
आज हलक्या फुलक्या संगीताबरोबरच शास्त्रीय संगीत नृत्याच्या कार्यक्रमाकडेही आजच्या तरुणाईचा ओढा आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पूर्वापार सुरू आहे. हजारो वर्षांची परंपरा या कलेला लाभली असून ते जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे रसिक श्रोत्यांना या संगीत आजही मंत्रमुग्ध करतं. विशेषतः आजच्या तरुणाईलाही या संगीताचीच भुरळ पडते. याकरिता शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम सादर होत असतात.
शास्त्रीय संगीताच्या अनोखेपणाबद्दल पं. मुकुंदराज देव सांगतात, कलाकारालाही आपली कला लोकांसमोर सादर केल्याचा आनंद मिळतो. रसिकांना असे कार्यक्रम ऐकतानाही आनंद मिळतो. त्यामुळे या कार्यक्रमातून आनंदनिर्मिती होते. संगीताचा मूळ गाभा हाच आहे आणि यातून मिळणारं समाधान हा महत्त्वाचा भाग आहे. कलाकार आणि श्रोत्याचं नात यातून निर्माण होतं त्यातून निर्माण होणा-या अवर्णनीय आनंदाला फार महत्त्व आहे.
सादरीकरण महत्त्वाचं…
आजची तरुणाईही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर प्रेम करतेय. शास्त्रीय नृत्य, राग, गायन, वादन या सगळ्या प्रकारच्या कला आजच्या तरुणांना आवडतात. त्यांना संगीत आवडत नाही, असंअजिबात नाही. उलट यामध्ये तरुणांचे काही आदर्शही आहेत, मात्र ते सादर कशा पद्धतीने होतय यालाही महत्त्व असतं. समोरच्या प्रेक्षकांना कशा पद्धतीने ते आवडेल, पचेल अशा पद्धतीने ते सादर होतंय का ? तशा पद्धतीने ते सादर केलं की, ते तरुणाईला खूप आवडतं. चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद मिळतो. झाकीर हुसेन, परवीन सुलताना, राहुल देशपांडे अशा काही कलाकारांचे कार्यक्रम तरुणांपर्यंत उत्तमरित्या पोहोचतात. काही ठिकाणी उत्तम तर काही ठिकाणी कमी प्रतिसाद असतो, असे असले तरीही प्रत्येक क्षेत्रात असं होतच असतं, अशी माहिती ते शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना तरुणांकडून मिळणा-या प्रतिसादाविषयी देतात.
शास्त्रीय संगीताचा विनामूल्य प्रचार
शास्त्रीय संगीताबरोबरच त्यासाठी वापरली जाणारी हार्मेनियम, तबला या काद्यांचाही प्रसार व्हावा या उद्देशाने ठिकठिकाणी आम्ही संगीतविषयक कार्यक्रम सादर करतो. शिवाय शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचं विनामूल्य आयोजन केलं जातं. यामुळे नव्या शास्त्रीय गायकांना व्यासपीठ मिळतचं तसेच प्रसिद्ध कलाकारांच्या गायकीचा आनंदही त्यांना घेता येतो. काही वेळा सलग तीन दिवस महोत्सवाचंही सादरीकरण केलं जातं. त्यात विविध घराणी, राग, वाद्ये, तालप्रेमींना सोलो गायकीचा आस्वाद घ्यायला मिळतो, अशी माहिती शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजक शशांक दाबके सांगतात.




























































