लेख – गुरुकृपेने परमंगलम्!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद पोशे

शिष्याचे  अज्ञान घालवून त्याला ज्ञान देतात त्यांना गुरू म्हणतात. जेव्हा जेव्हा आपल्या देशामध्ये अधर्म वाढून धर्माची स्थिती विस्कळीत झाली तेव्हा तेव्हा गुरू-शिष्य परंपरेने ती पुन्हा प्रस्थापित करण्याचे कार्य केले.

आजही अनेक आध्यात्मिक संस्थेद्वारे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्य समाजामध्ये राष्ट्र धर्माचे कार्य करून नैतिकता, संस्कार, संस्कृती टिकवून ठेवत आहेत. आजच्या भीषण परिस्थितीतही पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि तेथून देवत्वाकडे कसे जावे हा साधना मार्ग दाखवणारा जर कोणी असेल तर ते आहेत गुरू. समाजात थोडीतरी नीतिमत्ता टिकून आहे या गुरूशिष्य परंपरेमुळेच. याद्वारेच हिंदुस्थानने कायम जगाला मार्गदर्शन केले आहे. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी नेहमीच्या तुलनेपेक्षा 1000 पटीने गुरुतत्त्व कार्यरत असते. ‘गुरुकृपा ही केवळ शिष्य परममंगलम्’ असल्याने गुरू आपल्या जीवनात येण्यासाठी आपण शिष्य बनण्यासाठी प्रयत्न करायला हवेत व त्यासाठी साधना करायला हवी.

साधना म्हणजे दररोज ईश्वरप्राप्तीसाठी करावयाचे प्रयत्न. हे प्रयत्न करतो तो साधक.  अशाप्रकारे काही वर्षे साधना केल्यानंतरच तो शिष्य बनतो व अशा शिष्याला शोधत गुरू त्याच्या जीवनात येतात व ते मोक्षाला जाईपर्यंत शिष्याला मार्गदर्शन करतात. गुरूंना शोधू नये तर शिष्य बनण्याचा प्रयत्न करावा. मनुष्य जन्माची सार्थकता म्हणजे मोक्ष प्राप्त करणे हाच खरा पुरुषार्थ आहे असे धर्म सांगतो. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशीचा खऱ्या अर्थाने लाभ करून घेतल्यास आपलेही परममंगलम् निश्चित.