लेख – शेती व शेतकऱ्यांचे हितचिंतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ms-swaminathan

>> विजय जावंधिया

आधुनिक विज्ञानाचा उपयोग हिंदुस्थानला अमेरिकेच्या PL480 च्या मदतीतून मुक्त करण्यासाठी यशस्वीपणे स्वामीनाथन यांनी केला. म्हणूनच त्यांना ‘हरित क्रांतीचे प्रणेते’ ( Father of Green Revolution) ही पदवी देण्यात आली. माणसाला माणसासारखे जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण व्हावी हीच त्यांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी कार्य करावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

जागतिक कीर्तीचे शेतीतज्ञ आणि हिंदुस्थानच्या हरित क्रांतीचे जनक प्रो. मोणकाबू सांबशिवन स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. आमच्या देशात माणूस जिवंत असताना त्याची पिंमत नसते. तो मेल्यावर त्याचे गुणगान करण्यात त्याची उपेक्षा करणारेही स्पर्धेत पुढे असतात.

डॉ. स्वामीनाथन यांच्या कार्याचा प्रारंभ कसा झाला याबद्दल सांगायचे तर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांनी अतुल देऊळगावकरांच्या डॉ. स्वामीनाथन यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकासाठीच्या प्रस्तावनेत जे लिहिले आहे ते इथे देत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महिनाभराने स्वामीनाथन जुन्या दिल्लीत येऊन पोहोचले. अतुल देऊळगावकर यांनी स्वामीनाथन यांच्या मनःस्थितीचे त्या वेळचे वर्णन करताना म्हटले आहे… रेल्वे प्लॅटफॉर्मवर फाळणीनंतरची हिंस्रता वाहत होती. आप्तांना डोळय़ांदेखत कापले जाताना पाहून थिजलेली मने आणि गोठलेले डोळे हिंदुस्थानकडे येत होते, तर काही हिंदुस्थानातून जायची शिकस्त करीत होते. अंगावरच्या कपडय़ांनिशी आलेले निर्वासित कमालीच्या भेदरलेल्या अवस्थेत दाटीवाटीने बसले होते. स्वामीनाथन यांना हिंदीचा गंध नव्हता. इंग्रजी जाणणारा माणूस गाठून त्यांनी माहिती घेतली. दिल्लीत हिंसाचाराची आग उसळली होती. रात्र प्लॅटफॉर्मवरच टक्क जागून गेली. दुसऱया दिवशी स्वामीनाथन टांग्याने पुसा शेती संस्थेकडे निघाले. मात्र ‘स्वातंत्र्याची वही’ रक्ताने माखवणाऱयांबद्दल स्वामीनाथन यांच्या मनात तिडीक निर्माण झाली आणि या हिंसेतून अहिंसा जन्माला आली आणि भुकेतून अन्नधान्याच्या अर्थशास्त्राची जाण. दुष्काळामुळे शेती प्रश्नाचे भान आले आणि आजूबाजूचे अज्ञान पाहून मनात प्रकटले आधुनिक विज्ञान. या आधुनिक विज्ञानाचा उपयोग हिंदुस्थानला अमेरिकेच्या PL480 च्या मदतीतून मुक्त करण्यासाठी यशस्वीपणे स्वामीनाथन यांनी केला. म्हणूनच त्यांना ‘हरित क्रांतीचे प्रणेते (Father of Green Revolution) ही पदवी देण्यात आली. त्यांना त्यांच्या कार्यासाठी जगातील अनेक महत्त्वाची पारितोषिके मिळाली आहेत. हिंदुस्थान सरकारच्या पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पदव्या मिळाल्या आहेत.

