आगळं वेगळं – इराण, समुद्राचे तापमान आणि पावसाचे प्रमाण

>> मंगल गोगटे

1950 पासून हवामान तापमानात वाढ होत आहे. तसेच हवामान बदलामुळे जगातील वातावरण टोकाचं होत आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे जगभर हवामान बदल दिसून येत आहेत आणि त्यामुळेच  गरम हवा लहरी, दुष्काळ, वेगवेगळी वादळं वा पर्जन्यमान यात बदल, महासागरांची उष्णता आणि आम्लता, समुद्रातील बर्फ वितळणं, सागरांतील पाण्याच्या पातळीत वाढ, बर्फाची शिखरं वितळणं, समुद्रजीवांत फरक व किनाऱ्यावरील पर्यावरण यात बदल घडताना दिसत आहे

काही वर्षांपूर्वी, अगदी माझ्या आठवणीत, दिवसचे दिवस पाऊस दर्शनच द्यायचा नाही. पण 60-65 वर्षांपूर्वी पर्यंत भर उन्हाळ्यात एकदा तरी पाऊस यायचाच आणि तो मुंबईतही पडायचा. कधीकधी तर गारादेखील पडत. परंतु गेल्या काही वर्षांत मात्र एप्रिलमधेच पाण्याची टंचाई जाणवू लागायची. पाणीपुरवठय़ात कपात केली जायची. कठीण दिवस असायचे ते. या वर्षी मात्र पावसाने अनेक ठिकाणी हाहाकार माजवला. चिपळूणला मदत पाठवून होते न होते तोच आणखी कुठे, तेवढय़ात कुठेतरी चक्रीवादळ. मग बातमी येते की, मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरलेत आणि वर्षभर पाण्याची चिंता मिटली आहे. तोच टीव्हीवर सांगतात की, महाराष्ट्रात कुठेतरी अजून पावसाची गरज आहे. सगळं अतर्क्य वाटू लागतं.

हे फक्त आपल्याकडेच होतंय असं नाही, तर जगभर होतंय. कुठे कुठे प्रचंड पाऊस पडतोय तर कुठे लोक दुष्काळाचा सामना करण्याची तयारी करत आहेत. जगातील हवामान बदल वेगवेगळ्या रूपात होत आहेत. ‘ग्लोबल वार्मिंग’च्या अनेक घटनांनी जगभरात पावसाचं आगमन आणि पध्दतीत बदल झाला आहे. यामुळे शेती उत्पन्नावरही परिणाम  होताना दिसतो. एका विशिष्ट पावसापेक्षा जास्त वा कमी पाऊस पिकांना हानीकारक आहे.

एकूणच हा एवढा व असा पाऊस पडतोय तरी का, हे शास्त्रज्ञांनी शोधून काढायचा प्रयत्न केला. त्यांच्या असं लक्षात आलं की, महासागरांतील पाण्याचं तापमान व त्याबाजूच्या देशांमधे पडणारा पाऊस यात संबंध आहे.  महासागरांचं तापमान 24 डिग्री सेंटिग्रेडपेक्षा वाढलं की वादळं तयार होतात.

आपल्या देशाबाबत, सामान्यतः बंगालचा उपसागर, अरबी समुद्रापेक्षा त्याच्या जास्त तापमानामुळे त्याच्या बाजूच्या प्रदेशात जास्त चक्रीवादळं तयार करत असे. परंतु गेल्या काही वर्षांत पश्चिम किनारपट्टीवर जास्त आणि तीव्र वादळं दिसून येत आहेत. (तौकते आणि निसर्ग) 1951 ते 2020 या काळात हिंदी महासागराचं तापमान वाढलं आहे. 1995 ते 2015 या काळात या उष्णकटिबंधातील हिंदी महासागराच्या वरच्या 700 मीटर पाण्याचं तापमान वाढताना दिसलं आहे. गेल्या दोन दशकांत तर हे तापमान अचानक जास्त वाढलं आहे आणि पुढेही ते असंच वाढत राहणार असल्याचे संकेत आहेत.

 कॅनसस विश्वविद्यालयमधील संशोधनाप्रमाणे धूळ-पाऊस यात जवळचा संबंध आहे. त्यामुळेच तर इराणच्या पठाराच्या तापमानात वाढ होते. असंही लक्षात आलं आहे की, पृथ्वीच्या वातावरणातील गरम हवा विशेषतः तिबेट आणि इराण पठारांवर पोचते आणि मग आपल्या देशात उन्हाळी पाऊस घेऊन येते. यामुळे येणारी ऊष्ण हवा आणि संवहन पावसामुळे आलेली गरम हवा यामुळे जुलै- ऑगस्टमधे सर्वात जास्त पाऊस येतो. त्यानंतर  ती हवा दक्षिणेकडे म्हणजे जास्त उष्णकटिबंधाकडे जाते. म्हणून आपल्याकडील  पाऊस कमी होतो, संपतो. इराणी पठारावरून वाहणारे उन्हाळी शामल वारे धूळ वाढवतात आणि ती अरबी समुद्राकडे नेतात. त्यामुळे पावसाळी पाऊस वाढतो. यामुळे या वर्षी आपल्याकडे पावसाने तीन नंबरचा उच्चांक गाठला.

औद्योगिक काळ सुरू होण्याआधीपासून आतापर्यंत जगाच्या सरासरी तापमानात 1 सेंटिग्रेडपेक्षा थोडी जास्त वाढ झाली आहे. अर्थात ही वाढ फक्त नैसर्गिक कारणांमुळे नाही तर मानवी हस्तक्षेपामुळेही झाली आहे. हरीत गॅस वाढ, जमिनीच्या वापरातील बदल, एरोसोल्स, झाडांची वा गवत इत्यादि गोष्टी या व असल्या गोष्टींमुळे वातावरणाची रचना बदलली आहे  आणि त्यामुळे पृथ्वीचा  ऊर्जा समतोलही व म्हणूनच हे सगळं आजच्या हवामान बदलास कारणीभूत आहे.

भविष्यात ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीचं तापमान असंच वाढत राहिलं तर आपल्याला जास्त व जास्त मोठी अनेक प्रकारची वादळं व त्यामुळे पडणारा मोठा पाऊस बघायचा आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या