लेख – सागरी सुरक्षेची स्थिती आणि आव्हाने

फाईल फोटो

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन

सागरी सुरक्षेची स्थिती केंद्र राज्य सरकारांच्या अनेक मंत्रालयांच्या आणि विभागांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. नौदल सीनियर सेवा असल्याने त्यांनी तटरक्षक दल, राज्य पोलीस दल आणि गुप्तवार्ता कार्यालय यांच्याशी विचारविनिमय करून त्यांच्या कामाचे नियमित सुरक्षा अवलोकन केले पाहिजे. अमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, दहशतवादी संघटना, अवैध मासेमारी, चाचे त्यांचे सहाय्यकर्ते याबाबतचे गुप्त वार्तांकन अत्यंत निकृष्ट आहे.

हिंदुस्थानी नौदलाने इंडियन ओशन इन्फॉर्मेशन फ्यूझन सेंटर हे देशाच्या इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अँड अॅनालिसिस सेंटर दिल्ली, गुरगाव इथे प्रस्थापित केले आहे. या सेंटरचा 2020 या वर्षांचा रिपोर्ट आताच जाहीर करण्यात आला. हे सेंटर हिंदी महासागरामध्ये होणाऱया वेगवेगळी सुरक्षा आव्हाने आणि सुरक्षा भंग यावर लक्ष ठेवून असते. याकरिता अनेक देशांची मदत घेऊन त्यांच्याकडून मिळणारी माहिती इथे एकत्रित केली जाते व त्याचे विश्लेषण केले जाते.

जगभरातील सुमारे 95 टक्के व्यापार हा समुद्रमार्गे होतो. या समुद्री महामार्गांना आंतरराष्ट्रीय जहाज मार्ग (इंटरनॅशनल शिपिंग लेन) असेही संबोधले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हिंदुस्थानने आपल्या 7 हजार 600 कि.मी. अंतराच्या सागरी किनारपट्टीत 13 मोठे आणि 227 इतर बंदरे विकसित केली आहेत. या बंदरांतून हिंदुस्थानचा 95 टक्के व्यापार केला जातो. क्रूड तेल, कोळसा या महत्त्वाच्या घटकांची आयात समुद्री मार्गेच होते. विकासाच्या दृष्टीने ऊर्जा हा घटक महत्त्वाचा आहे. युद्धजन्य परिस्थिती असो वा नसो, देशाच्या हद्दीतून जाणाऱया आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग (इंटरनॅशनल शिपिंग लेन) तसेच दळणवळणाचा समुद्री मार्ग (सी लाइन ऑफ कम्युनिकेशन) सुरक्षा महत्त्वाची आहे.

हिंदी महासागरातील सुरक्षा गरजेची आहे. हिंदी महासागर हा इतर समुद्री प्रदेशांच्या तुलनेत भौगौलिकदृष्टय़ा वेगळा आहे. या सागरात प्रवेश करण्यासाठी केवळ सात मार्गांचा अवलंब करता येतो. यामध्ये पश्चिमेकडे सुएझ कालवा (इजिप्तमार्गे), हॉर्मुझची सामुद्रधुनी (ओमान), बाब एल मनदेब (इथिओपिया/येमेन), केप ऑफ गुड होपची सामुद्रधुनी (द.आफ्रिका) आणि पूर्वेकडे मलाक्का सामुद्रधुनी (सिंगापूर), सुंदा सामुद्रधुनी व लोमबोस सामुद्रधुनी (इंडोनेशिया) या मार्गाचा वापर केला जातो. हिंदी महासागरात सर्वात अधिक मालवाहतूक केली जाते. वर्षभरात 1,20,000 हून अधिक जहाजांचा प्रवास या भागातून होतो. जगातील दोन तृतीयांश तेल वाहतूक, एकतृतीयांश मालवाहतूक तसेच अर्ध्याहून अधिक कंटेनर वाहतूकही याच महासागरातून होते. टेहळणी, गस्त, गुप्त माहितीची देवाणघेवाण,वीजकीय [Electronic Warfare] लढाई, सागरी संपत्तीचे संरक्षण, आरोहण, शोध आणि जप्ती मोहिमा (Boarding Operations), घुसखोरी प्रतिबंध,चाचेगिरी प्रतिबंध,अवैध व्यापार प्रतिबंध,अवैध मासेमारी प्रतिबंध समुद्रावरील कायदा व सुव्यवस्था अशा अनेक कारवाया सुरक्षा दलांकडून केल्या जातात.

