होळी, निसर्ग आणि पर्यावरण

253

>> राजा मयेकर

हिंदू संस्कृतीने सामाजिक सलोखा वाढावा म्हणून हा रंगोत्सवाचा सण योजला आहे. आपले आयुष्य हे रंगीबेरंगी आहे. मात्र यातील रंग आपल्याला स्वतःलाही अनुभवता आले पाहिजे. जीवनात रंगाचे महत्त्व समजले तरच खऱया अर्थाने जीवन जगता येईल. म्हणूनच होळीसारखा सण आपल्याकडे आहे. हिंदुस्थानी संस्कृतीने या सणांची महती आपल्याला सांगितली आहे. परंतु आज चंगळवादी प्रवृत्तीने या सणांची दिशाच बदलून टाकली आहे. हे चित्र बदलायला हवे. माणूस आणि निसर्ग यांचे अतुट बंधन आहे. परंतु आज होळीच्या नावाखाली चाललेली झाडांची कत्तल वेळीच थांबवायला हवी.

आज आपल्याकडे सगळय़ाच सणांचे ‘उत्सव’ झाले आहेत. या सणांमागची शास्त्रीय, धार्मिक पार्श्वभूमी लक्षात न घेता केवळ मौजमजा म्हणून हे सण साजरे केले जात आहेत. अशावेळी सणांची खरी पार्श्वभूमी नक्की काय आहे, हे सांगणे आज गरजेचे झाले आहे.

होळी हा खरे तर आनंदाचा सण. होळी पेटवायची ती दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा म्हणून. होलिका पूजन करायचे ते होळीत जळून गेलेल्या असत्य प्रवृत्तीनंतर तावून सुलाखून निघालेल्या सप्रवृत्तीचे! आपला प्रत्येक सण प्रतीकात्मक आहे. होळीची पूजा म्हणजे दुप्रवृत्तीचे दहन आणि सप्रवृत्तीचे पूजन असते. आपल्या मनात असलेले दुष्ट विचार, द्वेष, मत्सर, अज्ञान, अंधविश्वास, एकमेकांबद्दलची कटुता या साऱयांचे दहन होळीमध्ये करायचे असते आणि नंतर शुद्ध मनाने गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करायचा असतो. तिथे लहान मोठा, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता गुलाबी, लाल, पिवळा अशा अनेक रंगांच्या उधळणीतून व्यक्त होतो. तो केवळ आनंदाचा रंग! रंगात रंगून जाताना मनातील दुष्ट विचारांना मूठमाती देण्यासाठी होळीच्या सणाची ही प्रथा मोठी न्यारी आहे. तसेच एकमेकांबद्दलची कटुता नष्ट होऊन सर्वांना समान पातळीवर आणणाऱया अशा सणांचे महत्त्व सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनेदेखील फार महत्त्वाचे आहे.

होळी, धुळवड, रंगपंचमी म्हणजे रंगांचे सण. विविध रंगांची उधळण हीच या सणाची खरी ओळख. पूर्वी होळी खेळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जात असे. विविध फुले, पाने यापासून बनवलेले रंग होळी खेळण्यासाठी वापरले जात होते. हे रंग नैसर्गिक असल्यामुळे त्वचा व आरोग्यासाठी हानीकारक नसत. त्यावेळी वापरला जाणारा गुलालही उत्तम दर्जाचा असे. तो सध्या वापरल्या जाणाऱया रंगासारखा हानीकारक नव्हता. गुलालाच्या फक्त एका बोटाने समज-गैरसमज, मान-अपमान क्षणात पुसले जात आणि त्या रंगासारखा आनंद रेंगाळत राहायचा. या दिवशी सगळे राग, रुसवे बाजूला ठेवून एकमेकांना रंग लावताना खूप मोकळे मोकळे वाटे. एरवी वर्षभर आपण ज्या नात्यांमध्ये बंधनाची चौकट सांभाळत एक ठरावीक अंतर ठेवून राहतो. त्यामुळे साहजिकच माणूस अगदीच कंटाळलेला असतो. त्यामुळे हे चाकोरीबाहेरचे क्षण ताजेतवाने होण्यासाठी लागणारा मोकळेपणा अशा सणांनी आपल्याला दिलेली आहे. मात्र रंगाचा बेरंग होणार नाही याचे भान ठेवूनच रंगोत्सवाच्या दिवशी एकमेकांच्या अंगावर गुलाल, रंग उधळून हा दिवस साजरा करायला हवा. तेव्हाच रंगोत्सवात खरी गंमत लुटता येईल.

हिंदू संस्कृतीने आपल्याला दिलेले सारेच सण हे निसर्गाला अनुसरून आहेत. त्याच संस्कृतीने आपल्याला मुक्तपणे वागण्याची मुभासुद्धा दिली आहे. माणूस आणि निसर्ग यांचे अतुट बंधन आहे. परंतु आज होळीच्या नावाखाली चाललेली झाडांची कत्तल वेळीच थांबवायला हवी. निसर्गाला गृहीत धरले तर मानवाचे जीवन असह्य होऊ शकते. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी मानव निसर्गाशी खेळ खेळतो आहे. निसर्ग वाचवणे आपल्या हातात आहे. आपण होळीला अनेक झाडांची कत्तल करतो. त्यामुळे पर्यावरण ढासळते, हे थांबवणे गरजेचे आहे. निसर्गाची महती सांगण्याचे काम या सर्वांचे आहे. पण गेल्या काही दिवसांपासून रंगणारा हा रंगोत्सव आपल्याला विकृतीकडे नेताना दिसतो आहे. या दिवशी नशापान करून गोंधळ घालणाऱया काही महाभागांमुळे या रंगोत्सवाला बट्टा लागतो.

बेभान होऊन दुसऱयांना रंग लावताना आपण काय करीत आहोत याचे भान काहींना राहत नाही. रासायनिक रंग वापरल्यामुळे अनेकांना अंधत्व आल्याची उदाहरणे ऐकिवात आहेत. रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक रंग वापरणे कधीही चांगले. त्यामुळे कुणालाही इजा पोहोचत नाही. होळी हा सण आनंदाचा आहे. मात्र आनंदाची जागा वाईट प्रवृत्तीने घेतली तर हा उत्सव खऱया अर्थाने साजरा करता येणार नाही.

हिंदू संस्कृतीने सामाजिक सलोखा वाढावा म्हणून हा रंगोत्सवाचा सण योजला आहे. आपले आयुष्य हे रंगीबेरंगी आहे. मात्र यातील रंग आपल्याला स्वतःलाही अनुभवता आले पाहिजे. जीवनात रंगाचे महत्त्व समजले तरच खऱया अर्थाने जीवन जगता येईल. म्हणूनच होळीसारखा सण आपल्याकडे आहे. हिंदुस्थानी संस्कृतीने या सणांची महती आपल्याला सांगितली आहे. परंतु आज चंगळवादी प्रवृत्तीने या सणांची दिशाच बदलून टाकली आहे. हे चित्र बदलायला हवे. कोणताही सण असो त्याचे पावित्र्य आपण जपले पाहिजे. काळानुसार आवश्यक बदल सण, उत्सव, प्रथा, परंपरांमध्ये व्हायलाच हवेत. केवळ त्या जुन्या चालीरीती आहेत, म्हणून सोडून देण्याचा अविचार करता कामा नये. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला साजरी होणारी होळीदेखील आपण याच पद्धतीने निसर्गाचा आणि पर्यावरणाचा विचार करून साजरी करायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या