आभाळमाया – मंगळाची जन्मकथा

1638

>> वैश्विक ([email protected])

 चंद्र जिंकल्यापासून आपले म्हणजे माणसाचे डोळे लागलेत मंगळाकडे. लाल दिसणारा ‘अंगारक’ मंगळ ग्रह आपला सख्खा शेजारी. पृथ्वीच्या आतल्या कक्षेतला शेजारी शुक्र आणि बाहेरच्या कक्षेतला शेजारी ग्रह मंगळ. पृथ्वीसारखाच टणक पृष्ठभाग असलेला, कदाचित खोलवर किंवा त्याच्या ध्रुवीय प्रदेशात पाण्याचे साठे असलेला हा ग्रह रात्रीच्या आकाशात छान दिसतो. त्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरताना तो जेव्हा सूर्याजवळ येतो तेव्हा तर दुर्बिणीतून मंगळाची तांब्याच्या चकतीसारखी वर्तुळाकृती आणि त्याच्या ध्रुवीय प्रदेशातल्या थिजलेल्या कार्बनच्या ‘कॅप’सुद्धा दिसतात. 28 ऑगस्ट 2003 रोजी मंगळ सूर्याच्या आणि पृथ्वीच्याही जवळ आल्याची घटना काही हजार वर्षांनंतर घडली होती. त्या काळात आकाश ढगाळ असूनसुद्धा पावसाळय़ाचे शेवटचे दिवस असल्याने दोन-तीन वेळा नयनरम्य मंगळदर्शन झाल्याचं आठवतं. अनेकांनी मोठय़ा दुर्बिणीतून त्याचे फोटोही घेतले होते. पृथ्वीच्या काही कोटी किलोमीटर जवळ आलेला लाल ग्रह पाहणं ही एक वैज्ञानिक पर्वणीच असते.

आपला सूर्य पाच अब्ज वर्षांपूर्वी जन्मला आणि त्यानंतर त्याचे कुटुंब असलेली ग्रहमाला. पृथ्वीचा जन्म सुमारे 4 अब्ज 60 कोटी वर्षांपूर्वी झाला. त्याच्या आसपास म्हणजे काही कोटी वर्षांच्या फरकाने इतर ग्रहसुद्धा तयार झाले. पृथ्वीसदृश दिसणारा मंगळ तर ‘धरणीगर्भसंभूतम्’ म्हणजे पृथ्वीपासून निर्माण झाला अशी संकल्पना मांडली गेली.

आता मंगळावर थेट स्वारी करून वसाहत करण्याची मनोराज्यं पाहिली जाण्याच्या काळात आधुनिक विज्ञानातही मंगळजन्माविषयी सतत संशोधन होतच असतं. अलीकडेच होत असलेल्या संशोधनात असं दिसतंय की, ग्रहमालेच्या जन्मकाळात इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळाच्या ‘वेदना’ अधिक असाव्यात. कारण आता आपण पाहतो तसा हा लाल ग्रह तयार होण्याचा काळ जवळपास दोन कोटी वर्षांचा होता. अर्थात चार-साडेचार अब्ज वर्षांच्या वयात एवढा काळ मोठा नसला तरी मंगळाला प्रचंड टकरींना तोंड द्यावं लागलं.

मंगळ आणि गुरू ग्रहांच्या मध्ये तर अशनींचा प्रचंड पट्टाच आहे. त्या कक्षेतील वस्तुमान एकत्र होऊन एखादा ग्रह तयार होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही आणि तिथे विशालकाय महापाषाण ऊर्फ अशनींचे हजारो तुकडे सूर्याभोवतीच्या कक्षेत फिरू लागले. तसाच एक अशनींचा पट्टा सूर्यमालेतील शेवटचा ज्ञात ग्रह असलेल्या नेपच्यूनच्या पलीकडेही आहे. त्याला ‘किपर बेल्ट’ असं म्हणतात.

मंगळाला बराच काळ अवकाशातून कोसळणाऱया अशनींमुळे फारच त्रास सोसावा लागला. अशनींचा हा मारा सुमारे 2 कोटी वर्षे अव्याहतपणे होत असल्याने ग्रहाला आताचं कायमी स्वरूप यायला अर्थातच तितका वेळ लागला. तसे प्रत्येक ग्रहावरच अवकाशातून दगड-धोंडे सतत कोसळत असतात. पृथ्वीवर कोसळणाऱया शेकडो उल्का वातावरणाशी घर्षण होऊन नष्ट झाल्यामुळे आणि पृथ्वीवर पंच्याहत्तर टक्के पाणी असल्यामुळे त्यांचा उपद्रव होत नाही. तरीही एखादा अशनी ऑरिझोना, तुंगास्का, न्यू क्वेबेक किंवा आपल्याकडच्या लोणारसारखं विवर निर्माण करतोच. अशा सुमारे एकसष्ट हजार अशनीपातांची नोंद आपल्या पृथ्वीवर करण्यात आली आहे. त्यापैकी 200 अशनी मंगळावरून पृथ्वीकडे आल्याचं खगोल इतिहास सांगतो. हे अशनी मंगळावर जेव्हा आदळआपट होत होती त्या काळातले असावेत. कारण एकदा त्याचा पृष्ठभाग पृथ्वीसारखाच टणक झाल्यावर तिथून पाषाण निसटून येणं शक्य नव्हतं. हे अशनी मंगळावरून आल्याचं सिद्ध झालं ते त्यातील धातू व इतर घटकांच्या आणि मंगळपाषाणांच्या साधर्म्यामुळे.

सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी ज्या वस्तुमानात स्वतंत्र ग्रह होण्याची शक्ती नव्हती ते इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाने वेगात खेचलं जात होतं. मंगळ आणि गुरूवर अशाच वस्तुमानातील अनेक अशनींची अक्षरशः बरसात झाली. गुरूचं गुरुत्वाकर्षण तर इतकं प्रचंड आहे की, त्याने शूमेकर लेव्ही -9 हा धूमकेतू मध्ये स्वतःकडे खेचून घेतला तेव्हा त्या धूमकेतूचे तुकडे शक्तिशाली कॅमेऱयातून टिपता आले.

अशाच धक्क्यांमधून सावरत मंगळाचं कठीण कवच तयार झालं. ‘पाथफाइंडर’ आणि इतर अनेक मंगळयानांनी मंगळपृष्ठाचा शोध घेणारे संशोधन केलं. मंगळाच्या जन्मकथेला आताच्या संशोधनामुळे पूर्णविराम मिळालाय असं मात्र नाही. आणखी काही नवा पुरावा पुढे आला की, मंगळजन्माचा नवा आराखडा (मॉडेल) मांडला जाईल. अशा सततच्या विचारमंथनातून आणि प्रयोगांतूनच वैज्ञानिक प्रगती होत असते. कालची संकल्पना बरोबर नव्हती हे लक्षात येताच ते लगेच मान्य करतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणूनच प्लुटो खुजा ग्रह झाल्याचं आपण स्वीकारतो. मंगळाविषयीचं कुतूहल अधिक असण्याचं कारण तो आपला सख्खा शेजारी आणि कदाचित उद्याचं वसतिस्थान!

आपली प्रतिक्रिया द्या