माझा त्यांचा परिचय 2005 सालीच झाला. मी 1970 पासून शेतकऱयांच्या व्यथा मांडतो आहे. हरित क्रांतीमुळे शेतीचे उत्पादन (Production) वाढले, पण शेतकऱयांचा कर्जबाजारीपणा वाढला हा मुद्दा मी मांडत होतो. हाच मुद्दा 2005 साली जेव्हा शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून प्रो. स्वामीनाथन वर्धा जिह्याच्या दौऱयावर आले तेव्हा त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मला मिळाली. मी माझ्या गावात वायफड, जि. वर्धा इथे एक छोटी शेतकऱयांची सभा प्रो. स्वामीनाथन यांच्यासाठी आयोजित केली होती. त्या सभेत स्वामीनाथन यांनी शेतकऱयांच्या प्रश्नांची उत्तरे पण दिली. देशातील व विदर्भातील शेतकऱयांच्या वाढत्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनांमुळे ते फार व्यथित होते. 1990 नंतरच्या तथाकथित मुक्त अर्थव्यवस्थेमुळे शेती आणि बिगरशेती क्षेत्रातील आर्थिक अंतर वाढत आहे हे त्यांना जाणवत होते. ही दरी कमी करायची असेल तर ग्रामीण भागात पैशांचा प्रवाह वाढवावा लागेल. फक्त शेतमालाचे उत्पादन वाढवून समानता येणार नाही, तर वाढलेल्या उत्पादनामुळे शेतकऱयांचे उत्पन्न वाढले पाहिजे. शेतमजुराची मजुरीही वाढली पाहिजे याबद्दल त्यांचे विचार स्पष्ट होते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या शेतकरी आयोगाच्या अहवालात स्पष्टपणे अशी शिफारस केली आहे की, शेतकऱयांना शेतीमालाचे हमीभाव वाढवून देण्यात यावे. कृषी मूल्य व खर्च आयोगाने सर्व खर्चावर 50 टक्के नफा जोडून हमीभाव जाहीर करावेत व ते बाजारात मिळतील अशी व्यवस्था सरकारने करावी. शेतमजुरांची कमीत कमी मजुरी ही शहरी संगठित वर्गाच्या कमीत कमी वेतनाशी जोडलेली असावी.

या मांडणीबद्दल मी त्यांना सरळ प्रश्न विचारला की, तुम्ही हरित क्रांतीचा प्रचार करताना एकरी उत्पादन वाढविण्याचे उपदेश शेतकऱयांना करीत होतात व आता शेतकऱयांना योग्य नफेशीर पिंमत मिळाली पाहिजे असे म्हणता, हा विरोधाभास नाही का? त्यांनी एक सेपंदाचाही वेळ न घेता उत्तर दिले, ‘‘त्या वेळेस मी देशाचा विचार करीत होतो. आपला देश अमेरिकेच्या मदतीवर (PL480) जगत होता. ‘Ship To Mouth’ अशी परिस्थिती होती. अन्नधान्याच्या गुलामीतून मुक्तीसाठी उत्पादन वाढविण्याची गरज होती. आज मी अध्यक्ष आहे शेतकरी आयोगाचा, कृषी आयोगाचा नाही. शेतकऱयांनी उत्पादन वाढविले व वाढलेल्या उत्पादनाने त्यांचा नफा वाढला नाही, तर त्या वाढीव उत्पादनाचा त्यांना काय लाभ?

मी त्यांच्या समोर बोलताना त्यांना असे म्हणालो की, घटनेप्रमाणे शेती हा राज्याचा विषय आहे, पण शेती संबंधातले सर्व महत्त्वाचे निर्णय पेंद्राच्या हातात आहेत. उदाहरणार्थ- M.S.P. आयात-निर्यात धोरण, WTO, पतपुरवठा, मुद्रानीती इत्यादी. त्यांनी त्यांच्या अहवालात शेती हा विषय सर्वसमावेशक सूचीत असावा (concurrent list) अशी शिफारस केली आहे. डॉ. स्वामीनाथन व पी. साईनाथ यांच्यामुळेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग वायफडला आले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी 2008-2009 च्या सुमारास जाहीर केलेली कर्जमुक्ती, रोजगार हमी योजना, हमीभावातील (M.S.P.) 28 ते 50 टक्के वाढ या निर्णयात डॉ. स्वामीनाथन यांच्या शेतकरी आयोगाच्या अहवालाचा प्रभाव होता हे नाकारता येत नाही, पण 2009 नंतर यूपीए (UPA 2) च्या सरकारने ते सातत्य टिकविले नाही व 2014 नंतरच्या मोदी यांच्या सरकारने 50 टक्के नफा जोडून भाव देण्याची घोषणा केली, पण ती (A2 + FL) वर केली. डॉ. स्वामीनाथन यांची शिफारस (2 औ 50 टक्के) ची आहे. ही व्यथा त्यांनी व्यक्तही केली होती.
माणसाला माणसासारखे जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण व्हावी हीच त्यांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी कार्य करावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

(लेखक शेतकरी संघटनेचे नेते आहेत.)