साय-फाय – लग्नाचा ‘स्पेस’ फंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

काही काळापासून परदेशात अथवा एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन लग्न करण्याची ‘डेस्टिनेशन वेडिंग’ संकल्पना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्यानंतर मग ‘अंडरवॉटर वेडिंग’ अर्थात पाण्याच्या खाली लग्नगाठ बांधण्याची संकल्पना प्रसिद्ध होऊ लागली आहे. हे कमी म्हणून की काय, आता अमेरिकेतील एक कंपनी चक्क ‘स्पेस वेडिंग’ अर्थात अंतराळातील लग्नाची भन्नाट कल्पना घेऊन आली आहे. विशेष म्हणजे, ही संकल्पना जाहीर होताच 2024 सालापर्यंत कंपनीकडे बुकिंगदेखील फुल झाले आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील कंपनी ‘स्पेस पर्सपेक्टिव’ने ‘स्पेस वेडिंग’ ही अभिनव योजना समोर आणली असून, पाण्याखालच्या लग्नानंतर आता अंतराळातील लग्नासाठी लोकांना प्रवृत्त करायला सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत एका आलिशान अशा हवाई फुग्याची (एअर बलून) निर्मिती केली जाणार आहे. समुद्रसपाटीपासून साधारण एक लाख फूट म्हणजे, 19 मैल वर उडणार असा हा एखाद्या फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचा फुगा असणार आहे. या फुग्याला अंतराळात नेले जाईल आणि त्यानंतर या फुग्यामध्ये बसवण्यात आलेल्या ‘कॅप्सुल’च्या आत जोडपी आपले लग्न विधिवत उरकू शकणार आहेत. साधारण 2024 सालापर्यंत अशा प्रकारच्या यशस्वी ‘स्पेस वेडिंग’ना सुरुवात होण्याचा दावा कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या 2024 चे सगळेच बुकिंग मात्र आताच फुल झाले आहे.

या ‘स्पेस वेडिंग’साठीचा खर्च मात्र प्रचंड असणार आहे. याचाच अर्थ, सध्या तरी फक्त मोठमोठे उद्योगपती आणि अब्जाधीश यांच्या आवाक्यात हे ‘स्पेस वेडिंग’चे स्वप्न असणार आहे. ‘स्पेस पर्सपेक्टिव’ कंपनीने जाहीर केल्यानुसार, सध्या अशा प्रकारच्या एका अंतरिक्ष उड्डाणासाठी कंपनी 1 लाख 25 हजार डॉलर्स एवढी रक्कम आकारणार आहे. म्हणजे, हिंदुस्थानी चलनानुसार या एका उड्डाणाची किंमत साधारण 93 लाख रुपयांच्या आसपास असणार आहे. या उड्डाणात वापरण्यात येणाऱ्या हवाई फुग्यात बसवण्यात आलेल्या कॅप्सूलच्या आतून अंतराळातून 360 डिग्रीच्या दृश्यांचा मनोहर आनंद घेता येणार आहे. जोडीलाच या आलिशान फुग्यात बार, रेस्टॉरंट, वाय-फाय आणि बाथरूमच्या सुविधादेखील पुरवण्यात येणार आहेत.

‘स्पेस वेडिंग’ची ही अभिनव संकल्पना, अंतराळ पर्यटनाला (Space Tourism) लादेखील मोठय़ा प्रमाणावर चालना देईल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत. दोन मोठय़ा उद्योगपतींच्या खासगी अंतराळ यात्रेनंतर आता जगभरातील अनेक धनाढय़ उद्योगपतींमध्ये अंतराळ प्रवासाची ‘क्रेझ’ दिसून येत आहे. एका अहवालानुसार गेल्या 20 वर्षांत फक्त 7 लोकांनी पदरचे पैसे खर्च करून अंतराळ यात्रेचा आनंद लुटला आहे, मात्र सध्या या क्षेत्राकडे लोकांचा वाढत असलेला ओढा बघता, लोकांना कमीत कमी पैशांत आणि जास्तीत जास्त सुविधेत अंतराळ प्रवास करवण्यासाठी खासगी स्पेस कंपन्यांमध्ये चढाओढ लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पुढील वर्षी अमेरिकेत व्यावसायिक तत्त्वावर ‘अंतराळ प्रवासा’ची सुरुवात होत आहे. म्हणजे खासगी कंपनीच्या मदतीने स्वतःचे पैसे खर्च करून लोक अंतराळ प्रवासाचा आनंद लुटू शकणार आहेत. एका नव्या युगाच्या यात्रेची ही सुरुवात असेल असे म्हणायला हरकत नाही!

[email protected]