ओडिशाची सॅण्ड आर्ट

3

>> आशुतोष बापट

वालुकाशिल्प ही ओडिशाची मुख्य ओळख. 1 ते 5 डिसेंबरदरम्यान कोणार्क येथे ‘सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल’ संपन्न झाले. या उत्सवात हिंदुस्थानातील अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली.

हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरामध्ये शांतपणे पाय सोडून बसलेला प्रदेश म्हणजे ओडिशा. निसर्गाने आपल्या दोन्ही हातांनी या प्रदेशाला भरभरून दान दिलेले आहे. विविध कला, संस्कृती, मंदिरे यांची रेलचेल या प्रदेशात पाहायला मिळते. भुवनेश्वर हे राजधानीचे शहर म्हणजे मंदिरांची नगरी म्हणूनच ओळखले जाते. 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत झालेल्या कोणार्क इथला डान्स फेस्टिव्हल आणि कोणार्कच्याच चंद्रभागा बीचवर पार पडलेले ‘सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल’ हे इथले महत्त्वाचे दोन उत्सव.

‘सॅण्ड आर्ट’ म्हणजेच वाळूची शिल्पे. ओडिशामधील सुदर्शन पटनायक या माणसाचं नाव या कलेसाठी प्रसिद्ध आहे. सुदर्शन पटनायक यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. जगन्नाथ पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या विषयांवर वाळूची शिल्पे करणे यात सुदर्शन यांचा हातखंडा आहे. सामाजिक, राजकीय, जागतिक पातळीवर महत्त्वाची घटना घडली की त्या घटनेवर आधारित अत्यंत देखणे असे वाळू शिल्प सुदर्शन पटनाईक तयार करतात.

ओडिशा सरकारने सुरू केलेला फेस्टिव्हल म्हणजे वाळू शिल्पे करणाऱ्या कलाकारांसाठी एक पर्वणीच असते. हिंदुस्थानच्या विविध प्रांतांतून इथे कलाकार आपली कला सादर करतात. समुद्रकिनाऱ्यावर एकाशेजारी एक सलग अशी वेगवेगळ्या कलाकारांची वाळू शिल्पे आपल्याला बघायला मिळतात.
पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज एक थीम घेऊन शिल्प करायचे असते. यंदा भुवनेश्वरमध्ये विश्वचषक हॉकीचे सामने खेळले जात आहेत. त्यामुळे यंदा वारसा, महिला सक्षमीकरण, प्लॅस्टिकचा भस्मासुर यासोबत हॉकी हीसुद्धा थीम ठेवलेली होती. प्रत्येक कलाकाराने या थीमनुसार शिल्प करायचे असते. त्यांना त्याच्यासाठी पाच तासांचा वेळ दिला जातो. वाळू शिल्पे करताना ती भुसभुशीत होऊ नयेत म्हणून मधून मधून त्याच्यावरती पाणी शिंपडले जाते. अनेक स्वयंसेवक कलाकारांना मदत करत असतात. पर्यटकांनासुद्धा वाळू शिल्पे कशी तयार केली जातात याचे प्रात्यक्षिक पाहता येते.

कोणार्कचा डान्स फेस्टिव्हल आणि त्याच्याच बरोबर होणारा हा सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल या दोन्ही उत्सवांची जगभरात नोंद घेतली जाते. हिंदुस्थानीयांसोबतच परदेशी पर्यटकसुद्धा याकाळात इथे आवर्जून उपस्थित राहतात. डान्स फेस्टिव्हल बघायला आलेल्या रसिकांना तिथून दोनच किलोमीटरवर असलेला सॅण्ड आर्ट फेस्टिव्हलसुद्धा बघता येतो.

सॅण्ड आर्ट म्हणजे वाळू शिल्पकला हळूहळू हिंदुस्थानच्या विविध प्रांतांत आता प्रसिद्ध होऊ लागली आहे. यंदा इथल्या उत्सवामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ इथल्या कलाकारांचा सहभाग आहे. त्याचसोबत श्रीलंका, जपान, इटली, जर्मनी, स्पेन, नॉर्वे या देशांतील कलाकारांची वाळू शिल्पकला इथे पाहायला मिळते. महाराष्ट्रातील वेंगुर्ल्याचा रविराज चिपकर नावाचा कलाकार आपली सुंदर कला या ठिकाणी सादर करत असताना भेटला. अकस्मात कोणीतरी मराठी बोलणारी व्यक्ती आल्यामुळे त्याला विशेष आनंद झाला होता. आपल्याकडे वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर इथल्या समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा आता वाळू शिल्पे साकारली जाऊ लागली आहेत.

समुद्रावर वाळूत किल्ला करणे किंवा घर बांधणे हा प्रत्येकाचा अगदी आवडीचे खेळ असतो. केव्हा ना केव्हा आपण हा सुंदर खेळ वाळूत खेळलेला असेलही, पण याच खेळाचे शास्त्रोक्त आणि भव्य स्वरूप आपल्याला ओडिशा इथे या सॅण्ड आर्ट फेस्टिव्हलमध्ये बघायला मिळते. वाळू शिल्प ही कला त्यानिमित्ताने जागतिक पातळीवर गेलेली दिसते. ओडिशा सरकारच्या या उपक्रमामुळे कलाकारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन दिले जाते. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. इतका सुंदर महोत्सव आपल्या महाराष्ट्रातही व्हावा जेणेकरून आपल्या कलाकारांना आणि पर्यटकांना या सुंदर पर्वणीचा लाभ घेता येईल.
कोणार्कच्या चंद्रभागा बीचवर एका सलग रांगेत उभी असलेली ही वाळू शिल्पे पाहताना तिथून पाय हलत नाहीत. प्रत्येक वाळू शिल्पावर रंगीत छत्रीचे आच्छादन असते. समोर समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, त्यावर डोलणाऱ्या नौका आणि त्या पार्श्वभूमीवर इथे वाळूत साकारलेली हे अत्यंत देखणी वाळू शिल्पे. सगळा परिसर कलेच्या या अलौकिक आविष्काराने भारावलेला असतो. निसर्गाने आधीच नटलेल्या ओडिशाचे सौंदर्य या उत्सवांमुळे आणि तो पाहायला आलेल्या पर्यटकांमुळे अजूनच खुलून दिसतो.