लॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात

वाचकांसाठी ‘ई-बुक्स’च्या पर्यायांद्वारे अनेक प्रकाशकांनी वाचकांना त्यांच्या पुस्तकांच्या जगात कायम रममाण होण्याचा मार्गच उपलब्ध करून दिला. वाचनविश्वात एका अर्थी ‘डिजिटल युगा’स सुरुवात झाली असली त्यातले फायदे आणि धोके लक्षात घेतले पाहिजेत.

कोरोना संकटामुळे केलेल्या लॉक डाऊनमध्ये सर्व ठप्प झाले आणि उद्योग-व्यवसायापासून सारीच समीकरणे बदलली. मात्र वाचकांच्या विश्वात मात्र एक चांगला आणि वेगळा बदल घडला. लॉक डाऊनमुळे कधी नव्हे तो हाताशी इतका वेळ मिळाला. हा वेळ सार्थकी लावायचा तर पुस्तकांशिवाय दुसरा चांगला आणि विधायक मार्ग नाही. मात्र संग्रही असलेली बरीचशी पुस्तकं वाचून झाली असतील तर करायचं काय आणि वाचनाची भूक भागवायची कशी? असा प्रश्न पडलेल्या वाचकांसाठी ‘ई-बुक्स’च्या पर्यायांद्वारे अनेक प्रकाशकांनी वाचकांना त्यांच्या पुस्तकांच्या जगात कायम रममाण होण्याचा मार्गच उपलब्ध करून दिला.

वाचनविश्वात एका अर्थी ‘डिजिटल युगा’स सुरुवात झाली. पुस्तक हातात घेऊन वाचनाचा आनंद वेगळा ठरणार असला तरी ग्रंथालयेही बंद असल्याने वाचक वर्ग डिजिटलकडे वळला. यामध्ये विशेषतः ‘ई- बुक्स’ वाचनास गती मिळाली. मराठी ग्रंथविश्वातील अनेक प्रकाशकही हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारत आहेत. काळानुसार लेखक, प्रकाशक आणि वाचकांना हा बदल स्वीकारणे अपरिहार्य असून एका अर्थी ‘ई-बुक्स युगा’ची सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

लॉक डाऊनमध्ये रिकामा वेळ मिळालेल्या आणि नियमित असलेल्या वाचक वर्गाने या काळात ‘ई-बुक्स’ वाचनास पसंती दिल्याचे दिसून येते. लॉक डाऊनमुळे एका अर्थी ‘डिजिटल क्रांती’ होत मराठी ग्रंथविश्वात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. त्यामुळे वाचकांसह लेखक आणि प्रकाशकही डिजिटल माध्यमाकडे वळत आहेत. काही प्रकाशकांनी ही डिजिटल क्रांती म्हणजेच प्रकाशकांना एक नवीन संधी असल्याचे मत मांडले, तर काही प्रकाशकांनी
‘ई-बुक्स’ला मर्यादा असल्याचे सांगितले, परंतु छपाईचे महत्त्व कायम राहिले हेच मत सर्वांनी मांडले. ‘ई-बुक्स’ संकल्पना म्हणजे सुरक्षित, सुलभ आणि सहजसोपी आवड निवड जोपासणारी संकल्पना. त्यामुळे लॉक डाऊनच्या काळात ‘ई-बुक्स’ संकल्पनेला विशेष महत्त्व मिळाले. याबरोबरच चोखंदळ वाचकांसाठी हवी ती पुस्तकं कायमस्वरूपी हाताशी ठेवणंही शक्य झालं. सध्याची परिस्थिती पाहता घरात बसून वाचन करण्यासाठी ‘ई-बुक्स’ हा अतिशय सुरक्षित पर्याय आहे. मात्र प्रत्येक क्षेत्राचं आर्थिक गणित नीट बसलं तरच नव्या पर्यायांना खरा अर्थ येतो. तसेच पारंपरिक पर्याय सोडून नवे पर्याय निवडण्याची मानसिकता अजून तरी वाचकांनी फारशी स्वीकारलेली नाही. याबाबत अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणेचे अध्यक्ष राजीव बर्वे त्यांचं निरीक्षण नोंदवतात की, ‘डिजिटल युग’ आले तरी ‘ई-बुक्स’ला अजूनही अपेक्षित मागणी नाही. गेल्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत पुण्यातून 800 ते 1000 ई-बुक्स प्रकाशित झाली आहेत. त्यामध्येही रंजक विषयांना मागणी आहे. भविष्यात ‘ई-बुक्स’ला मागणी वाढली तरीही प्रिंटचे महत्त्व कमी होणार नाही.

