प्रासंगिक – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन : एक जाज्वल्य इतिहास

>> दिलीप तु. डुंबरे

15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थान स्वतंत्र झाला तरी त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांत विखुरलेला होता. त्यावेळच्या 565पैकी 562 संस्थानांनी स्वतंत्र हिंदुस्थानात सामील होण्यास सहमती दर्शवली. परंतु हैदराबाद, कश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने हिंदुस्थानात सामील झाली नव्हती.

हैदराबाद संस्थान हे भौगोलिकदृष्टय़ा हिंदुस्थानच्या मध्यभागी असलेले हिंदुस्थानातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबाद संस्थानाची व्याप्ती 16 जिह्यांची होती. हे 16 जिल्हे चार सुभ्यांमध्ये विभागलेले होते. तेलगू भाषिकांचे दोन सुभे, कानडी भाषिकांचा एक सुभा व मराठी भाषिकांचा एक सुभा होता. मराठी भाषिकांच्या सुभ्यात 8 जिल्हे म्हणजे संपूर्ण मराठवाडय़ाचा समावेश होता.

हैदराबाद संस्थानावर मीर उस्मान अली सातवा निजाम याचे राज्य होते. त्याच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन हिंदुस्थानी संस्थानांत सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम उभारला गेला. यामध्ये गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, विजयेंद्र काबरा, भाऊसाहेब वैशंपायन, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी आदी नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून सहभाग घेतला.

निजामाला जिना यांच्या पाकिस्तानात रस नव्हता. हिंदुस्थानच्या मध्यभागी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावे असे त्याला वाटत होते. आपण जनतेवर शासन करण्यासाठीच जन्माला आलो आहोत, अशी त्याची धारणा होती. निजामाने स्वतःचे कायदे, स्वतःचे चलन, स्वतःचे प्रसारमाध्यम, स्वतःचे लष्कर सुरुवातीपासूनच उभारले होते.

मुक्तिसंग्राम सुरू झाल्यानंतर निजामाचा सेनापती कासीम रिझवी याने रझाकारी संघटनेमार्फत जनतेवर अनन्वित अत्याचार सुरू केले. लुटालूट, बलात्कार, पळवापळवी हे त्याने नित्याचेच केले होते. यामुळेच तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादच्या निजामाचे अत्याचारी राज्य खालसा करण्यासाठी लष्करी कारवाईचे आदेश दिले. 13 सप्टेंबर 1948 रोजी हिंदुस्थानी सैन्याने कारवाईस सुरुवात केली. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन पोलो सुरू झाल्यावर अवघ्या दोन तासांत नळदुर्ग अन् सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाडय़ातील बोनाक्कल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद काबीज केले. वाटेत लोकांनी लष्कराला प्रचंड सहकार्य केले. ठिकठिकाणी लोक उत्साहाने लष्कराचे स्वागत करीत होते. इकडे स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेली कृती समिती अलिदाबाद, धर्माबाद, विजापूर, नांदेड तसेच विदर्भाच्या आणि नगर-संभाजीनगर सीमेलगतची गावे स्वतंत्र झाल्याचे जाहीर करत सुटली. 15 सप्टेंबर रोजी संभाजीनगर सर करून फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद सेनाप्रमुख जन. अल इद्रीस व खुद्द निजाम यांनी शरणागती पत्करली. 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच्या या कारवाईचे नाव ‘ऑपरेशन पोलो’ असे ठरले होते. पण पुढे ही कारवाई ‘पोलीस ऍक्शन’ म्हणून ओळखली गेली. या कारवाईमध्ये हिंदुस्थानी लष्कराचे 36 हजार जवान सामील झाले होते. 4 दिवस 13 तास चाललेल्या या कारवाईत हिंदुस्थानी लष्कराचे 32 जवान शहीद झाले तर 97 जवान जखमी झाले.

हैदराबादच्या स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व मराठवाडय़ाने केले व या संग्रामात सर्वात जास्त हुतात्मे मराठवाडय़ातीलच होते. भाषावार प्रांतरचनेचा आग्रही पुरस्कार करणारा मराठवाडा नेहमीच अखंड महाराष्ट्रवादी राहिला. 1996पर्यंत मराठवाडय़ात 17 सप्टेंबर या दिवशी शासकीय पातळीवर झेंडावंदन होत नव्हते. 1995 साली महाराष्ट्रात प्रथमच सत्तेवर आलेल्या शिवसेनेने शासकीय पातळीवर झेंडावंदनाचा निर्णय घेतला. केंद्रातल्या वाजपेयी सरकारने त्याला मान्यता दिली. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस शासकीय पातळीवर मराठवाडय़ाचा स्वातंत्र्यदिन म्हणून झेंडावंदनासह साजरा केला जाऊ लागला.

आपली प्रतिक्रिया द्या