
सुमारे 13.7 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या विश्वाचा पसारा एवढा व्यापक आहे की, त्यातील एकेक गोष्ट जाणून घेताना एक इटालियन संशोधक म्हणतात तसं डोकं गरगरायला लागेल. अर्थात संशोधक डोकं ठिकाणावर ठेवूनच विश्वाच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न विविध माध्यमांद्वारे सतत करीत असतात. गॅलिलिओच्या छोटय़ाशा दुर्बिणीपासून सुरू झालेला हा प्रवास गेल्या 414 वर्षांत कमालीचा प्रगतीपथावर आहे. दुर्बिणीमध्ये होत गेलेले बदल म्हणजे भिंगाच्या दुर्बिणीनंतर आलेली आरशाची परावर्ती न्यूटोनिअन दुर्बीण. त्यात बदल होऊन आटोपशीर आकाराची कॉसिग्रेलिअन दुर्बीण तसंच पृथ्वीवर ठिकठिकाणी उभारलेल्या महाकाय दुर्बिणी यातून विश्व पाहता येऊ लागलं.
परंतु हवामान, वातावरण यांचा अडथळा पार करून थेट अवकाशातच ‘तिसरा डोळा’ पाठवण्याची कल्पना 1940 मध्ये आली. हबल दुर्बिणीने ती नंतर 1990 मध्ये साध्य करून दाखवली. विश्वातील अनेक तारे, ग्रह आणि दीर्घिकांचे (गॅलॅक्सी) असंख्य फोटो हबलने पाठवले. अनेक अडचणींना तोंड देत हबल आजही कार्यरत आहे, मात्र एवढय़ा काळात संशोधनातील प्रगतीने खगोलशास्त्र्ााच्या जाणिवा विस्तारत गेल्या आणि त्यातून नित्यनवीन शोधही लागत गेले. आपण ‘पाहतो’ ते विश्व ऑप्टिकल लाइट किंवा दृश्य प्रकाशाने चमचमणारं, मात्र त्यापलीकडे इफ्रारेड (अवरक्त) किरण किंवा गॅमा-रे, एक्स-रे यांच्या संशोधनानंतर विश्वाचा पसारा ‘दिसतो’ त्यापेक्षा कितीतरी विराट असल्याची जाणीव झाली… आणि हे सर्व मिळूनसुद्धा फक्त 4 टक्केच विश्व आपल्याला जाणता येतं. उरलेली 73 टक्के डार्क एनर्जी (कृष्णऊर्जा) आणि 23 टक्के डार्क मॅटर (कृष्णद्रव्य) असे सुमारे 96 टक्के विश्व आपल्याला अज्ञातच आहे!
आपल्याला किती कळते, याइतकेच काय कळत नाही हे कळणे खूप महत्त्वाचे असते आणि संशोधक निर्लेप मनाने या सत्याचा स्वीकार करीत असतात. त्यातूनच अधिक अभ्यासपूर्ण, सखोल चिकित्सा आणि नवे संशोधन समोर येते. नवे तंत्रज्ञान विकसित होत राहते. त्यामुळे हबल दुर्बीण अवकाशात पाठवल्यावर संतुष्ट न होता संशोधक त्यापुढचा विचार करू लागले. त्यातूनच हिंदुस्थानी वंशाचे खगोल संशोधक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावे ‘चंद्रा’ दुर्बीण 1999 मध्ये आणि 25 डिसेंबर 2021 रोजी ‘इफ्रारेड’ वेधशाळा असलेली ‘जेम्सवेब’ दुर्बीण अवकाशात झेपावली.