2020 मध्ये हिंदी महासागरात 1998 सुरक्षा भंग झाले, ज्यामध्ये 267 समुद्री चाचे आणि इतर गुन्हेगारांनी शस्त्राच्या मदतीने व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याच्या घटना होत्या. यामधील 50 टक्के घटना गल्फ ऑफ गिनी, जी आफ्रिकेच्या किनाऱयावर आहे, तिथे झाल्या. समुद्र चाचांच्या हल्ल्यामध्ये 188 हल्ले यशस्वी झाले. मात्र 79 हल्ले परतवून लावण्यात व्यापारी जहाजांना यश आले. यामधील 40 टक्के प्रसंगांमध्ये शस्त्रांचा वापर केला गेला होता. मलाक्का सामुद्रधुनीमध्ये चाकू आणि तलवारी या शस्त्रांचा वापर केला जातो. समुद्री चाच्यांनी 140 व्यापारी नौदलाच्या कर्मचाऱयांना 26 वेगवेगळ्या घटनांमध्ये बंदी बनवले. त्यापैकी 126 कर्मचाऱयांना खंडणी दिल्यावर सोडण्यात आले. मात्र अनेक नाविक अजूनसुद्धा समुद्री चाचांच्या कैदेत आहेत. मात्र आफ्रिकेच्या किनारपट्टीवर जगाची नौदले गस्त घालत आहेत. त्यामुळे तिथे घडणाऱया घटनांमध्ये कमी आलेली आहे.

या काळात 421 स्मगलिंगच्या घटना घडल्या आहेत. 222 घटनांमध्ये वेगवेगळे ड्रग्ज म्हणजे अफू, गांजा, चरस पकडण्यात आले. मात्र कोरोना/चिनी व्हायरसमुळे सध्या या घटनांमध्ये कमी आलेली आहे. स्मगलिंग करण्याकरिता दोन पद्धतीचा वापर केला जातो, एक मच्छीमार बोटींच्या मधून आणणे, दुसरे मोठय़ा जहाजातून आणलेल्या कंटेनर्समधूनसुद्धा स्मगलिंग केले जाते. म्हणूनच या दोन्हीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. हिंदुस्थानच्या बाबतीत समुद्राच्या बाजूने बांगलादेशी घुसखोरी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी ही अविरत सुरू असते. हिंदुस्थानच्या ओशन इन्फॉर्मेशन फ्यूझन सेंटरने 592 घटनांची नोंद केली, ज्यामध्ये व्यापारी जहाजांना मदतीची गरज लागली. यामध्ये 22 टक्के जहाजे बुडाली, 20 टक्के जहाजांनी एकमेकाला धडक दिली.

हिंदी महासागरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 36 ते 37 हजार जहाजे प्रवास करतात. वर्षभरामध्ये एक लाख 45 हजार जहाजांनी या सागराचा व्यापाराकरिता वापर केला, ज्यामधील पाच हजार तीनशे जहाजे ही मलच्या सामुद्रधुनीमधून जातात, अठराशे जहाजे गल्फ ऑफ एडनमधून जातात, 110 स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून प्रत्येक महिन्याला जातात. यावरून या सामुद्रधुनीचे महत्त्व लक्षात येते. सुवेझ कॅनॉल काही काळ बंद पडल्यामुळे जागतिक व्यापाराला केवढा धोका निर्माण झाला होता हे आपण बघितलेच आहे. म्हणूनच अशा धोक्यांचा सामना करण्याची गरज आहे. हिंदुस्थानचे भौगोलिक स्थान लक्षात घेता देशाच्या तिन्ही बाजूला पसरलेल्या समुद्रामुळे सागरी सुरक्षा महत्त्वाची आहे.हिंदुस्थानी सीमेलगत चिनी लष्कराच्या हालचाली, चिनी नौदलाचे वेगाने होणारे आधुनिकीकरण ही चिंतेची बाब आहे. चीनच्या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवून त्याच्या कुरापतींना तोडीस तोड जवाब देणे ही आता काळाची गरज आहे. दक्षिण चीन सागरात सध्या चीनच्या तेथील विस्तारवादास आळा घालण्यासाठी त्या भागातील देश एकत्र येत आहेत व त्यांना पाठिंबा देण्यास अमेरिका, जपान, हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया सज्ज आहेत. समुद्रमार्गे घुसखोरी करून पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेशाच्या किनारी भागांत अवैध बांगलादेशी स्थलांतरितांना थांबवण्याकरिता पूर्व किनाऱयाचे अधिक प्रभावीपणे संरक्षण होण्याची गरज आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या