लेख – शापातील वरदानाचा शोध-बोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी 

सिंगापूरहून आलेला एक मित्र गप्पांच्या ओघात सांगत होता ‘‘आमच्याकडच्या ‘नॅशनल एन्व्हयर्नमेंट एजन्सी’चं बोधवाक्य आहे. ‘रिडय़ूस, रिप्युज, रिसायकल’ म्हणजे पर्यावरणाला हानी पोचवणाऱया गोष्टींचा वापर कमी करा, त्याचा शक्यतो पुनर्वापर करा आणि तेही शक्य न झाल्यास रि-सायकल करून म्हणजे त्यावर प्रक्रिया करून त्यातून नव्या वस्तूंची निर्मिती करा. या उद्देशाने सिंगापूरने रोजचा सुमारे साडेआठ हजार टनचा घनकचरा प्रदूषण न करता जाळून त्यापासून निर्माण होणारी उष्णता वापरून जे बाष्प तयार होते त्यापासून वीजनिर्मिती केली जाते. एवढंच नव्हे तर युरोपातला कचरा आयात करूनही ते ऊर्जानिर्मिती करतात. आता इथेही असे प्रकल्प येत आहेत, हे स्वागतार्ह आहे.

आपल्याकडे मुंबईसारख्या महानगरात सिंगापूरपेक्षा जास्त घनकचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करून शहरं, गावं तर स्वच्छ होतीलच, पण ऊर्जानिर्मितीही मोठय़ा प्रमाणात होईल. गरज आहे ती सिंगापुरी सूत्र आपल्या पद्धतीने अमलात आणण्याची. 18 मार्चला ‘रि-सायकल’ दिवस असतो. त्यानिमित्त विचार करताना हे आठवलं.

एकोणीसशे साठच्या दशकात घरोघर पत्र्याचे डबे, तांब्या-पितळय़ाची भांडी, त्याच धातूंचे मोठे डबे पिंवा घागर, कळशा दिसायच्या. तवे, पळय़ा, कढया लोखंडाच्या असायच्या. आमच्या लहानपणी प्लॅस्टिक अगदी क्वचित दिसायचं. गोणी ज्युटच्या, पिशव्या जाड कापडाच्या एवढंच काय आमची शालेय दप्तरंही सुती कापडाचीच असायची. चप्पल, बूट विजारीचे, पट्टे चामडय़ाचे आणि रेनकोट वरून कपडा व आतून रबरासारख्या पदार्थाचा थर असलेल्या ‘मेणकापडा’चे होते. काही ठिकाणी तांबं, पित्तळ याऐवजी अॅल्युमिनियमची भांडी दिसायची. त्याला ‘जर्मन सिल्व्हर’ म्हणत. कपबशा, प्लेट, ग्लास, फ्लावरपॉट काचेचे आणि खेळणी पत्रा पिंवा लाकडाची अथवा चिनी मातीची दिसायची. आज यातल्या बऱयाचशा वस्तू गायब झाल्या आहेत. पातेली (टोप) पितळय़ाची आणि बादल्या जाड पत्र्याच्या होत्या. जरा बरी परिस्थिती असलेल्यांकडे ‘स्टेनलेस स्टील’चं कौतुक असायचं, पण जुनी माणसं या ‘लोखंडा’च्या ताटात जेवण घेण्यापेक्षा कल्हई केलेलं पितळय़ाचं ताट-थाळी पसंत करायची. यातल्या बहुतेक वस्तू ‘मोडीत’ जाऊन रिसायकल होणाऱया आणि बाकीच्या बायोडिग्रेडेबल म्हणजे गंजून-पुजून मातीत मिसळून जाणाऱया असायच्या. वाणसामानाच्या पिशव्याही जाड कागदाच्या आणि पॅकिंगला पुठ्ठय़ाचे खोके असायचे त्याचंही रि-सायकलिंग होऊन कलात्मक वस्तू बनवल्या जायच्या. अगदी फोनोग्रामच्या प्लॅट्स तबकडय़ासुद्धा मेणाच्या. सारंच पर्यावरणस्नेही.

