अवकाश निरीक्षणाचा काळ आता सुरू होईल, कारण पावसाळा आटोपत आलाय. आपल्याकडे साधारणतः 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात देशभर तुफान पाऊस करतो. तनमनाला तृप्त करतो आणि निरोप घेतो. आता ‘झाले मोकळे आकाश’ अशी स्थिती झाली की, रात्रभराचे ‘आकाशदर्शना’चे कार्यक्रम सुरू होतील. आपल्याकडे अशा कार्यक्रमांचा आधुनिक काळातला आरंभ सुमारे 50 वर्षांपूर्वी झाला. त्यापूर्वीही महादेवशास्त्री जोशी यांच्यासारखे अवकाश निरीक्षक रात्रभर जागून ‘तारांगण’ पाहात होते. त्यांचे त्या काळातले ‘नक्षत्रलोक’ हे पुस्तक आजही रंजक आणि उपयुक्त वाटेल. या मंडळींच्या प्रयत्नातूनच पुढे आमच्यासारख्यांचं कुतूहल जागलं आणि 1980 चे खग्रास सूर्यग्रहण, 1986 ला ‘हॅली’चा धूमकेतू यासाठी जगजागृती करता आली.
काही अवकाशी घटना ही शतकातूनच एखाद् वेळीच येणारी पर्वणी असते. 1898 नंतर 82 वर्षं आपल्या देशात खग्रास सूर्यग्रहण दिसले नव्हते. 16 फेब्रुवारी 1980 रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास आम्ही ते दक्षिण भारतातल्या रायचूर येथून पाहिले. तेव्हाचा अनुभव ही एक अनुभूती होती. त्यानंतर 2019 पर्यंत आपल्याकडून आणखी तीन खग्रास सूर्यग्रहणे आणि दोन कंकणाकृती ग्रहणे दिसली. 1986 मध्ये ‘हॅली’च्या धूमकेतूने केलेल्या जागृतीनंतर हय़ाकुताके, हेलबॉप असे कितीतरी धूमकेतू पाहता आले. जनमानसातली रूढीवादाची धास्ती कमी झाली. या आकाशदर्शन ‘ऋतु’ची म्हणजे नोव्हेंबर ते मे 2024 या काळाची सुरुवातच एका धूमकेतूने आणि तब्बल 80 वर्षांनी ‘दर्शन’ देणाऱ्या ‘त्सुचिनशान-ऍटलस’ या धूमकेतूसाठी आणि ‘ब्लेझ स्टार’ पाहण्यासाठी निरीक्षक आसुसले आहेत. ब्लेझ स्टारचे वैज्ञानिक नाव ‘टी करोने बोरिऑलिस.’ आपण करोना बोरिऑलिसला ‘उत्तर मुकूट’ म्हणून ओळखतो. तर ‘ऑस्ट्रेलिस’ला दक्षिण मुकूट मानतो. हे अनुक्रमे उत्तर आणि दक्षिण गोलार्धातून दिसतात. टी करोने बोरिऑलिस हा एक वारंवारितेने प्रकाशमान होणारा असलेला तारा लवकरच तेजस्वी नवताऱ्यासारख्या दिसणार आहे. हा तारा गेल्या 80 वर्षांत दिसलेला नाही. याचे शेवटचे ‘दर्शन’ 1946 मध्ये लेस्ली पेल्टीसर झाल्याची नोंद आहे. त्याआधी 1866 बर्मिंगहॅम यांनी पाहिला. तेव्हा तो उत्तर मुकुटातून अकस्मात ‘प्रगटला’ आणि अभ्यासकांच्या डोळय़ासमोर चमकला. एखाद्या मृत्युपंथाला लागलेल्या ताऱ्याचा सुपरनोव्हा किंवा अतिनवतारा हातो तेव्हा तो विस्फोट होऊन आकाश उजळतो. मरण पावतो आणि रात्र तर उजळतोच, पण क्वचित ‘दुसऱ्या’ सूर्यासारखा दिवसाही तेजस्वी दिसतो. हा ब्लेझ नवतारा (नोव्हा) मात्र फक्त 80 वर्षांनी प्रकाशमान होतोय.
सन 1054 मध्ये वृषभ राशीसमूहातील ‘क्रॅब’ नावाचा नेब्युला असा काही चमकला की, कित्येक दिवस भरदिवसाही दिसत असल्याची नोंद चिनी अभ्यासकांनी केली आहे. आपल्याकडे तेव्हा जुलै महिन्यात आकाश, मेघाच्छादित असल्याने अशी नोंद नसावी. मात्र कश्मीरमधल्या आदिवासींनी भित्तीचित्रात ‘दोन सूर्य’ दाखवल्याचे दिसते. ते याच सुपरनोव्हावरून, असे काही संशोधकांचे मत आहे. तर असाच एक अल्पकाळ तेजाने तळपणारा ‘ब्लेझ’ स्टार रात्रीच्या आकाशात आता केव्हाही दिसेल तो उत्तर मुकूट (नॉर्दर्न क्राऊन) तारकासमूहात अवतीर्ण होईल. सप्टेंबर सुरू झालाय तेव्हा आकाश निरीक्षकांनी दुर्बिणी सरसावून तयार राहावे. या ब्लेझ स्टारची फोटोग्राफी खूपच आनंददायी असेल. एरवी नुसत्या डोळय़ांनीही तो छान दिसेल.
उत्तर-मुकूट तारकासमूह आपल्यापासून 3000 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्यातला हा वेळावेळी विस्फोट होणारा नवतारा आपल्या ध्रुव ताऱ्यासारखा दिसणार आहे. तो फारच कमी दिवस दिसणार असून त्याची दृश्य प्रत अधिक-10 अधिक-2 एवढी असेल. हा ब्लेझ तारा ध्रुव ताऱ्यासारखा प्रकाशमान होईल तेव्हा तो अर्थातच नुसत्या डोळयांनीही दिसेल. रात्री ‘उत्तर मुकूट’ शोधायचा तर रात्रीच्या आकाशाची थोडी माहिती घ्यायला हवी किंवा तशी माहिती असलेल्या खगोल मंडळासारख्या कोणत्याही संस्थेशी संपर्क साधला पाहिजे. जिथे पोचायला ताशी 35 हजार किलोमीटर वेगाने सुमारे 5 कोटी 70 लाख वर्षं लागतील अशा ठिकाणी असलेला टी-करोने बोरिऑलिसमधला हा तारा दिसू लागला की वेळ दवडू नका. बोरिऑलिस म्हणजे उत्तर दिशा आणि ऑट्रेलिस म्हणजे दक्षिण एवढं लक्षात ठेवा. हे लॅटिन शब्द आहेत.
वैश्विक