काव्यधारा – ‘मनातली चित्रं अलिप्त पाहते मी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निती मेहेंदळे

अस्वस्थ संवेदना अनेक प्रश्न जन्माला घालते. मनाला रितं करत जाते. जगण्यातील विश्वास कुठेतरी हरवला जातो. हरवलेल्या या जगण्याला, पडलेल्या प्रश्नांना, त्या अशांत मनाला उत्तर देणं भाग असतं.

पुष्कळ चित्रं आहेत
माझ्या मनभर व्यापलेली
तरी मी पाहू शकते त्यांच्याकडे अलिप्त
त्यांच्या चौकटीबाहेर असून
अळवाच्या पानावरचा जलबिंदू जसा
त्यावर चिकटून आहे ही आणि
त्याचा भाग नाहीही
पण मी असते सर्वसमावेशक
त्या चित्रांचा अर्थ दाटलेला माझ्यात, तरी
गंमत म्हणजे कितीतरी चित्रं
मलाच अनभिज्ञ आहेत
थाटलंय मी मनातच एक चित्रांचं प्रदर्शन माझ्यापुरतं
थबकून पाहत राहते मी त्यांना…

एकेक चित्रं
अनोळखी दृश्य चितारल्यासारखं
भासतं, तेव्हा वाटतं
असे आपण सगळेच चालत असू
आपल्यातली चित्रं पाहत.. नाही?
एका चौकटीतून
दुसऱया चौकटीत
दुसरीतून तिसऱया
आपल्या प्रत्येकातलं चित्रं
उत्सुकतेने
बाहेर डोकावत असेल पाहायला
त्यातला माणूस कोणतं चित्र नेतोय
त्याच्या मनासोबत
त्याच्या चेहऱयासोबत…

कवीचा परिचय

हेमंत दिवटे हे नामवंत कवी, संपादक, अनुवादक, प्रकाशक आणि कवितेचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे चौतिशीपर्यंतच्या कविता, पॅरानॉया, थांबताच येत नाही, या रूममध्ये आलं की लाईफ सुरू होतं, रिलोडेड असे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. लेस मरेची कविता आणि झिंगोनिया झिंगोनेच्या कविता असे अन्य कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद त्यांनी केले आहेत. जवळजवळ तीसेक भाषांमध्ये त्यांच्या कवितांचे अनुवाद केले गेले आहेत. अभिधा आणि अभिधानंतर या अंकांच्या माध्यमातून त्यांनी कवितेसाठी व्यासपीठ निर्माण केले. गेली तीस वर्षे ‘अभिधा’ आणि नंतर ‘पोएट्रीवाला’ या त्यांच्या प्रकाशनातर्फे मराठी, इंग्रजी, भारतीय व इतर जागतिक भाषेतल्या कवितांचे इंग्रजीत अनुवाद प्रकाशित करणं सुरू आहे.

मूळ कविता

मनातल्या मनात
चित्रं पाहताना
मनातल्या मनात चित्रं पाहताना
चित्रातले काळात नाही काहीच
आणि आपण असतो उभे
चित्राबाहेर शीर्षकासारखे
जसा सर्व अर्थ सामावलेला आपल्यात
तरीही आपण समजू शकलो नाही
आपल्यातल्या अनेक चित्रांना
चित्रं मांडली आहेत ओळीने
आपल्यातल्या कलादालनात
आपण सरकतो
एका चित्रातून दुसऱ्या चित्रात
किंबहुना
प्रत्येकजण चाललाय
एका चौकटीतून दुसऱ्या चौकटीत
आणि प्रत्येकातलं चित्र
डोकावतंय बाहेर
पाहतंय
आपल्यातून निघून चाललेला माणूस
कुठलं चित्र नेतोय वाहून
त्याच्या चेहऱयाबरोबर…

कवी : हेमंत दिवटे