मुद्दा – हिंदुस्थानचे पहिले इंटेलिजन्स चिफ – रामेश्वर काव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप तुकाराम डुंबरे

रिसर्च ऍण्ड ऍनॅलिसीस विंग (रॉ) या हिंदुस्थानी गुप्तचर संघटनेचे नाव माहिती नाही असा हिंदुस्थानी विरळच. 1962 च्या चीन विरुद्धच्या युद्धामध्ये हिंदुस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. याचे प्रमुख कारण होते की, आपल्याकडे सक्षम असे इंटेलिजन्स नेटवर्क नव्हते, ज्यांनी उत्तरेकडे चीनच्या हालचालींवर नजर ठेवली असती. 1965 च्या पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धानंतर तर या इंटेलिजन्स नेटवर्कचा कमकुवतपणा उघड झाला आणि एका सक्षम इंटेलिजन्स नेटवर्कची गरज देशाला भासू लागली.

21 सप्टेंबर 1968 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी IB (Intelligence Bureau) चे विभाजन केले आणि Research and Analysis Wing अर्थात RAW (रॉ) ची स्थापना केली. या ‘रॉ’चे प्रमुख काम होते, सर्व जगावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्यातल्या त्यात दक्षिण आशियाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘रॉ’चे पहिले चिफ म्हणून रामेश्वर नाथ काव यांची नियुक्ती केली. रामेश्वर काव हे आधी आयबीचे डायरेक्टर होते. त्यांच्या आधीच्या परफेक्ट कामामुळे आणि त्यांच्या क्षमतेमुळे त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली.
रामेश्वर नाथ काव यांचा जन्म 10 मे 1918 साली वाराणसी येथे झाला. ते कश्मिरी पंडित होते. त्यांचा परिवार कश्मीरच्या श्रीनगर येथून वाराणसी येथे स्थलांतरित झाला होता. रामेश्वर काव त्यांच्या जवळच्या लोकात ‘रामजी’ या नावाने ओळखले जात होते. काव यांनी 1968 साली ‘रॉ’च्या अध्यक्षपदाची धुरा घेतली त्या वेळी दक्षिण आशियामधील वातावरण तापलेले होते. त्यांनी ‘रॉ’ची रचना सरकारला दिलेल्या आराखडय़ाप्रमाणे केली होती. हे गुप्तहेर ‘कावो बॉईज’ म्हणून ओळखले जात असत. पुढे त्यांच्यावर याच नावाने The KaQoys Of Raw हे पुस्तकदेखील प्रकाशित झाले.

1970 साली पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशमध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली होती. काव यांनी याचाच फायदा घेत ‘बांगलादेशमुक्ती वाहिनीच्या’ एक लाखाहून अधिक जवानांना सैनिकी प्रशिक्षण दिले. काव यांचे गुप्तचरांचे जाळे इतके मजबूत होते की, त्यांना पाकिस्तान हिंदुस्थानवर कधी हल्ला करणार याची तंतोतंत माहिती होती. त्यामुळेच 1971 मध्ये सतरा दिवस लढले गेलेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव केला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. यामुळे हिंदुस्थानला चीनसह पूर्वेकडून जो धोका होता तो कमी होण्यास मदत झाली. हे कावोंसाठी पर्यायाने हिंदुस्थानसाठी खूप मोठे यश होते. यामुळे काव यांना दिल्लीच्या वर्तुळात खास गणले जाऊ लागले होते. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धानंतर 1975 साली काव यांनी पंतप्रधानांना सिक्कीम इथल्या असंतोषाबद्दल जाणीव करून दिली. सिक्कीम येथील असंतोषामुळे सिक्कीम हिंदुस्थानपासून वेगळे होण्याची चिन्हे दिसू लागली होती. 1962 च्या हिंदुस्थान-चीन लढय़ातून धडा घेत काव यांच्या नेतृत्वाखाली ‘रॉ’ने काम सुरू केले आणि चिनी सैन्य सिक्कीमवर चाल करून येण्याआधीच हिंदुस्थानात विलीन झाले होते. सिक्कीम हिंदुस्थानशी जोडून ठेवण्यात व चिनी सैन्याचे सिक्कीमवर ताबा मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्यात ‘रॉ’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. कावोंच्या या चाणक्यनीतीमुळेच आज सिक्कीम हिंदुस्थानात आहे, अन्यथा आज तो चीनचा एक भाग असलेला दिसला असता. त्या वेळी दिल्लीतल्या सर्व राजकीय वर्तुळातील लोकांनी ‘रॉ’च्या या उत्तम कामाचे कौतुक केले होते. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील ‘रॉ’चे व काव यांचे कार्य वाखाणले गेले होते. 1970 च्या काळात जगातील पाच सर्वोत्तम इंटेलिजन्स चिफमध्ये कावदेखील गणले जात होते.

काव हे प्रसिद्धीपासून नेहमीच लांब राहिले. ते सार्वजनिक ठिकाणीदेखील फारसे दिसले नाहीत. निवृत्त झाल्यानंतर रामेश्वर काव हे दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राहत होते, परंतु त्यांचे निवासस्थान नेमके कुठे आहे हेदेखील अनेकांना माहिती नव्हते. असे म्हणतात त्यांच्या पूर्ण कार्यकाळात फक्त दोन वेळा त्यांचे फोटो काढले गेले. त्यांच्या परिवारात व नातलगांच्या समारंभातसुद्धा ते फोटो काढून घेत नसत. त्यामुळेच काव हे कसे दिसतात याची माहितीदेखील बहुतेकांना नव्हती. काव यांना त्यांच्या अनुभवांविषयी पुस्तक लिहिण्यास अनेक वेळा अनेक जणांनी सुचवले, परंतु त्यांनी त्यासाठी साफ नकार दिला. आजदेखील ‘रॉ’चे नाव निघते त्या वेळी रामेश्वर नाथ काव यांच्या नावाचीही चर्चा हमखास होते.