पहिल्या दोन अवकाश दुर्बिणी अवकाशात पृथ्वीभोवती फिरणाऱया आहेत. हबल पृथ्वीपासून 535 किलोमीटर कक्षेत, तर ‘चंद्रा’ 14 हजार किलोमीटर कक्षेत फिरते. योग्य वेळी हबलचे दर्शनही अवकाश निरीक्षकांना घेता येते. आम्ही ते अनेकदा घेतलंय. ‘हबल’ने आतापर्यंत पाठवलेल्या फोटोंमधून अवकाशातील अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणे शक्य झाले. तीच गोष्ट ‘चंद्रा’ दुर्बिणीची, परंतु पृथ्वीऐवजी सूर्याभोवती फिरणारी दुर्बीण पाठवून अवकाशातील अधिक ‘गतपाळा’चा मागोवा घ्यायचे उद्दिष्ट पूर्ण झाले ते ‘जेम्सवेब’ अवकाश-दुर्बीण दोन क्रमांकाच्या ‘लॅगरॅन्ज बिंदू’वर पोचली तेव्हा. हे लॅगरॅन्ज बिंदू पाच आहेत. सूर्य आणि पृथ्वीचा गतीशी त्यांचा संबंध येतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना (किंवा कोणत्याही दोन वस्तू परस्परांभोवती फिरताना) त्यांच्यातील गुरुत्वाकर्षणातून काही जागा अशा निर्माण होतात की, तिथे दोन्ही वस्तूंचे गुरुत्वबल समसमान होते आणि तिथे एखादी वस्तू ठेवली तर ती कोणाकडेच खेचली जात नाही. सूर्य-पृथ्वी यांच्यातही ते घडते. यापैकी एक लॅगरॅन्ज पॉइंट सूर्य-पृथ्वीच्यामध्ये, एक पृथ्वीच्या बाहेर, एक सूर्यापलीकडे आणि दोन पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेवर येतात. यापैकी पृथ्वीपलीकडे असलेल्या दोन क्रमांकाच्या बिंदूवर ‘जेम्सवेब’ दुर्बीण स्थिरावली आहे. ती सूर्यपरिक्रमा करते.
तसे करीत असताना या 20 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद अशा, अवरक्त किरण वेधशाळेनं (इफ्रारेड ऑब्जर्वेटरी) 17 नोव्हेंबर 2022 रोजी विश्वनिर्मितीनंतर अवघ्या 35 कोटी वर्षांत जन्मलेल्या एका दीर्घिकेचा शोध लावला! या ‘रेड स्पायरल गॅलॅक्सी’चा शोध खूपच महत्त्वाचा आहे. निर्मितीच्या आरंभीच्या काळातील दीर्घिका आणि त्यातील ताऱयांचा वेध घेऊन विश्व कसे आकाराला आले, याचा अभ्यास करण्यात पुढचे पाऊल पडले आहे.
बिग बँग (खरे तर महाप्रसारण) झाल्यावर विश्वाचा पसारा वाढू लागला आणि काही क्षणातच त्यातील द्रव्य आकार घेऊ लागले. विश्वाचा मूलाधार असलेला हायड्रोजन वायू आणि त्याचे हिलियममध्ये रूपांतर या ताऱयांच्या गाभ्यातील प्रक्रियेला हळूहळू सुरुवात झाली. याच ताऱयांपासून नंतर आपल्या सौरसंकुलासारखा ग्रहमाला आणि पृथ्वीसारखे ग्रह बनले. केवळ पृथ्वीवरच नव्हे तर आपल्या शरीरातील धातूंची निर्मितीही व्हायला अप्रत्यक्षपणे तारेच कारणीभूत आहेत. आपल्या बाबतीत ‘सूर्य’ खऱया अर्थाने आपला ‘जनक’ तारा आहे, परंतु विश्वनिर्मितीनंतर जे नवजात तारे तयार झाले त्यात केवळ हायड्रोजन-हिलियमच होते. त्यात धातुनिर्मिती ही त्यांच्या विस्फोटानंतर बनलेल्या ताऱयांमध्ये घडली असे आता ‘जेम्सवेब’च्या इफ्रारेड ऑब्जर्वेटरीच्या संशोधनातून दिसतेय. आपल्याकडच्या नारायणगावाजवळच्या रेडिओ दुर्बिणीचे ध्येयसुद्धा विश्वनिर्मितीच्या काळातील (प्रायमॉर्डिअल) हायड्रोजन शोधण्याचंच आहे. थोडक्यात, जगातील अनेक ठिकाणांहून आणि अवकाशातूनही माणूस विश्वाचा आरंभ कसा झाला याविषयी जिज्ञासेने संशोधन करतोय. आपले ‘वैश्विक’ असणे ते हेच आहे.



























































