिजा कीर. ज्येष्ठ साहित्यिका, थोर समाजसेविका यापलीकडे जाऊन त्यांच्यातील आई मला भेटली ती त्यांच्या सहवासातील अनेक भेटीमध्ये…
अंधारातून प्रकाशाचा
मार्ग ती शोधत राहिली
काळोखाच्या तळाशी
ज्योत माणुसकीची लावली
माझी आणि ज्येष्ठ साहित्यिका, कथाकथनकार गिरिजा कीर यांच्याशी पहिली भेट झाली ती पंचवीस वर्षांपूर्वी. एकदा प्रवासात सहज चाळण्यासाठी स्टेशनवर दिवाळी अंक घेतला आणि ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे अनुक्रमणिका पाहू लागले. पहिलीच कथा होती गिरिजा कीर यांची. मी ती वाचू लागले आणि वाचता वाचता कधी त्या कथेत गुरफटले गेले समजलेही नाही. तेव्हापासून गिरिजा कीर यांच्या कथांची मी चाहती झाले. त्या वांद्रे येथे राहत होत्या आणि मीही वांद्रय़ाला शासकीय वसाहतीत राहत होते. एकदा एमआयजी क्लबमध्ये गिरिजा कीर यांना पाहण्याचा योग आला आणि ती सात्त्विक मूर्ती मनाला सुखावून गेली. त्यांनतर एकदा त्यांच्या भेटीचा योग जुळून आला. पुढे प्रत्येक भेटीत आमचा परिचय वाढत होता. दिवाळी अंकाच्या निमित्ताने मी त्यांची मुलाखत घ्यायला गेले त्यावेळेला गिरिजाबाई नव्याने उलगडल्या. ‘‘ 5 फेब्रुवारी 1933 रोजी माझा जन्म धारवाड येथे ब्राह्मण कुटुंबात झाला. लहानपणीच आई गेल्यामुळे पितृछायेत मी लहानाची मोठी झाले. वडिलांच्या नोकरीमुळे अनेक ठिकाणी वास्तव्य केलं. मुरुड-जंजिरा येथे असताना मी पहिली कविता लिहिली. तेथील निसर्ग माझ्या सृजनशील मनाला लेखनासाठी प्रवृत्त करत होता. मुंबईला कॉलेजला असताना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ लागले. नाटकाची आवड होती. त्यामुळे कला, साहित्यात मनापासून रमले. बी. ए. पास झाल्यानंतर उमाकांत कीर यांच्याशी विवाह झाला. घरात सासूबाई जुन्या वळणाच्या, पारंपरिक विचारांच्या. त्यामुळे माझ्यातील लेखिका त्यांच्या कल्पनेत बसणारी नव्हती आणि मी त्यांच्या विचारांच्या चौकटीत सून म्हणून बसत नव्हते’’
त्यांच्या या संवादातून बरंच काही नवीन ऐकायला मिळत होतं. साहित्याच्या पलीकडची लेखिका मी अंतर्मुख होऊन अनुभवत होते. बराच वेळ गिरिजाताईंच्या भूतकाळाशी आम्ही दोघीही एकरूप झालो होतो. बराच वेळ गिरिजाताई स्तब्ध झाल्या आणि मी पुढचा प्रश्न विचारला, ‘‘ताई, तुमच्या लेखनाला सुरुवात कशी झाली?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘एक दिवस माझी आत्येबहीण मला भेटायला आली आणि तिने घरातील सर्व परिस्थिती पाहिली. तिने माझ्यातल्या मी ला जणू हाकच दिलीआणि अंगावरच्या कपडय़ानिशी घराबाहेर पडले. त्या काळात वडील पाठीशी खंबीर उभे राहिले. मी परत लिहू लागले, माझा शोध घेत राहिले. समाजाकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहताना अनुभवविश्व विस्तारत होतं. मी लिहिलेल्या लेखनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. वृत्तपत्रांतून, मासिकांतून, दिवाळी अंकांतून मी लिहू लागले आणि पुढे लिहीतच राहिले.’’
असा हा गिरिजाताईंचा लेखनाचा प्रवास अखंड सुरूच राहिला, तो शेवटच्या काही दिवसांपर्यंत. या वर्षीच्या 16 दिवाळी अंकांना गिरिजाताईंनी लेखन केलं. आपल्या लेखणीतून वास्तवातील दाहकता मांडत वाचकांच्या मनावर अधिराज्य केलं. सामाजिक जाणिवा समृद्ध करीत लहान मुलांनाही पुस्तकाची ओढ लावणाऱया ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांची लेखणी साहित्याच्या अनेक प्रकारांत लीलया सरसावत होती. कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने व बालसाहित्य अशा वैविध्यपूर्ण मराठी साहित्यक्षेत्रात मानाचे स्थान मिळविले. 100 पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 2000 पेक्षा अधिक कथाकथनाचे कार्यक्रम हिंदुस्थानातच नव्हे, तर विदेशातही त्यांनी केले. त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम अतिशय गाजले.
