
>>मुकुंद परदेशी<<
डान्सबारवरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच उठवली. कोणतीही गोष्ट बंदी घालून बंद होत नसते हे सरकारलाही कळते; पण मतपेटी जड करण्यासाठी अशा अनेक गोष्टी करून आपली प्रतिमा तयार करणे सरकारला भागच असते. ज्या गोष्टी शौक किंवा व्यसन म्हणून केल्या जातात त्या कोणत्याही बंदीने कधीच बंद होत नसतात. आजही टपऱ्यांवर खुलेआम मिळणारा गुटखा, वर्तमानपत्रांमध्ये छापून येणारे मटक्याचे आकडे, गुजरातमध्ये उपलब्ध होणारी दारू अशी कितीतरी उदाहरणे त्यासाठी देता येतील. सिगारेटच्या पाकिटावर कवटीचे चित्र आणि धोक्याची सूचना छापूनही धूम्रपान करणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही. व्यसनासाठी आणि आपले शौक पूर्ण करण्यासाठी वाटेल तितक्या पैशांची आणि आपल्या आरोग्याचीही बेदरकारपणे उधळण करणारे जोपर्यंत आहेत, तोपर्यंत सरकारने बंदी घालणे आणि न्यायालयांनी ती उठविणे हा उंदरा-मांजराचा खेळ सुरूच राहणार आहे.
डान्सबार बंदी करताना सरकारने टाकलेल्या अटी हास्यास्पदच होत्या. डान्सबार चालक म्हणे चारित्र्यवान असावा, गुन्हेगार नसावा ! म्हणजे डान्सबार काय एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्याने चालवावा अशी सरकारची अपेक्षा होती की काय? याच दोन अटी जर राजकारण करण्यासाठी लावल्या तर किती राजकारणी राजकारणासाठी पात्र ठरतील? अशा अव्यवहार्य अटी घालून लादलेली बंदी न्यायालयात टिकणार नव्हतीच. दारूबंदी विभाग सरकारच चालवणार आणि दारू पिण्याचा व विकण्याचा परवानाही सरकारच देणार याला काय म्हणावे? दारूमुळे कितीतरी गरीब कुटुंबे उद्ध्वस्त झालेली दिसतात; पण दारूतून मिळणाऱ्या महसुलाच्या मोहापोटी कोणतेच सरकार दारूबंदी लागू करत नाही. गुटखा बनवणारे कारखाने सुरूच आहेत; पण गुटखा विकायला मात्र बंदी आहे. प्लॅस्टिक बंदीचेही तेच. खुद्द गुजरातमधूनच प्लॅस्टिकचे ट्रकचे ट्रक भरून येत असताना ते विकायला मात्र बंदी आहे. डान्सबार बंदीही अशीच अर्धवटपणे लागू करण्यात आली होती. पूर्वी जे उघडपणे बघितले जात होते ते बंदीनंतर संबंधितांचे हात ओले करून गुपचूपपणे पाहिले जाऊ लागले इतकेच. डान्स बारच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी आपली मुले मोबाईलमध्ये काय पाहत असतात हे पाहण्याचा प्रयत्न करून पाहावा. स्वतःला फार सात्त्विक आणि सोज्वळ समजणारे स्वतःलाच मूर्ख बनवीत आहेत. तसाही डान्सबार हा साधारणपणे काळ्या पैसेवाल्यांचाच अड्डा असतो आणि त्या मार्गाने त्यांचा काळा पैसा परत बाजारात येतो ही जमेची बाजू. थोडक्यात, शौक करा, पण नाद करू नका, असाच न्यायालयाच्या निकालाचा एक अर्थ असावा.

























































