
>> नितीन कुलकर्णी
साधारणपणे दिव्यांगांकडे समाजाचे दुर्लक्ष होते. त्यांना उपेक्षित जीवन जगावे लागते. टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी दहाहून अधिक पदके जिंकत केवळ देशाचेच नाव उंचावले नाही, तर नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. शारीरिक वैगुण्याकडे हताश नजरेने पाहण्यापेक्षा त्यालाच शक्तीचे रूप द्या, असे दिव्यांग खेळाडूंनी जगाला सांगितले. या पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान वाजवलेले ‘वी हॅव द विंग्स’ हे गीत सर्व खेळाडूंना खूपच प्रेरणादायी ठरले.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवर हिंदुस्थानी खेळाडूंनी छाप पाडलेली असताना पॅराऑलिम्पिक स्पर्धेतही हिंदुस्थानी दिव्यांग खेळाडूंनी ‘हम किसी से कम नही’ हे दाखवून दिले. हिंदुस्थानने गुरुवारपर्यंत दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कास्यपदकांवर मोहोर उठवली. टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान वाजवलेले ‘वी हॅव द विंग्स’ म्हणजेच ‘आमच्याकडे पंख आहेत आणि आकाशात भरारी कशी घ्यायची हे आम्ही जाणून आहोत’, हे बहुचर्चित गीत सर्व खेळाडूंना खूपच प्रेरणादायी ठरले. या स्पर्धेत जगभरातील दिव्यांग खेळाडू सहभागी होतात. स्पर्धेत पदक जिंकण्याची आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याची खेळाडूंची जिद्द ही विलक्षण असते.
यंदाच्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानची जबरदस्त कामगिरी राहिली. टीम इंडियाने गुरुवारपर्यंत दहा पदके जिंकली. विशेष म्हणजे दोन दिवसांत दोन सुवर्ण पदकांसह पाच पदके जिंकली. यापूर्वी हिंदुस्थानने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक आणि 1984 च्या ऑलिम्पिकमध्ये प्रत्येकी चार-चार पदके जिंकली होती. टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकलेल्या खेळाडूंनी केवळ देशाचेच नाव उंचावले नाही, तर नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. शारीरिक वैगुण्याकडे हताश नजरेने पाहण्यापेक्षा त्यालाच शक्तीचे रूप द्या, असे दिव्यांग खेळाडूंनी जगाला सांगितले. भालाफेकीत सुमित अंतीलने पुरुषांच्या एफ 64 स्पर्धेत अनेक विश्वविक्रम प्रस्थापित करत सुवर्ण पदक पटकावले. त्याने 68.55 मीटरपर्यंत भाला फेकला आणि तो विक्रम ठरला. 2015 मध्ये मोटार अपघातात त्याला डावा पाय गमावावा लागला. तरीही त्याने हार मानली नाही आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर इतिहास रचला.
जयपूरची रहिवासी अवनी लेखराने शूटिंगमध्ये जागतिक विक्रमाची बरोबरी करत सुवर्ण पदक पटकावले. अवनी ही पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली. त्याचबरोबर शूटिंगमध्येदेखील हिंदुस्थानला पहिल्यांदाच पदक मिळाले आहे. अवनी ही जन्मजात अपंग नाही. ती आणि तिचे वडील प्रवीण लेखरा यांना 2012 मध्ये जयपूरहून धौलपूरकडे जाताना अपघात झाला आणि ते गंभीर जखमी झाले. काही काळानंतर वडिलांची तब्येत चांगली झाली, परंतु अवनीला तीन महिने रुग्णालयात काढावे लागले. तिच्या मणक्याला जोरात मार लागल्याने तिला उभे राहता येत नव्हते आणि चालण्याची शक्तीही कमी झाली. तेव्हापासून ती व्हीलचेअरवर आहे. याच चेअरवर बसून अवनीने देशाचे नाव उंचावले आहे. अपघातानंतर तिने मानसिकदृष्टय़ा स्वतःला सावरले आणि शूटिंगला आपले आयुष्य अर्पण केले. पाच वर्षांतच तिने सुवर्ण पदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये जॅवलिन थ्रोमध्ये नीरज चोप्राचे सर्वत्र नाव गाजत असताना पॅराऑलिम्पिकमध्ये देवेंद्र झाझरियानेदेखील इतिहास घडवला. त्याने भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. वयाच्या आठव्या वर्षी विजेचा धक्का बसल्याने त्याचा डावा हात निकामी झाला होता. पुरुषाच्या एफ 56 थाळीफेकमध्ये हिंदुस्थानच्या योगेश कथुनियाने रौप्य पदक पटकावले. हरयाणाच्या रेवाडीचा रहिवासी टेकचंद याला अपघात आणि लकव्यामुळे अपंगत्व आले. त्याने शॉटपूटमध्ये एफ 55 मध्ये करीअरमधील सर्वोत्तम कामगिरी करून 9 मीटरपेक्षा अधिक अंतर कापले. त्याने पदक जिंकले नसले तरी या पराभवातून शिकत पुढे जाण्याची तयारी केली.
