लेख – शिवसेनाः एक शक्तिशाली प्रवाह!

>> योगेंद्र ठाकूर

मागील 58 वर्षांत अनेक घाव सोसून, पचवून आणि अंगावर आलेल्यांना शिंगावर घेत शिवसेना दमदारपणे पुढे वाटचाल करीत आहे आणि करीत राहील. शिवसेना संपणार म्हणणारे संपले, संपतील; पण शिवसेना नावाचा वटवृक्ष तसाच खंबीरपणे उभा आहे. आजही मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे शिवसेनाच आहे. शिवसेना हा एक शक्तिशाली प्रवाह आहे. तो असाच कायम राहील!

शिवसेनेची स्थापना होऊन आता 58 वर्षे झाली आहेत. आजही मराठी माणसाच्या न्याय्यहक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे शिवसेनाच आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आणि मराठी माणसाच्या प्रदीर्घ लढय़ानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्रात मुंबई आली, परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता. मुंबईतील केंद्र व राज्य शासनाच्या आस्थापनेत आणि इतर कंपन्यांमध्ये मराठी माणूस औषधालाही दिसत नव्हता. मराठी माणूस अस्वस्थ होता. घुसमटत होता. याला वाट साप्ताहिक ‘मार्मिक’मधून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करून दिली. पुढे मराठी मने चेतविली आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शिवसेनेला 19 जून 1966 रोजी जन्म दिला.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर मुंबईतील मराठी माणूस ताठ मानेने, स्वाभिमानाने जगू लागला. तरीही मराठी माणसाची एकजूट होऊच नये म्हणून विरोधकांनी सतत प्रयत्न केले. 2022 मध्ये केंद्रातील भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी फोडाफोडीचा खेळ खेळला. शिवसेनेतील गद्दार खासदार आणि आमदार भाजपच्या दावणीला बांधून असंवैधानिक पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेपासून दूर केले. भाजपच्या कटकारस्थानामुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे गतिमान महाविकास आघाडी सरकार कोसळले. या घटनेमुळे सामान्य जनता, निष्ठावंत शिवसैनिक संतापले. मुंबई-महाराष्ट्रातील मराठी माणसाचे मन चवताळले. शिवसेनेतील गद्दारांना आणि त्यांचा वापर शिवसेनेविरुद्ध करणाऱ्यांना गाडण्याचा चंग मराठी जनता आणि निष्ठावान शिवसैनिकांनी बांधला. गद्दारांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्धार महाराष्ट्रीय जनतेने केला. शिवसेना संपून जाईल असे गद्दारांना आणि विरोधकांना वाटले, पण गेल्या 58 वर्षांत शिवसेनेची पाळेमुळे घट्टपणे रुजली आहेत. शिवसेनेचा वटवृक्ष उन्मळून पडणे शक्यच नव्हते. झालेही तसेच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक, पदाधिकारी यांना सोबत घेऊन शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे केले. मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्रातील जनतेने गद्दारांविरुद्ध लढण्यासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला आताच्या लोकसभा निवडणुकीत गतवैभव प्राप्त करून दिले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात 400 पारचा, तर महाराष्ट्रात 45 पारचा नारा भाजपासह महायुतीच्या घटक पक्षांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळजवळ 18 जाहीर सभा महाराष्ट्रात घेतल्या. शिवसेनेला नकली म्हटले गेले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी असंवैधानिक शिंदे सरकारच्या कारभाराचे कौतुक केले, पण महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी माणसाने भाजपा व मिंधे गटाला त्यांची जागा दाखवली. भाजपचे 9 तर मिंधे गटाचे 7 खासदार निवडून आले. त्याउलट महाविकास आघाडीच्या 30 जागा निवडून आल्या. त्यात शिवसेनेच्या 9 जागा आहेत. मुंबईत शिवसेनेचे 3 खासदार निवडून आले, तर अमोल कीर्तिकर यांची जागा 48 मतांनी ढापली. मुंबईहून शिवसेनेला हद्दपार करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मराठी माणूस हा नेहमीच शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला आहे. शिवसेना आणि मुंबई यांचे नाते अतूट आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

फुटीरतेचा शाप महाराष्ट्राला नवीन नाही; मात्र महाराष्ट्राने नेहमीच फुटीर आणि गद्दारांना धडा शिकविला आहे. तसाच तो यावेळीही शिवसेनेतून सत्तेसाठी फुटलेल्या गद्दारांना शिकविला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे खरे वारस तेच असल्याचे,  बाळासाहेबांचा वसा तेच चालवत असल्याचे दाखवून दिले. निष्ठावान शिवसैनिकांत चैतन्य निर्माण करून शिवसेनेला उभारी मिळवून दिली आहे. त्यामुळे लोकसभेनंतर आता लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची मशाल धगधगणार आहे. मागील 58 वर्षांत अनेक घाव सोसून, पचवून आणि अंगावर आलेल्यांना शिंगावर घेत शिवसेना दमदारपणे पुढे वाटचाल करीत आहे आणि करीत राहील. शिवसेना संपणार म्हणणारे संपले, संपतील; पण शिवसेना नावाचा वटवृक्ष तसाच खंबीरपणे उभा आहे. शिवसेना हा एक शक्तिशाली प्रवाह आहे. तो असाच कायम राहील!