नंतरच्या दोन दशकात हे चित्र वेगाने पालटलं न गंजणारं, वजनाने हलपं आणि खरेदीला स्वस्त असलेलं प्लॅस्टिक लोकांना साहजिकच ‘वरदान’ वाटू लागलं. गंजलेल्या पत्र्याचा धोका नको आणि जड वस्तूंचं वजन नको अशा सोयीमुळे गरम वस्तू वगळता बाकी सगळय़ांसाठी प्लॅस्टिक उपयुक्त ठरू लागलं. त्यामुळे काचेच्या बाटल्या, कलात्मक वस्तू या नव्या पदार्थातून आकाराला आल्या. बघता बघता अवघं जग ‘प्लॅस्टिक’मय झालं. त्यातच आपल्या ‘जपून ठेवा, जपून वापरा’ या संस्कृतीला छेद देणारे ‘यूज अॅण्ड थ्रो’ म्हणजे वापरा आणि फेकून द्या हा सोपा वाटणारा विचार रुजल्याने अनेक गोष्टी ‘थ्रो’ करून कचरा बेसुमार वाढू लागला.

याच काळात रसायनशास्त्रात प्रगती होऊन विविध नव्या रंगांची आणि वस्त्रोद्योगात क्रांती होऊन कृत्रिम धाग्यांची कापडं आली. टेरिलिन वापरणं प्रतिष्ठंचं ठरलं. सुती कपडे मागे पडले. तसाही आपला सुती कपडय़ांचा उद्योग, इथला कापूस नेऊन ब्रिटिश राजवटीने पळवलाच होता. त्यात आता कृत्रिम धाग्यांची भर पडली. पन्नाशीच्या आसपासच्या लोकांना त्यांच्या बालपणीच्या एकेका वस्तूचा विचार करताना अनेक पर्यावरणस्नेही वस्तूंची नावे आठवतील.

परंतु काळाचा वेग थांबवता येत नाही. प्लॅस्टिक, कृत्रिम वस्तू हे सर्व आलं, आवडलं आणि स्थिरावलं, पण त्यानंतरच्या दशकात त्याच्या कचऱयाने (गार्बिज) हळूहळू उग्र रूप धारण करायला सुरुवात केली. कमी दर्जाच्या, कमी मायक्रोनच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तर शाप ठरू लागल्या. त्यांनी गटारं तुंबवली, परिसर घाण केला, मातीत न मिसळल्याने जमिनींचा पोत बिघडला आणि ते नकळत खाल्ल्याने दुभत्या जनावरांना घातक ठरू लागलं.

त्याचप्रमाणे रासायनिक खतं, साखर कारखान्यात निर्माण होणारी मळी आणि शहरी भागातल्या ‘चिमण्यां’मधून बाहेर पडणारा धूर यातून प्रदूषणाचा विळखा वाढला. जग उशिरा जागं झालं. आता यातल्या बऱयाच गोष्टींवर प्रक्रिया करून त्याचं ऊर्जेत रूपांतर करून पुनर्वापर करण्याचं तंत्रज्ञान चांगलंच विकसित झालं आहे. शिवाय आपल्याकडे आहे तशी कमी मायक्रॉन्सच्या प्लॅस्टिकवरची बंदीही प्रभावी ठरेल. या उद्योगांना पर्याय मिळून हळूहळू प्लॅस्टिकचा, पर्यावरणविरोधी वस्तूंचा वापर कमी (रिडय़ुस) करायला हवा. तशा भक्कम वस्तू असल्याच तर त्या स्वच्छ ठेवून पुनर्वापर (रियुज) करायला हवा आणि त्याची उपयुक्ता संपली तर योग्य ठिकाणी टाकून त्यातून पुननिर्मिती (रि-सायकल) पद्धतीने ऊर्जा तयार व्हायला हवी. त्या दृष्टीने आपल्या देशातही कचऱयापासून ऊर्जा बनवण्याचे अनेक प्रकल्प सुरू होत आहेत. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. आंध्रमध्ये असा प्रकल्प 2003 मध्ये शाद नगर येथे सुरू झाला. सरकारने याबाबत प्रयत्न करायला हवेतच, पण जागृत जनसहभागही महत्त्वाचा. बदल एकदम होणार नाही हे मान्य, पण म्हणून चांगल्याची सुरुवातच करू नये असं नाही. आम्ही अनेक कमी मायक्रोनच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या नाकारतो. कापडी पिशव्या वारतो. इथून जरी सुरुवात झाली तरी ‘उद्या’ बदल दिसेल. तो आपल्यासाठीच सुखाचा ठरणार आहे.

[email protected]