साहित्यजगत – संमेलनाच्या गावा जावे

>> रविप्रकाश कुलकर्णी

एखादा कुळाचार असावा, त्याप्रमाणे मराठी साहित्य व्यवहारात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थिरावलेले आहे. त्याप्रमाणे यंदाचे 96 वे संमेलन 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान वर्धा येथे होत आहे.

वर्धा गाव महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यामुळे आधीच ख्यातकीर्त झालेले आहे. आता साहित्य संमेलनामुळे वर्ध्याची नवी ओळख काय होते ते पाहायचंय. अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड झाली या निर्णयाचे स्वागत करताना साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी त्यांचे स्वागत करताना म्हटले, ‘‘आजवर साहित्य संमेलनाला लेखक, कवी, टीकाकार अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. मात्र या संमेलनाला नरेंद्र चपळगावकर यांच्या रूपाने विचारवंत, लेखक तसेच तर्कनिष्ठ व तत्त्वनिष्ठ भूमिका असलेले साहित्यिक अध्यक्ष मिळालेले आहेत. इतिहासाचा धागा वर्तमानाशी जोडताना त्यांनी दिलेली विचारदृष्टी मोलाची आहे.’’

अर्थात हे खरेच आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलन आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. संमेलनाला मी जाणारच आहे. जाता जाता संमेलनाच्या बाबतीत अनेक गोष्टी आठवतात. ‘वर्धा’ नावाला इतिहास, भूगोल काय आहे? वर्धा नदी ही या जिह्याची जीवनदात्री नदी. ती खिंजोडा टेकडीतून, वराहाच्या मुखातून उगम पावली म्हणून तिचे नाव वराहा पडले. या नदीच्या तीरावर वसिष्ठ ऋषींनी एक कोटी यज्ञ केले म्हणून तिला वसिष्ठा नदी असे लोक म्हणू लागले. ही वरदायिनी असल्यामुळे तिला वर्धादेखील म्हणू लागले. या वरदाचा अपभ्रंश म्हणजे वर्धा!

1862 मध्ये वर्धा हा जिल्हा स्थापन झाला तेव्हा पुलगावजवळ कवठाई 1862 ते 1866 ही राजधानी होती, पण येथील हवा न मानवल्याने 1865 मध्ये जीआयपी रेल्वेचा मुंबई-नागपूर हा रेल्वेमार्ग तयार झाला व राजधानी वर्धा येथे हलवण्यात आली. पुढे गांधी, विनोबा, बजाज आदींच्या कार्याने वर्ध्याला ऐतिहासिक महत्त्व येत गेलं.
आता संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्याविषयी थोडंसं – यापूर्वी चपळगावकर मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या वेळी आपल्या भावना एका मुलाखतीत व्यक्त केल्या होत्या, त्या सांगण्यासारख्या आहेत.

ते म्हणतात, ‘‘साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हे एक नवं उत्सवी पद आहे. माझं अध्यक्षपद हे माझ्या लेखनाप्रमाणेच परिषदेच्या सेवेची माझ्या सहकाऱयांनी घेतलेली दखल आहे असं मी मानतो. त्या सर्वांचा मी प्रतिनिधी आहे अशी माझी भावना आहे. भाषा आणि वाङ्मय अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वांबरोबर काम करणं हा एक आनंदाचा अनुभव असतो म्हणून ते काम मला आवडतं.’’

या वाटचालीत त्यांच्या लेखनाबद्दल प्रश्न केला असता ते म्हणाले ‘‘लिहिणे जेव्हा होईल तेव्हाच होतं, परंतु वाचन सुरू झाले म्हणजे आनंदाचा एक प्रवास सुरू होत असतो. प्रत्यक्ष लेखनाइतकाच हाही माझ्या मनाला भावणारा भाग असतो. या वाचनाचा एक दुसराही उपयोग होतो तो म्हणजे या जीवन व्यवहारातलं आपण किती लहान घटक आहोत याची मनाला सतत जाणीव राहते. साहित्याने मला हेही सत्य समजून घेण्याला मदत केली आहे.’’

सद्य परिस्थितीत चपळगावकरांचं काय चिंतन आहे हे त्यांच्या अध्यक्षीय भाषणात असणारच आहे, त्याची मला उत्सुकता आहे.

हे झालं त्यांचं सार्वजनिक दर्शन. घरातले चपळगावकर कसे आहेत – त्यांची मुलगी सायली राजाध्यक्ष हिने एकदा म्हटलं आहे, ‘‘माझ्या लग्नाला इतकी वर्षं होऊनदेखील अजूनही माझा आणि बाबांचा एक फोन असतोच. त्यात काही महत्त्वाचे विषय असतातच असे नाही. आज तुम्ही काय जेवलात? दिवसभरात काय काय घडलंय अशा अगदी साध्या बाबींवर आमचं बोलणं असतं, पण रोज एक फोन व्हायला हवाच. माझा नवरा निरंजन तर म्हणतो, तुम्ही एक फॅमिली न्यूजलेटर का काढत नाही? कारण रोज तेच तेच बोलत असता, पण खरं सांगायचं तर इतकी वर्षं झाली तरी अजून रोज बाबांशी बोलल्याशिवाय करमतच नाही. असा एकीकडे तर्कनिष्ठ विचार करणारे आणि त्याच वेळी घरेलू असणाऱया चपळगावकरांनी ‘आठवणीतले दिवस’ ही आत्मकथा लिहिली आहे. त्यात हे सगळे कवडसे दिसतात. आत्मकथेच्या शेवटी त्यांनी म्हटलं आहे –

‘भूली बिसरी चंद उमीदे, चंद फसाने याद आये
तुम याद आये और तुम्हारे साथ जमाने याद आये’

यानंतर बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतील, काही निष्कर्ष काढले असतील. हे चिंतन, निरीक्षण निश्चितच त्यांच्या भाषणात दिसणार.