
>> विवेक वैद्य
दक्षिण हिंदुस्थानात सार्वभौम अधिपत्य गाजविणाऱ्या चालुक्यसम्राट पुलकेशी (बदामी) वंशावळीतील सरदार पाटणकरांच्या राजघराण्यामध्ये, डिसेंबर 1906 च्या दत्तजयंतीचा मुहूर्त गाठून जन्माला आलेले बालक म्हणजेच सर्वदूर सुपरिचित असलेले श्रीगगनगिरी महाराज.
सातारा जिल्हा, पाटण तालुक्यातील, कोयनेच्या खोऱयात वसलेल्या ‘मंदुरे’ गावी गणपतराव पाटणकर (हुजूरवाडेकर) यांचे राजघराणे आहे. शिवपूर्वकालापासून पेशव्यांच्या सत्ताकारभारापर्यंत अनेक पदे भूषविलेल्या हुजूरवाडेकर घराण्यात जन्मलेला श्रीपती तसे पाहिल्यास दुर्दैवीच. वयाच्या तिसऱ्या वर्षी आई विठादेवी आणि वडील गणपतराव यांचे प्रेमळ छत्र हरपल्यावर पोरक्या झालेल्या श्रीपतीचा सांभाळ त्यांच्या आजीआजोबांनी केला. आजोबा वारकरी संप्रदायाचे असल्याने घरी धार्मिक ग्रंथ-वाचन-पठण यांचा नित्यनेम होता. नकळत्या वयातही श्रीपतीला रामायण-महाभारतादी ग्रंथ, पुराणकथा आणि हरिकीर्तनाची गोडी लागली.
शाळकरी वयात श्रीपतीचा घरातील मंडळींसोबत बत्तीसशिराळे या शिवक्षेत्राशी परिचय झाला आणि त्याच्या आयुष्याला वेगळी दिशा लाभली. बत्तीसशिराळ्याला नाथपंथीय साधूंचे मठ होते. या साधूंचा वावर, त्यांचे जीवन याविषयीचे कुतूहल श्रीपतीला खुणावू लागले. त्यांचा पंथ आणि शैलीचे आकर्षण व पगडा श्रीपतीच्या कोवळ्या मनावर ठसला आणि एके दिवशी कोणासही काही न सांगता श्रीपती घर सोडता झाला. मजल दरमजल करीत श्रीपती ग्वाल्हेर येथे पोहोचला. चौकशी करता त्याला झाशीजवळ स्वामी चित्रानंद नावाचे सत्पुरुष वास्तव्यास असल्याचे समजले. श्रीपतीने लागलीच झाशी गाठली. चंबळा नदीच्या काठावर अतिशय शांत व पवित्र वातावरणात त्याची भेट चित्रानंदस्वामींशी झाली. श्रीपतीने घडल्या गोष्टींची माहिती त्यांना दिली आणि आपला मनोदय व्यक्त केला.
चित्रानंदस्वामी विचारात पडले. त्यांनी तपस्व्याचे जीवन किती कष्टप्रद असते याची श्रीपतीला कल्पना दिली, मात्र आपल्या सांगण्याचा श्रीपतीवर परिणाम होणार नाही हेदेखील त्यांना जाणवले. श्रीपतीचा तपस्वी होण्याचा दृढ निश्चय त्याच्या चेहऱयावर प्रखरपणे दिसत होता. श्रीपतीने चित्रानंदस्वामींना पहिल्या भेटीतच जिंकले. दृढ निश्चयाच्या बळावर त्याने तपसाधनेच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ केला. त्याची निष्ठा, समर्पण व चिकाटी चित्रानंदस्वामींना प्रभावित करून गेली. श्रीपतीचे वय तेव्हा जेमतेम 10-12 वर्षांचे होते.
चित्रानंदस्वामींनी श्रीपतीला योगविद्येतील सर्व शिक्षण हातचे काही न राखता देण्यास सुरुवात केली. अनेक किमया शिकवल्या. शरीर कापसासारखे हलके करण्याची क्रिया शिकवली आणि एके दिवशी त्याच्या मस्तकावर हात ठेवून दीक्षानुग्रह दिला. श्रीपती योगविद्येमध्ये पारंगत होताच चित्रानंद त्याला हिमालयक्षेत्री घेऊन गेले. तेथे त्यांनी श्रीपतीची भेट अनेक साधुसंतांशी करवून दिली. अनेक तीर्थांचे दर्शन घडविले. अनेक साधूंचे आश्रम दाखविले. वनस्पती व कंदमुळांची माहिती दिली. हिमालयाच्या दरीकपाऱयात राहून अन्नधान्याशिवाय कंदमुळं खाऊन कसे राहावे याचे प्रशिक्षण दिले आणि श्रीपतीला, ‘उंच डोंगर कपारीत राहा. निरोगी हवा, घनदाट वृक्ष व विपुल पाणी हेच तुझे सर्वस्व आहे!’ अशी सूचना देऊन ते स्वतः तीर्थयात्रेसाठी पुढे एकटेच निघून गेले.