सध्या जगभरात ‘ई-बुक्स’च्या 20 उत्कृष्ट वेबसाइट्स आहेत. तसेच ‘कॉपी किताब’, ‘ऍमेझॉन’, ‘फ्लिपकार्ड’, ‘गुगल प्ले स्टोअर’ आदी ठिकाणी ‘ई-बुक्स’ उपलब्ध आहेत. लॉक डाऊनच्या कालावधीत ‘ई-बुक्स’मध्ये वाढ झाली. विशेषतः 90 नंतरच्या पिढीचा ‘ई-बुक्स’कडे कल आहे. सध्या ‘मेहता प्रकाशन’ची 1700 पुस्तके ऍमेझॉन, गुगल प्ले स्टोअरवर असून त्यामुळे परदेशातील मराठी वाचकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचं मत मेहता प्रकाशनच्या सुनील मेहता यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रकाशनाकडे इतिहास आणि संशोधनविषयक पुस्तकांची मागणी कायम असते. पुस्तकं ‘ई-बुक्स’मध्ये आल्यास पायरसीचा धोका जास्त होऊ शकतो. म्हणूनच यादृष्टीने ई-मार्केटिंग महत्त्वाचे ठरेल असे मत पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे यांनी व्यक्त केले आहे.

पूर्वी अनेक घरांमध्ये स्टेटस म्हणून असलेल्या पुस्तकांच्या शेल्फची जागा आता मोबाईल, टॅबने घेतली आहे. यामध्ये हवी तेवढी पुस्तके डाऊन लोड करतात येतात आणि पाहिजे ते पुस्तक अवघ्या काही मिनिटांत उपलब्ध करून घेत असल्याने एका क्लिकवर पुस्तकांचा खजिनाच उपलब्ध होत आहे.

‘बुकगंगा’ने दहा वर्षांपूर्वी प्रथम ‘ई-बुक्स’ हा नवीन प्लॅटफॉर्म मराठी ग्रंथविश्वात आणला, परंतु खऱया अर्थाने त्याच्या कक्षा लॉक डाऊनच्या काळात अधिक विस्तारल्या. या काळात ई-बुक्सला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास शंभर टक्क्यांनी खप वाढला आहे. आता प्रकाशकांनाही ‘ई-बुक्स’ करण्याची गरज भासत असून अनेक जण त्याकडे वळले हा महत्त्वाचा बदल झाला. यामधील पायरसीचा धोका टाळण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तिशीतील पिढी ‘ई-बुक्स’ वाचनाकडे वळत असल्याचे दिसून येते. विशेषतः मराठी माध्यमातील शिक्षकही या माध्यमातून अवांतर माहिती मिळवत आहेत. ‘बुकगंगा’ने ‘किशोर’ मासिक मोफत ऑनलाइन उपलब्ध केले असून या मासिकाचा वाचकवर्ग वाढत आहे. अमेरिकेपेक्षा हिंदुस्थानातील वाचकांनी ‘ई-बुक्स’ ही संकल्पना लवकर स्वीकारली. विशेष म्हणजे हिंदुस्थानातील इतर भाषांपेक्षा सर्वाधिक पंधरा हजार ‘ई-बुक्स’ फक्त मराठीतच उपलब्ध असून ही अभिमानाची गोष्ट आहे. लॉक डाऊनच्या कालावधीत जवळपास शंभर प्रकाशकांची ‘ई-बुक्स’साठी नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर छापील पुस्तकांचाही खप वाढत असून त्याचाही वाचक वर्ग वाढत आहे. – मंदार जोगळेकर, ‘बुकगंगा’ संस्थापक

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या