नवी उमेदीची वर्षपूर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्षा जोशी-आठवले

लोकसमस्यांचं निवारण करताना साकारलेल्या सकारात्मक प्रयत्नांची नोंद नवी उमेद या फेसबुक पेजच्या माध्यमातून घेतली जाते. भवतालच्या जगाची उमेद वाढवणाऱया या फेसबुक पेजला 26 एप्रिल रोजी 5 वर्षे पूर्ण होत आहेत.

‘नवी उमेद’ या फेसबुक पेजचा 26 एप्रिल रोजी पाचवा वाढदिवस. यानिमित्ताने आमच्या टीमने आजवर काय काय केलं, उमेदवार आजपर्यंत काय काय प्रसिद्ध झालं याचा एकदा आढावा घेत होते आणि एक-एक फोल्डर उघडल्यावर इतकं काय काय हाती लागलं विचारू नका. तिसऱया वाढदिवसाला वाचकांनी पाठवलेली पत्रं मिळाली. एका बाईंनी लिहिलं होतं, ‘विविध लोकांच्या विविध प्रयत्नांच्या जीवनस्पर्शी कहाण्या नवी उमेदमधून वाचायला मिळतात. त्यामुळे भविष्याबद्दल विश्वास वाटायला लागला आहे.’ धुळ्याच्या एका तरुणाने लिहिलं होतं की, ‘प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी हमखास शिकायला मिळतं ते मी नवी उमेदकडून जाणून घेत आहे.’ गुजरातमधल्या एका वाचकाने लिहिलं होतं की, ‘समाजात सकारात्मक विचार निर्माण करण्याचं काम उमेदकडून घडतं आहे ते मला आवडतं.’ आपलं काम सगळ्यांसाठी इतकं उपयोगाचं ठरतं आहे हे वाचून मनाला नक्कीच समाधान वाटलं.

2016 साली ‘उमेद’चं काम मी संपादक आणि समन्वयक म्हणून सुरू केलं. तेव्हा मीही फेसबुकवर होतेच, पण ते लोकांनी लिहिलेलं लाईक करायला, इतर काही वाचायला इतकंच. नवी उमेदच्या निमित्ताने फेसबुकवर विहार सुरू झाला आणि विविध विषयांवरचे ग्रुप्स, पेजेस अशी बाकीही माहितीत भर पडत गेली. आपल्या घराव्यतिरिक्त, शहराव्यतिरिक्त बाहेर डोकवायला सुरुवात झाली.

लेखकाकडून आलेला लेख वाचणं, एडिट करणं, लिखाणात येणारे पत्रकारितेचे नियम पाळणं हे सगळं इथं होतंच. इथला वेगळेपणा म्हणजे हा लेख पोस्टच्या स्वरूपात फेसबुकवर आमच्या ‘नवी उमेद’ पेजवर पब्लिश होणार होता. पेपरमध्ये छापून आलेल्या गोष्टीला वाचक असतोच, पण तो वाचक पत्रातून व्यक्त झाला तर बातमीदार किंवा संपादकाला ते कळणार असतं. इथं वाचकाची कमेंट, पोस्ट लाईक्स हे लगेच कळणार होतं. अर्थातच याचा खूपच फायदा झाला. आधी आमच्याही पोस्ट 700 ते 800 शब्दांच्या असायच्या. हळूहळू लक्षात आलं की, ‘रीड मोअर’ असं आलं की, वाचक पुढे जात नाहीत. म्हणजेच लोकांच्यातला पेशन्स आता कमी होत चालला आहे. त्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनवर मावेल इतकीच जेमतेम 400 ते 500 शब्दांचीच पोस्ट करायची हा नवा नियम आम्हालाही घालून घ्यावा लागला. कमीतकमी शब्दांत योग्य आशय व्यक्त करता येतो हे संपादन करताना मलाही जाणवलं. उगाचच शब्दांचा फुलोरा, वाक्प्रचार, वर्णनात्मक लिहायची प्रत्येक वेळी गरज नसते हेही त्यातून जाणवलं. पोस्टची भाषाबोली हवी हेही आम्ही कटाक्षाने पाळलं. त्यासाठी पोस्टमध्ये नेहमी येणारे शब्द, वाक्यरचना कशी हवी यासाठी पोस्टलेखन मार्गदर्शिका म्हणजे स्टाईल बुकही आमच्या टीमने तयार केलं.

एखाद्या पोस्टसोबत चांगले फोटो असतील तर ती पोस्ट जास्त वाचली जाते, फोटो बघितले जातात हेही आम्हाला जाणवलं. हळूहळू मजकुरासोबतच्या फोटोंची संख्या वाढली. फोटो अधिकाधिक चांगले मिळतील इकडेही लक्ष दिलं जाऊ लागलं. ‘छायाचित्रकथी’ या इंद्रजित खांबेच्या उत्तम फोटो मालिकेने याला दुजोरा दिला.

फेसबुकवर कसं लिहायचं किंवा ‘नवी उमेद’ची पोस्ट म्हणजेच ह्युमन इंटरेस्ट स्टोरी कशी लिहायची याविषयी आम्ही प्रशिक्षण घेतलं. यातूनही ‘नवी उमेद’ला काही चांगले सहकारी मिळाले.
विश्वासार्हता हे ‘नवी उमेद’चं वैशिष्टय़. ‘नवी उमेद’चा प्रतिनिधीकडून पोस्ट येते तेव्हा त्या प्रतिनिधीशी एकदा बोलणं होतं. गरजनुसार पोस्टनायक/नायिकेशीही चर्चा केली जाते. त्यानंतर योग्य ते संपादकीय संस्कार करूनच पोस्ट फायनल होते आणि ती पेजवर पब्लिश केली जाते. हे तत्त्व गेली पाचही वर्षे आम्ही न चुकता पाळतो आहोत.