गिरिजा कीर यांनी सतत सोळा वर्षे आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पाचं काम केलं. एकदा त्या कुष्ठरोगी आश्रमात अमरावती येथे तपोवनात गेल्या होत्या. तिथे त्यांना स्वातंत्र्य सैनिक हरिभाऊ भडसावळे भेटले. त्या व्यक्तीचा प्रभाव माझ्यावर पडला. त्यानंतर मी झपाटल्यासारखी कामाला लागले. कोतवालवाडी आदिवासी भागात 1991 पासून काम सुरू केलं, ते अखंड सोळा वर्षे.
मी एकदा त्यांना विचारलं होतं, ‘‘लेखकाला समृद्ध करणाऱ्या गोष्टी कोणत्या?’’
त्यावेळेला गिरिजाताई म्हणाल्या, ‘‘आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वळणावर नवीन सुख-दुःखाच्या अनुभवांनी लेखकांची झोळी भरत असते. निसर्गाच्या सान्निध्यात त्याचे मन फुलत असते. तसेच वास्तव जीवनातले कटू अनुभव लेखकाच्या मनाला खंबीर बनवत असतात. अपेक्षित स्त्र्ाया, गरीब अनाथ मुलं त्यांच्या समस्या लेखकांना भेडसावत असतात. स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहण्याचा प्रामाणिकपणा लेखकाकडे असायला हवा. एकेका अनुभवाची स्वतंत्र कथा तयार होऊ शकते, एवढी ताकद त्या अनुभवात असते. याच गोष्टी लेखकाला समृद्ध करतात.’’
पाय जमिनीवरून आकाश कवेत घेणाऱया गिरिजाबाई. त्यांना अनेक मानसन्मानाने गौरविण्यात आले. 51 पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. त्यापैकी चार महाराष्ट्र राज्य पुरस्कार व अन्य प्रतिष्ठsचे पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना बहाल करण्यात आले. महाराष्ट्र मंडळ, न्यूयॉर्क यांच्यातर्फे ‘कथासम्राज्ञी’ हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला. गिरिजा कीर यांनी अनेक वेळा कामगार स्त्र्ायांच्या वस्तीत जाऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला. उन्मार्गी स्त्र्ाया व मुलांच्या संदर्भातील अनेक समस्या त्यांनी समजावून घेतल्या. आदिवासी मुलांवर ‘राखेतली पाखरं’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. आदिवासी कामगार, कनिष्ठ व मध्यमवर्गीय स्त्र्ाया व मुलं यांच्या जीवनाचा अभ्यास व मुलाखाती यावर लेखन केले. ‘इथं दिवा लावायला हवा’ हे पुस्तक पुढे प्रकाशित झालं. अमरावतीच्या कुष्ठरोगी आश्रमात जाऊन त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम घेतले. कोतवालवाडी, नेरळ येथे आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रकल्पात 16 वर्षे काम केलं. 1999 ते 2010 मध्ये जन्मठेपेच्या गुन्हेगारांना तुरुंगात जाऊन प्रत्यक्ष भेटून हृदयपरिवर्तनाचे काम त्यांनी केले. त्यावर लेखन केले. त्यावर आधारित त्यांचं ‘जन्मठेप’ हे पुस्तक प्रकाशित झालं. दूरदर्शन सह्याद्री व इतर वाहिन्यांवर मुलाखती, चर्चासत्रांत सातत्याने सहभाग होता. कन्नड, हिंदी, गुजराती, अहिराणी या भाषांमध्ये त्यांनी साहित्य प्रसिद्ध केले. कैद्याच्या जीवनावरील प्रकाशित झालेली ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’ ही कादंबरी तसेच ‘क्षण क्षण कण कण’ व छोटय़ा मुलांसाठी ‘चला, उठा, जागे व्हा’ आणि आता प्रकाशनाच्या मार्गावर असलेलं ‘गिरिजा सुजन’ ही पुस्तकं माझ्या भरारी प्रकाशनने प्रकाशित केली. असं हे आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व मला समृद्ध करून गेलं.
गिरिजा कीर यांचे उदात्त विचार त्यांच्या साहित्यातून सदैव मनामनात रुजत राहतील यात शंकाच नाही, परंतुज् माझ्या मनात कायमची राहील ती साहित्यातील माझी प्रेमळ आई…माझी प्रेरणास्रोत असलेली एक दिव्य शलाका…!































