पुढील तपसाधना श्रीपतीला स्वबळावर करावयाची होती. अनेक शिखरे, पर्वतराजीतून फिरत श्रीपती एका गुंफेत स्थिरावला आणि तपसाधना करू लागला. काही दिवसांनी एक चमत्कार घडला. भगवी वस्त्र परिधान केलेला एक तेजःपुंज साधू श्रीपतीसमोर उभा राहिला. त्याने आपल्या कमंडलूतील पाणी श्रीपतीच्या मुखावर शिंपडले. एक विशिष्ट वनस्पती त्यास खावयास देऊन सांगितले, “तुला मोक्षप्राप्ती होईल. मानवजातीचे कल्याण हेच तुझे ध्येय. तू आता दक्षिणेकडे जा!’’ श्रीपतीला आशीर्वाद देऊन साधू अंतर्धान पावला. श्रीपतींनी हिमालयक्षेत्र सोडले. पदयात्रेच्या निमित्ताने मार्गातील सर्व तीर्थक्षेत्रे पाहून झाली. श्रीपतींची देहकाया योगबळाने चमकू लागली होती. याचदरम्यान त्यांचा परिचय श्रीराजाराम महाराजांशी झाला. महाराज शिकारीसाठी दाजीपूर अरण्यात गेले तेव्हा श्रीपतीही सोबत होते. शिकार आटोपल्यावर महाराज माघारी परतले, परंतु श्रीपती तेथेच रमले. घनदाट अरण्य, विपुल वनौषधी आणि महत्त्वाचे म्हणजे ध्यानधारणेसाठी आवश्यक असलेला एकांतवास इथे अनुभवता येत होता. श्रीपतींनी उग्र तपसाधनेच्या बळावर तंत्र व मंत्रविद्येचे ज्ञान प्राप्त केले. त्यांनी विणलेली गवताची चटई कायम तजेलदार व ताज्या गवताप्रमाणे चमकत असे. येथे श्रीपतींनी अनेकदा कायाकल्पही केले.
पावसाळ्यात श्रीपती शेजारच्या गगनगडावर वास्तव्य करीत असत. पूर्वी गर्भगिरी म्हणून ज्ञात असलेल्या या गडावर नाथपंथी सत्पुरुष श्रीगहनीनाथ यांनी कठोर तपश्चर्या केली होती व येथेच त्यांची समाधीदेखील आहे. इथे श्रीपतींनी अनेक साक्षात्कार अनुभवले. ते या गडावर पहिल्या प्रथम आले तेव्हा त्यांना एक नागराज फणा काढीत सामोरा गेला. त्या नागाने श्रीपतींसमोर मणी ठेवला व तो निघून गेला. काही वेळाने तेथे दुसरा नाग आला व तोही श्रीपतींसमोर मणी ठेवून गेला. काही काळानंतर श्रीपतींना शेजारच्या जाळीत एक वाघीण पिल्लांना जन्म देत असल्याचे दिसले. देवदेवता, व्याघ्र आणि सर्पदर्शन होणे हे पुण्यफलदायी असल्याचे जाणून श्रीपतींनी गगनबावडा परिसरातील गगनगडावर मुक्काम करण्याचे ठरविले. हाच निर्णय त्यांना पुढे ‘श्रीगगनगिरी महाराज’ अशी ओळख देता झाला..
श्रीगगनगिरी महाराजांनी कठोर तपश्चर्येच्या माध्यमातून हे स्थळ पावन केले. दिवसभर पाण्यात राहून प्रखर उन्हाचे चटके सोसूनही त्यांनी नाथपंथी साधना अविरत सुरू ठेवली. जळत्या निखाऱयात पाय घालणे, वाघाप्रमाणे डरकाळी फोडणे, जलकुंडात तासन्तास बसून जप करणे, (दिवसेंदिवस पाण्यात राहिल्याने त्यांचे पाय माशांनी कुरतडले होते) अधू पायाने जलसाधना करणे अशा अनेक अशक्यप्राय गोष्टी ते करीत असत. नाथपंथामधील दहावे अवतार म्हणून त्यांचा उल्लेख होत असे. श्रीगगनगिरी महाराजांनी चित्रमुळीचा लेप सर्वांगाला लावून ‘कायाकल्प’ हा प्रयोग तीन वेळा यशस्वीपणे केला होता. जागतिक विश्वधर्म संसदेकडून ‘विश्वगौरव’ पुरस्कार मिळविणाऱया स्वामी विवेकानंदांच्या नंतर सव्वाशे वर्षांनी हा पुरस्कार मिळवणारे श्रीगगनगिरी महाराज हे महान जलतपस्वी होते. लाखो भक्त आपापली गाऱहाणी घेऊन त्यांच्याकडे जात असत अन् त्यांच्या कृपादृष्टीने चिंतामुक्त होऊन प्रसन्न चित्ताने माघारी परतत असत.
लाखो भक्तांचे तारणहार बनलेल्या श्रीगगनगिरी महाराजांचे अवतारकार्य 4 फेब्रुवारी 2008 रोजी पूर्णत्वास आले.


























































