लेख – वेब न्यूज – डाटा  ब्रीचचा  तडाखा

>> स्पायडरमॅन

फेसबुकचा डाटा लीक होणे यात आता काही नावीन्यच उरलेले नाही असे वाटायला लागले आहे. दर दोन-चार महिन्यांनी कोणी ना कोणी हॅकर ग्रुप, फेसबुकचा माहितीचा साठा पळवत असतो आणि इंटरनेटच्या बाजारात उपलब्ध करत असतो. यावेळीदेखील फेसबुकच्या तब्बल 53 कोटी युजर्सचा डाटा लीक करण्यात आला आहे. 106 देशांतील 53 कोटी फेसबुक युजर्सचे वैयक्तिक  फोन नंबर आणि इतर खाजगी माहिती हॅकर्सकडून सार्वजनिक करण्यात आली आहे. यामध्ये  60 लाख हिंदुस्थानी युजर्सचादेखील समावेश आहे.

विशेष म्हणजे फेसबुकच्या सर्वेसर्वा असलेल्या मार्क झुकरबर्गलादेखील हॅकर्सने आपला हिसका दाखवत त्याचा फोन नंबर आणि इतर खासगी माहितीदेखील सार्वजनिक केलेली आहे. युजर्सच्या सार्वजनिक झालेल्या माहितीमध्ये त्यांचा फोन नंबर, फेसबुक आणि ई-मेल आयडी, जन्म तारीख, पत्ता इत्यादी माहितीचा समावेश आहे. फेसबुकने मात्र हा सगळा डाटा 2019 सालचा असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र सायबर सुरक्षा तज्ञांच्या मते हा लीक झालेला डाटादेखील युजर्सचा दृष्टीने धोकादायक आहे. या सगळ्या गडबडीत हिंदुस्थानच्या एका मोठय़ा कंपनीमध्येदेखील ‘डाटा ब्रीच’ झाल्याच्या बातमीकडे मात्र काहीसे दुर्लक्षच झाल्याचे दिसते.

‘मोबिक्विक (Mobikwik)’ या पेमेंट अॅपचा संपूर्ण डाटा चोरल्याचे एका हॅकर्स ग्रुपने जाहीर केले आहे. ‘जॉर्डनेवन’ या हॅकर्स समूहाने दावा केला आहे की, त्यांनी हिंदुस्थानातील 10 कोटी मोबिक्विक युजर्सचा डाटा हॅक केला आहे. त्यामध्ये युजर्सचे बॅंक अकाऊंट डिटेल्स, फोन नंबर, पत्ता, जन्म दिनांक, नाव, वय याच्या बरोबरच पॅनकार्ड आणि आधार कार्डची संपूर्ण माहितीदेखील चोरण्यात आलेली आहे. आपण हे काम फक्त पैशांसाठी केलेले असून एकदा का निर्धारित रक्कम मिळाली की, आपण हा डाटा डिलिट करू असे या हॅकर्स ग्रुपने म्हटले आहे. फ्रेंच हॅकर ‘रॉबर्ट बाप्टिस्टे’नेदेखील यासंदर्भात ट्विट करत या डाटा चोरीच्या प्रकरणाला दुजोरा दिलेला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या