।। एक तरी ओवी अनुभवावी ।।

536

>> अरविंद दोडे

माऊलींची ज्ञानेश्वरी…. साऱ्या जगण्याचे सार त्यांच्या एका पसायदानात एकवटले आहे. रोज एक ओवी जरी वाचली तरी रोजचा जगण्याचा संघर्ष अगदी सुलभ होईल…

कार्तिक शुद्ध त्रयोदशीला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमाऊलींनी श्रीक्षेत्र आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यांची भावार्थदीपिका, अभंग – ओवीगाथा, चांगदेवपासष्टी आणि अमृतानुभव हे ग्रंथ म्हणजे भक्ती-ज्ञानयोगाचे अप्रतिम मार्गदर्शक आहेत. त्यातही भावार्थदीपिका म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ श्रेष्ठ किती आहे हे सांगायला नकोच. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी ज्ञानेश्वरीसारखा साधा, सरळ आणि सोपा ग्रंथ दुसरा नसेल.

‘ज्ञानेश्वरी’ खूप अवघड आहे. समजत नाही, असे अनेकजण सांगतात. कुठलाही ज्ञानग्रंथ हा अभ्यासावा लागतो. त्यासाठी शिक्षक हवा. स्वतः विद्यार्थीभावाने त्याच्या अंतरंगात शिरण्यासाठी अंतर्मुख व्हावे लागते. कथा, कादंबऱ्या वाचून विसरतात, पण ज्ञानप्राप्तीसाठी उद्बोधक तत्त्वज्ञान अंगी मुरवावे लागते. सामान्य जनांना गीतातत्त्व कळावे म्हणून हा संवाद साधताना अधिक साधा, सोपा आणि सरळपणे सांगितला आहे. तो आपणास कळत नसेल, आपल्या विद्यापीठीय पदव्या फक्त पोटार्थी आहेत. ‘ज्ञानार्थी’ नाहीत. ज्ञानेश्वरीत काय आहे?

आदिपुरुषाची मायाशक्ती माणसाचे मन मोहाने भारून टाकते, ते त्यास स्वकर्तव्याचा विसर पडतो. आपण अजाण असतो (वय वाढले तरी) अज्ञानीच राहतो. सार आणि असार यात विवेक करता येत नाही. परमात्मतत्त्व आत्म्याला भेटावे म्हणून आपल्याला तळमळ वाटत नाही. डोळसपणे विचार करून स्वधर्म आचरावा असा आग्रह भगवंत हे भक्ताला करतात. तोच आग्रह माऊलींनी दुसऱ्या अध्यायात करून (पहिल्या अध्यायातील अर्जुनाचा) ‘विषाद’ घालविण्याचा योग साधला आहे.

मनाचे कान करून जीवाचे भान ठेवून, बुद्धीच्या डोळय़ांनी पाहिल्यावर जग जसे आहे तसे आणि त्याहीपलीकडचे अनुभवता येते. चैतन्यशक्ती बुद्धीचे डोळे उघडते. जीव परमानंदाच्या राशीवर विसावतो. आता प्रश्न आहे तो आपल्या धावपळीच्या जगण्यात, धकाधकीच्या जीवनात ‘सवड’ नावाच्या सखीला गाठायचे कसे नि कुठे?

माऊलींनी एकूण अठरा अध्यायांतून विकारांवर विजय मिळवताना कसा अखंड भगवद्भाव राखावा हेही पटवून दिले आहे. तिसऱ्या अध्यायात केवळ कर्ममार्गांची प्रतिष्ठा केली असून चौथ्यामध्ये कर्म आणि ज्ञानमार्गाची सांगड घातली आहे, असे स्वतः माऊलीच दहाव्यामध्ये सांगतात. आपली ज्ञानप्राप्तीची योग्यता परिपूर्ण करण्यासाठी विवेकाचा हात धरावा लागतो. त्याच्या जोडीला वैराग्य हवेच. विवेकाने सत्ता, संपत्ती, वर्ण, जाती, प्रसिद्धी, प्रतिष्ठा अशा अनेक गोष्टींचा माज येत नाही. सारे क्षणभंगूर आहे हे जाणून वैराग्य वाढत जाते. अविवेकाची काजळी झाडल्यावर विवेकदीपिका उजळते. म्हणून ज्ञानाभ्यास सवैराग्य हवा.

नामदेवांनी ज्ञानदेवांची स्तुती करताना म्हटले आहे –

गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी। ब्रह्मानंदलहरी प्रगट केली।।

सारांश, हे धर्मकीर्तन करताना सामान्य भाविकांना समजावे हा मूळ उद्देश होता. (तो वाणीचा) हा वाङ्मयीन यज्ञ पूर्णत्वास गेल्याचे दिसून येते. लाखो वारकरी आषाढीला वारी करतात, ते याच कारणामुळे! ‘पसायदान’ ही विश्वप्रार्थना. अशी प्रार्थना जगातल्या कुठल्याही धर्मात नसेल. नऊ हजार तेरा ओव्यांचा हा ग्रंथ आपल्या नित्यपठणात असावा. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ एवढीच अपेक्षा! ।।जय जय रामकृष्ण हरी।।

 

आपली प्रतिक्रिया द्या