मुंबई बेट आहे, लक्षात घ्या!

>>  पंढरीनाथ सावंत

मुंबईत सखल जागी पाणी काही आजच भरत नाही. ते नेहमीच भरत आले आहे. मुंबई हे लहान-मोठी बेटे जोडून इंग्रजांनी तयार केलेले सलग बेट आहे. त्यावर वस्ती जसजशी होत गेली तशी त्यांनी सांडपाणी वाहून समुद्रात सोडण्यासाठी गटार व्यवस्था केली. या बेटावर उंच-सखल जागा होत्याच. पावसाचे पाणी निचरून जात होते. पण गेल्या 30-35 वर्षांमध्ये बांधकाम व्यवसायाने पाणी निचऱयाच्या जागा जवळजवळ संपवूनच टाकल्या. परिणामी पाणी सहज निचरत होते ते अगदी कमी झाले. मग स्टॉर्म वॉटर ड्रेन्स बांधण्यात आले. साठलेले पाणी उपसून ते या ड्रेन्समध्ये सोडले जाते, पण भरतीमुळे ते समुद्रात जात नाही. भरतीच्या दट्टय़ामुळे परत येते. ते जाते भरतीची लय संपून ओहोटी येते तेव्हा. कारण मुंबईतली गटारे आणि स्टॉर्म वॉटर ड्रेन्स यांचे आऊटफॉल्स ओहोटीची सम लागते त्या पातळीवर आहेत. त्यातून साठलेले पाणी भरती सुरू होईपर्यंत बाहेर जाते. भरती लागली की ते समुद्राच्या ताकदीने मागे ढकलले जाते. त्यामुळे भरती आणि मुसळधार पाऊस यांचा मेळ जमला की, मुंबईत जागोजागी पाणी भरते. ते पंपांनी उपसूनसुद्धा ओहोटी लागेपर्यंत निचरून जात नाही.

मग वृत्तवाहिन्यांवर यावरून मुंबईविषयी वेगवेगळी यमके जुळायला लागतात. मोठय़ा पावसाचे पाणी भरतीच्या काळात निचरून जाऊ शकत नाही. पण वाहिन्यांमध्ये लोकांना घाबरवून पोटे भरण्याची स्पर्धा लागली आहे. शहाण्यासुरत्या प्रसारमाध्यमांनी तरी भान राखायला पाहिजे. माझे वय आता 86 आहे. मी अगदी लहानपणापासूनच मुंबईमध्ये ठरावीक ठिकाणी पावसाळय़ात दरसाल पाणी तुंबलेले पाहत आलो आहे. त्यात नवीन एवढेच आहे की, अफाट बांधकामांमुळे पाणी तुंबण्याच्या जागा वाढल्या आहेत. पाणी निचरून जाण्याच्या जागा जवळजवळ नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार यांच्या नावाने शंख करणाऱयांचा ठणाणा मुंबईकरांनी मनावर घेऊ नये. त्यांचा दोष वेगळा आहे. समुद्राला भरती येते त्यावेळी समुद्राची पातळी आऊटफॉल्सच्या कित्येक पट वर असते. भरतीच्या वेळी पाणी बाहेर रेटले जाते. ते ओहोटी लागेपर्यंत वाहून जात नाही. मुसळधार पाऊस आणि भरती यांचा मेळ जमला की, जी अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण होते तिच्या सोबतच आपल्याला जगायचे आहे याची खूणगाठ प्रत्येक मुंबईकराने आणि बाहेरून कामधंद्यासाठी मुंबईत येणाऱयांनी मनात ठेवावी. महापालिका व सरकार यांच्या नावाने खडे फोडण्यात वेळ वाया घालवू नये. तसे केल्यास पेन बाम बनवणाऱया कंपन्यांना नफा होतो. टीकाकारांनी मुंबई हे बेट आहे हे कृपया लक्षात घ्यावे.

आपली प्रतिक्रिया द्या