गुजरातच्या वडनगर येथील टेनिसपटू भाविना पटेल यांना तर 12 व्या महिन्यात पोलिओ झाला. नियमित उपचार न झाल्याने दृष्टी कमी झाली. आईवडिलांनी तिला अहमदाबादच्या ब्लाइंड पीपल्स असोसिएशनमध्ये दाखल केले. तेथे तिने केवळ संगणकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला नाही, तर टेबल टेनिस खेळण्यासही सुरुवात केली. टोकियोसाठी पात्र ठरून तिने इतिहास घडवला आणि रौप्य पदकावर नाव कोरले. टेबल टेनिसच्या श्रेणी चारमध्ये रौप्य जिंकणाऱ्या 34 वर्षीय भाविनाने उपउपांत्यपूर्व फेरीत सर्बियाच्या बोरिस्लाव्हा रांकोविचला पराभूत करत पदक निश्चित केले. त्यानंतर उपांत्य फेरीत तिने चीनच्या झांग मियाओला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला, परंतु अंतिम सामन्यात चीनची पहिल्या क्रमांकाची खेळाडू झाऊ यिंगने तिला पराभूत केले. निषाद कुमारने पुरुषांच्या टी-47 उंच उडीच्या स्पर्धेत हिंदुस्थानसाठी रौप्य पदक पटकावले. सुवर्ण पदक अमेरिकेच्याच रॉड्रिक टाऊनसेंडने पटकावले. त्याने 2.15 मीटरपर्यंत उंच उडी घेत जागतिक विक्रमाची नोंद केली. हिंदुस्थानचे शूटर सिंहराजने पुरुषाच्या एअर पिस्तूल एसएच1 स्पर्धेत कास्य पदक जिंकले. हरयाणाच्या सिंहराजचा अंतिम सामन्यात 216.8 स्कोर राहिला. उंच उडी मारणाऱ्या मरियप्पन थंगावेलूने पुरुषांच्या उंच उडीत टी-63 स्पर्धेत हिंदुस्थानसाठी रौप्य पदक जिंकले. मंगळवारी झालेल्या स्पर्धेत मरियप्पनने 1.86 मीटर उंच उडी घेत यश मिळवले. अमेरिकेच्या सॅम ग्रेव्हने 1.88 मीटरची उंच उडी घेत सुवर्ण पदक पटकावले. 26 वर्षांच्या मरियप्पनचे पॅराऑलिम्पिकमधील सलग दुसरे पदक आहे. शरद कुमारने उंच उडीच्या टी-63 श्रेणीतच हिंदुस्थानला कास्य पदक जिंकून दिले. हिंदुस्थानी अॅथलिट वरुणसिंह भाटीदेखील या स्पर्धेत सातव्या स्थानी राहिला. भाटी याने रिओत कास्य पदक जिंकले हाते. सुंदरसिंह गुर्जरने एफ 46 श्रेणीच्या जॅवलिनमध्ये कास्य पदक जिंकले. त्याने 64.01 मीटर जॅवलिन फेकले. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. 2015 मध्ये एका दुर्घटनेत त्याने आपला हात गमावला. सुंदर जॅवलिनशिवाय थाळीफेक आणि शॉटपूटमध्येदेखील पारंगत आहे. 2017 मध्ये दुबईत आंतराष्ट्रीय अॅथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये त्याने तिन्ही प्रकारांत सुवर्ण पदक पटकावले होते. त्याने 2017 आणि 2018 च्या जागतिक पॅराअॅथलिटमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
टोकिओ पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे जीवन हे कष्टप्रद आणि संघर्षाचे राहिलेले आहे, परंतु त्यांनी हार मानली नाही आणि संघर्षालाच त्यांनी यशाचा मार्ग केले. अशा खेळाडूंची कामगिरी देशासाठी गौरवास्पद आहे. या सर्वांनी टोकियोत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. साधारणपणे दिव्यांगांकडे समाजाचे दुर्लक्ष होते. त्यांना उपेक्षित जीवन जगावे लागते. त्यांचे जीवन खूपच आव्हानात्मक राहते. लोकांकडून चांगली वागणूकही मिळत नाही. त्यांच्यासमोर शिक्षण आणि रोजगाराचेदेखील आव्हान असते. दिव्यांगांप्रति समाज खूपच उदासीन असतो. वास्तविक, दिव्यांग व्यक्तींत देशाचे नाव उंचावण्याची क्षमता असते. पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे यश हे अतुलनीय आहे. एखाद्या दुर्घटनेमुळे अपंगत्व आल्याने हताश झालेल्या व्यक्तीच्या मनात आशेचा किरण निर्माण करण्याची प्रतिभा या खेळाडूंत आहे. हे खेळाडू प्रेरणास्रोत आहेत. समाजाने दिव्यांगांप्रति व्यवहारात बदल केला आणि सरकारने त्यांना आणखी प्रोत्साहन दिले तर देशातील दिव्यांग व्यक्तींतील आत्मविश्वास द्विगुणित होईल.
(लेखक क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)



























































