
अभय मिरजकर
‘यस्यां नास्ति माता, तस्य माता हरितकी,’ असे एक संस्कृत वचन आहे. याचा अर्थ असा की आई नसलेल्या मुलांची आई म्हणजे हिरडा. यावरून याची महती लक्षात येते.
हिरडा हा वृक्ष सध्या दुर्मिळ झाला आहे. हिरडा स्वास्थ्यसंवर्धक आणि रोगनाशक आहे. औषधांमध्ये आणि आरोग्य वाढविणाऱया द्रव्यात याचे स्थान महत्त्वाचे आहे. याला हरितकी, हरदी, ओरडो, आरळे, हार अशी नावे आहेत. हिरडय़ाची झाडे 25 ते 30 मीटर उंच वाढणारी असतात. झाड झुपकेदार, पसरट व अनेक वर्षे टिकणारे असते. याचे लाकूड अत्यंत कठीण असते. खोडाचे साल करडय़ा रंगाचे त्यावर असंख्य चिरा असतात. ग्रीष्म ऋतूत पांढऱया पिवळसर रंगाची फुले येतात. नवीन फुलांना सुवास असतो तर जुन्या फुलांचा वास उग्र असतो. कोवळ्या फळांचा रंग हिरवा तर पिकलेल्या फळांचा रंग पिवळसर धुसर असतो. अपरिपक्व फळांना बाळ हिरडे म्हणतात. चांगल्या आरोग्याची इच्छा असणाऱयाने प्रत्येक दिवशी हिरडय़ाचे सेवन करावे असे म्हणतात.
हिरडय़ात गोड, आंबट, कडू, तिखट आणि तुरट हे पाच रस आहेत. गोड, तिखट आणि तुरट रसांमुळे पित्त दोषाचा नाश होतो. कडू, तिखट आणि तुरट रसांमुळे कफ दोष दूर होतो. तर गोड आणि आंबट या रसांमुळे वात दोष दूर होतो. मधुमेहासारख्या रोगात याचा खूप उपयोग होतो. अतिसार, अपचन, अंश पडणे, भूक न लागणे, मुळव्याध, नेत्ररोग, स्थूलता, अतिघाम येणे, अजीर्ण, रक्तपित्त, आम्लपित्त, पित्तशीळ, दाह, कुष्ठरोग, इसब, संधीवातातील ताप, उदररोग, मूतखडा, उचकी, उलटी, पांडुरोग अशा अनेक रोगांवर हिरडा महत्त्वपूर्ण औषध आहे. .
हिरडय़ामध्ये मेंदूची शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. चरबी जाळण्याचा गुणधर्म असल्याने लठ्ठपणा कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. हिरडा मधात खाल्ला तर खोकला कमी होतो. पोटात होणारे सर्व विकार हिरडा घेतल्याने बरे होतात. शरीरावरील एखादी जखम बरी करण्यासाठी त्याची मदत होते. त्वचेच्या जखमा, बुरशीजन्य संसर्ग इत्यादी बरे करण्यासाठी याचा अनेक काळांपासून वापर होत आहे. स्वादुपिंडातील इन्सुलीनच्या उत्पादनाला गती मिळते. मधुमेहात याचा वापर केला जातो. स्त्राr-पुरुषांची प्रजनन क्षमता वाढते आणि प्रजनन क्षमतेशी संबंधित असलेले अनेक आजार यामुळे दूर होतात. हिरडा पाण्यात टाकून उकळवून ते पाणी थंड करून डोळे धुतल्याने डोळ्यांच्या संसर्गापासून आराम मिळतो. नियमित हिरडा कोमट पाण्यातून घेतला तर वजन कमी होते. सांधेदुखीचा त्रास मुळापासून कमी करण्यासाठी हिरडय़ाचा वापर केला जातो. हिरडा चूर्ण दंतमंजनप्रमाणे वापरल्यास दात निरोगी राहतात, शिवाय दात चमकदारही होतात.
चैत्र, वैशाखमध्ये मधासोबत, ज्येष्ठ आषाढमध्ये गुळासोबत, श्रावण, भाद्रपदमध्ये सैंधव मिठासोबत, आश्विन, कार्तिकमध्ये साखरेसोबत, मार्गशीर्ष, पौषमध्ये सुंठीसोबत, माघ, फाल्गुनमध्ये पिंपळीसोबत हिरडय़ांचे सेवन करावे असे सांगितले आहे.
हिरडा ही एक उष्ण प्रवृत्तीची वनस्पती आहे. म्हणूनच गरोदरपणात हिरडय़ाचा वापर टाळतात. त्याचप्रमाणे तान्हे बाळ आणि पाच वर्षांच्या खालील मुलांना हिरडा अतीप्रमाणात देणे धोकादायक ठरू शकते. स्तनपान देणाऱया मातेनेही हिरडय़ाचा वापर आहारात करू नये, असे सांगितले जाते.