‘नवी उमेद’ने विषय लावून धरला आणि त्याला यश आलं हेही सांगण्याजोगच. कराड तालुक्यातलं मलकापूर हे गाव. या गावाने मुलींसाठी मोफत बससेवा योजना सुरू केली. दिल्लीमध्ये 2012 साली निर्भया दुर्घटना घडल्यावर सार्वजनिक वाहनाने प्रवास करणाऱया मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला. या प्रश्नावर सातारा जिह्यातील मलकापूर ग्रामपंचायतीने तोडगा काढला. या ग्रामपंचायतीने यासाठी पन्नास टक्के निधी दिला. ही स्टोरी ‘नवी उमेद’वर प्रकाशित झाली. नंतर change.org नेही ही गोष्ट उचलून धरली. नुकतंच शाळेत जाणाऱया ग्रामीण तालुक्यातील मुलींना मोफत बस प्रवास ही योजना राज्य सरकारने केली हे यशच.

मासिक पाळी काळातलं मुलींचं आरोग्य या विषयासंदर्भात ‘ते पाच दिवस तिला परत मिळवून देऊ या’ हाही एक महत्त्वाचा विषय नवी ‘उमेद’ने हाताळला. आमदार निधीतून सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन पुरवण्याची परवानगी द्यावी असा आग्रह नवी ‘उमेद’ने तेव्हा लावून धरला होता. काही आमदारही तेव्हा असा प्रयत्न करत होतेच. ‘नवी उमेद’च्या मोहिमेने त्यांच्या प्रयत्नांना बळ मिळालं आणि काही काळाने तशी परवानगी अर्थ विभागाकडून मिळालीही.

फेसबुकवर ‘नवी उमेद’ला यश मिळालंच आणि या सगळ्यात ‘युनिसेफ’ कायमच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. नंतर 2017 साली यूटय़ूब, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरही ‘उमेद’नी आपला ठसा उमटवला. आज नवी उमेदचे ‘यूटय़ूबवर 11 हजारांहून अधिक तर इन्स्टाग्रामवर 600 पेक्षा अधिक आणि ट्विटरवर 800 हून अधिक सबस्क्राईबर्स आहेत.
मागचं वर्ष हे सगळ्यांसारखंच आमच्यासाठी कठीण होतं. कोविड 19 च्या साथीला मार्चमध्ये सुरुवात झाली. लॉक डाऊन झालं आणि बाकी सगळ्यांप्रमाणेच आमचंही काम थांबतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण ‘नवी उमेद’चे प्रतिनिधीही जिह्याजिह्यात राहणारे आणि वर्तमानपत्रासाठी काम करणारे. रोज बातमीदारीसाठी बाहेर पडणं हेच त्यांचं काम, पण तेही लॉक डाऊनमुळे घरातच अडकलेले. काय करायचं हा विचार सुरू होता. तेव्हा ‘नवी उमेद’चा कणा असलेल्या आमच्या जिल्हा प्रतिनिधींनीच यातून मार्ग काढला. त्यांनी फोनवर लॉक डाऊनमध्ये लोक एकमेकांना कशी मदत करत आहेत, अडचणी सोडवत आहेत हे सांगायला सुरुवात केली. आजपर्यंत वेगळं काम करणारे लोक तरीही कुठंही प्रसिद्धी न मिळालेले सामान्यातले असामान्य हेच ‘नवी उमेद’चे पोस्ट नायक होते. आताही तीच सर्वसामान्य माणसं त्यांच्यातलं वेगळेपण घेऊन ‘नवी उमेद’ येऊ लागली. कुणी मास्क तयार करणारं, कुणी अडकलेल्या मजुरांना मोफत अन्न वाटप करणारं, त्यांची राहायची व्यवस्था करणारं, कुणी प्रवासात असलेल्या बाळगोपाळांना वेळेत दूध पाजणारं अशा सर्वांच्याच स्टोरी उमेदवार प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यातून अनेकांना वेळेत मदतही मिळाली. फेसबुक, यूटय़ूब, ट्विटर आणि इन्स्टा ही सगळीच समाज माध्यमं ‘नवी उमेद’च्या हातात असल्यामुळे या काळातल्या पोस्ट्स, चर्चा आणि कोविड काळातला अवेअरनेस हे सगळंच अनेक पद्धतींनी हाताळता आलं. वाचकांना योग्य वेळी योग्य माहिती ‘नवी उमेद’ने देऊ केली.

आजवर ‘नवी उमेद’ पेजवर वर्षाला 350 पोस्टस्, 60 च्या आसपास विविध विषयांवरील मालिका, विकलांग मुलांच्या समस्या, होमस्कुलिंग, माता-बाल आरोग्य, कोविड काळात वार्तांकन करणाऱया पत्रकारांशी गप्पा, कोरोना काळातील डॉक्टरांचे अनुभव अशा विविध विषयांवरच्या जवळपास 44 ‘उमेद’ चर्चा आणि आणि समाजावर आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवणाऱया व्यक्तींविषयीचा ‘माझा प्रवास’ या मालिकेचे 10 भाग असं बहुविध काम आम्हाला करता आलं. एरवी समाजात घडणाऱया वाईट गोष्टी चटकन लोकांसमोर येत असतात. त्यातून मानसिक खच्चीकरण होत राहतं. फेसबुकसारखी समाज माध्यमंही यातून सुटत नाहीत. अशावेळी फेसबुकच्या आजवरच्या ‘तू तू-मैं मैं’च्या वातावरणात इतकं सकारात्मक, माणसातला चांगूलपणा शोधून देणारं काम करता आलं याचं खरोखर समाधान वाटतं.

[email protected]