अनलॉक!! आम्ही…

>> विद्या कुलकर्णी (वन्य छायाचित्रकार)

लॉकडाऊनमधील रिकाम्या रस्त्यांवर समस्त निसर्ग आपल्या लेकरांसहित अवतरला होता पण अनलॉकनंतर माणसांच्या गर्दीत पशुपक्ष्यांनी आपला मुक्त विहार आवरता घेतला.

अनलॉकचा पशुपक्ष्यांवर परिणाम…

लॉकडाऊनमुळे पशुपक्षीr त्यांना हवे त्या ठिकाणी मुक्त संचार करू शकत होते. बागडू शकत होते. कारण माणसांचा वावर फारच कमी झाला होता. प्राण्यांना माणसांचीच भीती वाटत असते. गोंधळ, गडबड, आवाज यापेक्षा शांतता त्यांना अतिशय प्रिय असते. अशाच ठिकाणी ते राहू शकतात. लॉकडाऊनच्या शांततामय वातावरणामुळे मुक्तपणे वावरणाऱया पशुपक्ष्यांवर मर्यादा आल्या आणि त्यांचा जिकडे तिकडे होणारा मुक्त वावर मात्र बंद झाला. मुख्यतः जिथे पक्ष्यांचा अधिवास आहे अशा परिसरात आता पक्ष्यांना-प्राण्यांना आपले अन्न शोधण्यात अडचण येऊ लागली. शांतपणे, निर्धास्तपणे बागडण्याची बंधनं त्यांच्यावर पुन्हा येण्यास सुरुवात झाली आहे. जंगलातही प्राण्यांचा मुक्त वावर सुरू झाला होता. पक्षी आणि प्राणी शांतताप्रिय असतात. या अनलॉकच्या निमित्ताने पुन्हा त्यांना हवी असलेली शांतता भंग होत आहे, त्यांना एकमेकांशी संवाद साधण्यास अडचणी येत आहे असे वाटते. मात्र आपण सतत लॉकडाऊनमध्येच राहू असे नाही. पक्षी-प्राण्यांना मनुष्यजातीपासून धोका वाटतो. याकरिता लॉकडाऊननंतरच्या काळात निसर्गाचे पुनरुज्जीवन सुरूच राहील याकरिता प्रयत्न व्हायला हवेत.

लॉकडाऊननंतरच्या काळात निसर्गाची निगा राखण्यासाठी

  • ज्या ठिकाणी शहरात, उपनगरात पक्ष्यांचा अधिवास आढळतो अशा जागांची निगा राखायला हवी.
  • रस्ते कायम निर्मनुष्य दिसतील असं होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिसरात राहणाऱया लोकांनी आपल्या परीने तिथे येणाऱया पक्षी आणि प्राण्यांच्या देखभालीसाठी प्रयत्न करावेत.
  • पक्ष्यांच्या घरटय़ांना हात लावू नये. त्यांच्या फार जवळ जाऊन त्यांना घाबरवू नये. फार मोठय़ाने बोलू नये. शांतता असल्यास पक्ष्यांना आपसात संवाद साधता येतो.
  • पशुपक्ष्यांच्या जास्त जवळ जाऊ नये.
  • जिथे पाणथळ जागा आहे त्या जागा भराव टाकून बुजवू नये. कारण यातूनच्या पक्ष्यांना त्यांचं खाद्य मिळतं. अशा जागीच कीटक, किडे जमा होतात. फळफुलांची जागा, पाणथळं, फुलांमधले परागकणही ते खातात. म्हणून झाडांवरील फुले अनावश्यक तोडू नयेत. फुलांची नासाडी करू नये.
  • मुळात जिथे पक्षी-प्राण्यांचा वावर असलेल्या जागा शांत ठेवण्याचा प्रयत्न लोकांनी करायला हवा.
  • शांत जागी नर-मादीला एकमेकांशी संवाद साधता येतो. त्यामुळे त्यांचं संवर्धन होतं आणि प्रजननही जास्त व्हायला मदत होते.
  • पर्यटकांनीही शांततेचं पालन करावं. भडक कपडे घालून जंगल सफारी करू नये. त्यांना याचा धोका वाटतो.
आपली प्रतिक्रिया द्या