लेख – सावध ऐका पुढल्या हाका

1115

आपल्या सभोवतालाविषयी म्हणजे अगदी तराळ ते अंतराळापर्यंत प्रदूषण कसं विळखा घालतंय त्याची वृत्ते अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. त्यातच निसर्गाच्या लहरींनी भर पडते. भूकंप किंवा सुनामी काही माणूस घडवत नाही. भयंकर चक्रीवादळांना आपण जबाबदार नसतो. निर्हेतुक निसर्ग त्याची कधी विधायक तर कधी विनाशकारी रूपं दाखवत असतो. त्यातल्या काही गोष्टींचा थोडा थोडा अंदाज आपल्याला यायला लागलाय. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे संभाव्य वादळं किंवा अवकाशातून एखादा धोंडा पृथ्वीवर आदळणार आहे का याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू असतात.

निसर्गच एवढे उत्पात करीत असेल तर बदलत्या पर्यावरणाला केवळ माणसालाच का दोष द्यायचा असा प्रश्न बरेच जण विचारतात. शिवाय पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंगची हाकाटी विकसनशील देशाच्या प्रगतीतला अडथळा ठरते, असं मत हिरीरीने मांडलं जातं. डोनाल्ड ट्रम्पचासुद्धा पर्यावरण संकटावर फारसा विश्वास नाही.

प्रगत देशांनी एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात जगात एवढं मानवनिर्मित प्रदूषण करून ठेवलंय की, बाकीच्या देशांनी काही प्रकल्प हाती घ्यायला आता तेच विरोध करतात. ही मखलाशी आहे असं मानलं तरी प्रत्यक्षात प्रमाण काय हवं? कारणे काहीही असतील, मूलतः जबाबदारी कोणाची असेही वाद असतील, पण जगभरच्या पर्यावरणाचा गेल्या शंभर वर्षांत ऱहास झाला आहे की नाही हे तपासून पाहावं लागेल.

आजच सगळी झाडं कुऱहाडीखाली आली तर उद्याच्या पिढय़ांसाठी आपण वैराण जग ठेवून जाऊ. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांचा विचारपूर्वक वापर आणि नियोजन करूनच प्रगती साधावी लागेल. आधुनिक युगात प्रगतीला कोणीच नकार देणार नाही, परंतु तिचा अंतिम परिणाम अधोगतीकडे जात असेल तर ती प्रगती आहे काय यावर जगभर चर्चा, वाद सुरूच आहेत.

रिओ येथील वसुंधरा परिषदेपासून (1972) जगाने हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, समुद्राची वाढती पातळी, ध्रुवीय प्रदेशातील वितळते प्रचंड हिमनग आणि विविध रासायनिक वायू हवेत सोडले गेल्यामुळे प्रत्येक श्वासागणिक होणारा त्रास याची जी नोंद गेल्या काही वर्षांत केली आहे ती तर खोटी नव्हे? त्यामुळे पर्यावरणस्नेही प्रगती साधायची हे ध्येय ठेवून त्यानुसारच भविष्यकाळात जगाची वाटचाल करावी लागेल. नाही तर एका बाजूला अंतराळ जिंकल्याच्या बाता मारत असताना आपण आपला विश्वातील केवळ अमूल्य ग्रह गमावला असं होईल.

जगाच्या अंताचं भवितव्य दाखवणारं घडय़ाळ आता जगाचे ‘बारा’ वाजण्यापासून फक्त एक मिनीट चाळीस सेकंद दूर आहे आणि त्यामध्ये आण्विक युद्धाइतकाच पर्यावरण असंतुलनाचाही समावेश करण्यात आला आहे.

मग खरोखरच क्लायमेट इमर्जन्सी किंवा पर्यावरणीय आणीबाणी किती आहे? जगातील 153 देशांमधील तब्बल 11 हजार शास्त्र्ाज्ञांना ‘क्लायमेट इमर्जन्सी’ची धास्ती वाटतेय. जगात सर्वत्र निर्माण होणाऱया आणि वातावरण क्षणोक्षणी प्रदूषित करणाऱया, श्वसनाला घातक ठरणाऱया वायूंचं प्रमाण इतकं वाढतंय की वेळीच त्याला आवर घालण्याचे कठोर उपाय केले नाहीत तर परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाईल असं या शास्त्र्ाज्ञांनी बजावलं आहे.

गेल्या काही वर्षांत आपणही वेळीअवेळी उन्हाळा, पावसाळा अनुभवत आहोत. जगात थोडय़ाफार प्रमाणात हीच स्थिती आहे. जगाची मतं धाब्यावर बसवणाऱया चीनलाही प्रदूषणाने एवढा विळखा घातलाय की लोकांना मोठय़ा शहरांत मास्क लावून फिरावं लागतंय. हवेतला कार्बन आणि इतर घातक वायू शोषून घेणाऱया यंत्रणा बसवताना त्या खर्चिक आहेत म्हणून चालणार नाही. प्रदूषण नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे अमलात आणले गेले नाहीत तर आज खर्चिक म्हणून उपायांकडे कानाडोळा केलेला परवडणार नाही. कारण ही अनाठायी बचत उद्या माणसाच्या जीवनाचं मोल मागण्याएवढी उग्र होईल.
1953 मध्ये लंडन शहरावर प्रदूषणाची ढगफुटी झाली ती प्रचंड थंडी आणि वातावरणात ढगाआड कोंडलेल्या धुरामुळे. तसे प्रकार घडण्यापासून पृथ्वीचा प्रत्येक भाग वाचवायचा असेल तर शास्त्र्ाज्ञ म्हणतात त्यानुसार कठोर प्रदूषण नियंत्रण उपलब्ध ऊर्जेचा परिपूर्ण (एफिशियन्ट) वापर, कचऱयाची कमीत कमी निर्मिती आणि सुरक्षित विल्हेवाट याकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर तथाकथित प्रगतीचा त्रास आपल्याच पुढच्या पिढय़ांना होईल. परस्परांवर दोषारोप न करता सामंजस्याने उपाययोजना केली आणि सावधपणे पुढच्या हाका कानी आल्या तरच तरणोपाय दिसतो. 23 तारखेच्या जागतिक हवामान दिनाचा तोच संदेश असेल.

आपली प्रतिक्रिया द्या