साय-फाय – AIIMS आणि सायबर सुरक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

‘साल 2019 पासून संपूर्ण हिंदुस्थानात सायबर सुरक्षा आणि सायबर गुह्यांच्या संदर्भात 36.29 लाख प्रकरणे समोर आली आहेत. अशा गुह्यांना पायबंद घालण्यासाठी, ते रोखण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने लढा देत आहे.’’ (इति – केंद्रीय मंत्री श्री. अजय कुमार मिश्रा, जुलै 2022 लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना.)

जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक (GCI) मध्ये हिंदुस्थान 23 क्रमांकावर. मलेशिया, ओमान, जॉर्जियासारखे देशदेखील हिंदुस्थानपेक्षा वरचढ. (इति- UN इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU सन 2017) तर हाच हिंदुस्थान 2021 मध्ये 10 व्या स्थानावर पोहोचला.)

सायबर सुरक्षेचा मुद्दा हा आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापर्यंत मर्यादित राहिलेला नसून तो राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनलेला आहे. (इति- हिंदुस्थानचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी.)

वरच्या सगळ्या गोष्टी नीट वाचल्या, तर हे लक्षात येते की, हिंदुस्थानला आता सायबर सुरक्षा किती महत्त्वाची आहे त्याची जाणीव झालेली आहे. मात्र नुसती जाणीव उपयोगाची आहे का? प्रत्यक्ष त्या संदर्भात काय हालचाली केल्या जात आहेत? सुरक्षेचे काय उपाय योजले जात आहेत? हिंदुस्थानच्या महत्त्वाच्या संस्था, कार्यालये ही खरंच सायबर हल्ल्याला तोंड देण्यासाठी सिद्ध आहेत का? इथले कर्मचारी सायबर सुरक्षेच्या बाबतीत कितपत साक्षर आणि जागरुक आहेत? हे सर्व प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होण्याचे कारण म्हणजे नुकताच देशाच्या सर्वात विश्वासार्ह आणि प्रतिष्ठत अशा AIIMS (एम्स- ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस) या सर्वात मोठय़ा रुग्णालयावर झालेला सायबर हल्ला होय.

कोरोनानंतर ‘आरोग्य क्षेत्र’ हे हॅकर्सचे अथवा इंटरनेट विश्वातील गुन्हेगारांचे प्रमुख ‘टार्गेट’ बनलेले आहे. सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारी यावर लक्ष ठेवणारी कंपनी ‘AI क्लाउडसेक’ने आपल्या 2021 मधील अहवालात नमूद केले आहे की, जगभरातील आरोग्य क्षेत्रांवर आणि त्यातील पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये हिंदुस्थानचा दुसरा क्रमांक लागतो. 2021 मध्ये आरोग्य सेवा क्षेत्रात सर्वात जास्त हल्ले हे अमेरिकेवर (28 टक्के) झाले आणि त्यानंतर हिंदुस्थानचा क्रमांक येतो. विशेष म्हणजे 2021 मध्ये या क्षेत्रावर जितके हल्ले झाले त्याच्यापेक्षा 95.34 टक्क्यांनी जास्ती वाढ ही 2022 च्या पहिल्या चार महिन्यांतच पाहण्यात आली आहे.

‘एम्स’वर ज्या दिवशी सायबर हल्ला झाला त्या दिवशी त्याचे जवळपास सर्व सर्व्हर ठप्प झाले. या जबरदस्त हल्ल्याने ई-हॉस्पिटलचे नेटवर्कदेखील बंद पडले. रुग्णालयातील रुग्ण, बाहेरून आलेले रुग्ण, त्यांच्या संदर्भातील सर्व सेवा, विशेषतः बिलिंग सेवा ह्या सर्व विस्कळीत झाल्या. संगणकाचा नाद सोडून सर्व कामे हाताने करावी लागली. त्यामुळे वेगळाच गोंधळ उडाला. चिंतेचे कारण, म्हणजे रुग्णालयाच्या मुख्य आणि बॅकअप सर्व्हरवर सेव्ह करून ठेवलेल्या करोडो फायली धोक्यात आल्या. एका अंदाजानुसार जवळपास चार कोटी रुग्णांची प्रोफाइल, त्यांच्या वैद्यकीय नोंदी आणि गोपनीय माहिती हॅकर्सच्या ताब्यात गेली असण्याची शक्यता आहे. या माहितीमध्ये हिंदुस्थानच्या जवळपास सर्व पंतप्रधान, मंत्री, हजारो अती महत्त्वाच्या व्यक्ती, शास्त्र्ाज्ञ, रक्तदाते यांच्यादेखील वैद्यकीय नोंदी रेकॉर्ड करून ठेवण्यात आलेल्या आहेत.

एका वृत्तानुसार या माहितीच्या बदल्यात हॅकर्सकडून खंडणीची मागणी करण्यात आली आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. या सायबर हल्ल्याची गंभीर दखल घेत दिल्ली पोलीस, गृह मंत्रालय, सीईआरटी-आयएन आणि राष्ट्रीय तपास संस्था एकत्रपणे तपासात सामील झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) सारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या काही संगणकात मालवेअर सापडला होता. त्यानंतर संस्थेने तातडीने आपली बाजू मांडताना संस्थेची कोणतीही महत्त्वाची माहिती उघड झालेली नाही अथवा गुंतवणूकदारांच्या खासगी माहितीला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले होते. या घटनेच्या पाठोपाठ देशाच्या दुसऱया महत्त्वाचा संस्थेवर झालेला हा हल्ला नक्कीच काळजीत भर घालणारा आहे.
[email protected]